नव्या वर्षाची भेट

दिंनाक: 11 Jan 2020 17:50:39


बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात चित्रांच्या प्रदर्शनात खूप सारी रंगबेरंगी चित्रे पाहण्यासाठी रसिकांची गर्दी झाली होती. प्रत्येक जण एक-एक चित्र निरखून पाहत होता. मोठ्या माणसांबरोबर लहान-लहान मुले आपापली चित्रे आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवत होती, तर काही मुले त्यांच्याबरोबर आलेल्या आईबाबांना, आजीआजोबांना, काका-काकूंना चित्रे दाखवत होती. अचानक त्याचे लक्ष त्या चित्राकडे गेले आणि तो चित्र पाहतच राहिला. अरे, हे तर आपण काढलेले चित्र? जयदीपकाकाने त्याला शिकवली होती, तश्शीच्या तश्शी हुबेहूब सहीपण होती त्या चित्रावर. बाजूला त्याचे नावही लिहिलेले होते, ‘सोहम आपटे’. त्याला खूप मस्त वाटलं, त्याला झालेल्या या आनंदामुळे त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमललं.

‘अरे सोहम’, असा का हसतो आहेस? काही स्वप्न वगैरे पडलं का? चल उठ, शाळेत नाही का जायचे?’ असे म्हणत आईने सोहमला झोपेतून जागे केले.

अरे, आपण तर ते प्रदर्शन पाहात होतो, येथे कसे आलो, हेच सोहमला कळेना. अरे, हो की स्वप्नच पाहात होतो आपण हे त्याच्या लक्षात आले. सोहम उठेपर्यंत आई त्याचा डबा भरण्यासाठी स्वयंपाकघरात गेली.

आपले चित्र प्रदर्शनात होते, याच आनंदात सोहम उठला आणि आवरायला पळाला. त्याचे आवरून झाले आणि तेवढ्यात शाळेची व्हॅन आल्यामुळे सोहम दप्तर घेऊन व्हॅनकडे पळाला. 

सोहम शाळेत आला, तेव्हाही तो त्या प्रदर्शनाच्या विचारात आणि त्यामुळे खूप आनंदात होता. शाळेचे तास सुरू झाले आणि सोहमला आश्चर्याचा धक्काच बसला. पहिल्याच तासाला रामदेवकाका खूप सारे गठ्ठे घेऊन वर्गात आले आणि पाठोपाठ शेजारच्या वर्गातील रावी आली. आज रावीचा वाढदिवस होता आणि त्यामुळे रावी छान फुलाफुलांचा ड्रेस घालून आली होती. रावी लहानपणापासून अभ्यासाबरोबर खेळातही हुश्शार असल्यामुळे सगळ्या शाळेला ती माहिती होती. स्कॉलरशिप परीक्षेत तर ती शाळेत पहिली आली होती. रामदेवकाका आणि ती वर्गात येताच तिने ताईंना नमस्कार केला आणि आपल्या हातातील एक वस्तू रेवाताईंना दिली. काय होते ते? हे समजलं नाही, काहीतरी कागदाची गुंडाळी होती. तेवढ्यात रामदेवकाकांनी त्यातील एका गठ्ठ्यातून काहीतरी काढून रावीच्या हातात दिले, ती पण अशीच कागदाची गुंडाळी होती. बाईंनी रावीला खूण करताच त्या दोघींनी त्या गुंडाळ्या सोडल्या आणि सर्वांच्या समोर धरल्या. दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरसारखे काहीतरी वाटत होते ते. पण त्यात चित्रच नव्हते. मधला सगळा भाग कोरा होता आणि खालच्या बाजूला कॅलेंडरवर असतात, तशा तारखा होत्या. सोहम आणि त्याचे मित्रही त्या कागदाकडे आश्चर्याने पाहत होते, तेवढ्यात रेवाताई त्या कागदांबद्दल आम्हालांच प्रश्न विचारला, ‘मुलांनो काय आहे हे माहितेय कोणाला ?’ पण माझ्यासह सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत होतो. आम्हाला काही सांगता येत नाहीये, हे पाहून रेवाताईंनी पुन्हा एकदा आम्हांला एक प्रश्न विचारला.

‘मुलांनो, तुम्हांला चित्र काढायला आवडते, हो ना?’ चित्र काढणे हा माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींचा आवडता विषय असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी अगदी आनंदाने आणि जोरात होकार दिला. 

तो ऐकून रेवाताईंनी अजून एक प्रश्न विचारला, ‘आता तुमचे चित्र तुमच्या घरातल्या कॅलेंडरवर दिसणार आहे, माहितेय तुम्हांला ?’ पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांचेच चेहरे प्रश्नार्थक. मग रेवाताईंनी फार प्रश्न न विचारता आम्हांला माहिती द्याायला सुरुवात केली. ‘ही माझ्या हातात आहे, ती ‘गमभन दिनदर्शिका’. आता नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे रावीने या दिनदर्शिका मुद्दाम तुमच्यासाठी आणल्या आहेत. यातील मधली जागा जी आहे, ती तुम्हांला चित्र काढता यावे म्हणून मोकळी ठेवली आहे आणि खालच्या बाजूला तीन महिन्यांचे कॅलेंडर आहे. तुमची वेगवेगळी चित्र असलेले हे कॅलेंडर आता तुमच्या घरात लावलेले असेल. येणाऱ्या पाहुण्यांसाठी हे एक ‘‘सरप्राइज’’ असेल. पाहुण्यांना तुमचे चित्र दाखवताना, तुम्हाला आणि तुमच्या आईबाबांना, आजीआजोबांना जो काही आनंद होईल तो तुम्ही हे तुमच्या चित्रासह असलेले कॅलेंडर घरात लावल्यानंतर अनभवू शकालच. रावीच्या आईबाबांनी ठरवले की, चॉकलेट खाऊन दात खराब होतात आणि बाहेरचे खाऊन पोट खराब होते. त्यामुळे चॉकलेट किंवा दुसऱ्या कोणत्याही खाऊपेक्षा वर्षभर तुम्हाला आनंद होईल असा खाऊ तुम्हाला द्याायचा. त्यामुळेच ही एक वेगळी भेट आज रावीच्या वाढदिवसानिमित्त रावी तुम्हाला देणार आहे आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिलीच. जर तुम्हाला तुमचे चित्र बालगंधर्वच्या कलादालनातील प्रदर्शनात लावावे असे वाटत असेल तर या कॅलेंडरमधील कोणतेही एक चित्र, जे तुम्हांला आवडले असेल ते सप्टेंबर २०२० पूर्वी या कॅलेंडरवर असलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचे. कॅलेंडरमध्ये असलेल्या कुपनवर तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर लिहायला विसरायचे नाही हं. म्हणजे हे प्रदर्शन डिसेंबर २०२० मध्ये कोणत्या तारखांना असेल तेव्हा गमभन प्रकाशन तुम्हांला पत्र पाठवून त्या तारखा कळवेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आईबाबांना, आजीआजोबांना, काकाकाकूंना घेऊन ते प्रदर्शन पाहायला जाऊ शकाल. तुमच्यासाठी खूप छान-छान पुस्तके लिहिणारे आणि आपल्या शाळेत एकदा पाहुणे म्हणून आलेले चित्रकार-लेखक ल.म. कडू सरांची ही संकल्पना आहे हं आणि त्यांचा मुलगा जयदीप आणि सगळे कडू कुटुंब या प्रदर्शनासाठी आणि तुमची चित्रे प्रदर्शनात लावावी म्हणून खूप मेहनत घेते. ही तुमची चित्रे नंतर सीमेवरच्या जवानांना शुभेच्छापत्राच्या रूपात पाठवली जातात, हेही या उपक्रमाचे एक विशेष आहे. चला तर आता, तुम्हाला ही कॅलेंडर दिल्याबद्दल आपण सगळेजण रावीला धन्यवादही देऊ या आणि जोरदार टाळ्या वाजवून तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देऊ या.’

टाळ्यांच्या आवाजाने सोहम एकदम भानावर आला. रेवाताई प्रदर्शनाबद्दल सांगत असताना, आपले सकाळचे स्वप्न त्याला आठवले आणि तो पुन्हा एकदा कलादालनात जाऊन पोहचला होता. आपले स्वप्न लवकरच पूर्ण होणार याची सोहमला खात्री पटली आणि त्याला खूप भारी वाटले. रावीने वर्गातील सगळ्यांना आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून ते कॅलेंडर दिले. ते पाहून सोहंमला आपण कधी घरी जातोय आणि आईला आपले स्वप्न सांगून, ते कॅलेंडर कधी दाखवतो आहोत, असे झाले होते. 

- आदित्य आवटे