आता भाद्रपद महिना सुरू होणार आणि गणपती बाप्पा घरी येणार. त्यामुळे घरात सुरु झाली आवराआवरी. म्हणजे खरंतर घरात सुरू झाली सामानाची, वस्तूंची, भांड्यांची, कपाटांची, सोफ्याची, कॉटची ढकलाढकली, खेचाखेची, ओढाओढी, सरकवासरकवी आणि थोडीफार लपवालपवी. इकडच्या वस्तू तिकडे, तिकडच्या वस्तू इकडे आणि भलत्या गोष्टी नकोत्या ठिकाणी म्हणजे आवराआवरी.

इतक्यात पाहिलं तर.. एक उंदीर खूर्चीत बसून होता.

मी घाबरून ओरडणारच होतो..

इतक्यात दोन पायावर बसून शेपटी ऊंचावत तो म्हणाला, ‘‘ओरडायचं कारण नाही! तयारी नीट होतेय की नाही? हे बघायला आलोय. बसा...बसा.’’

माझं उघडलेलं तोंड गपकन बंद झालं. मी त्याच्या समोरच्या खूर्चीत मटकन बसलो.

उंदीर म्हणाला, ‘‘परवा रात्री पुस्तक कुरतडता-कुरतडता मी वाचलं की, आम्ही माणसांचे एक नंबरचे शत्रू आहोत. आणि का तर म्हणे, आम्ही शेतातले अन्नधान्य खातो. हे वाचून तर मला गटारातलं पाणी पण गोड लागेना. आता मला सांगा आम्ही खाऊन खाऊन किती खाणार? आमची डोक्यापासून शेपटीपर्यंत लांबी फारतर ८ ते १० सें.मी.’’

‘‘पण, तामिळनाडूमधील इरुला जमातीतील माणसं आणि काही आदिवासी जेवताना आम्हाला भाजून खातात तर काही ठेचून खातात. अशा क्रूर माणसांना आम्ही मित्र म्हणायचं म्हणजे बेडूकताईने सापाच्या शेपटीला राखी बांधण्यासारखंच आहे किनई?’’

मी नकळत हो..हो करत मान हलवली.

मी मामाजींना विचारलं, ‘‘खरं म्हणजे, तुम्हाला पकडण्याचे, मारण्याचे वेगवेगळे प्रकार माणसाने शोधून काढले आहेत. अगदी तुम्हाला वीष देऊन सुध्दा मारण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे. तरीपण तुम्ही...’’

मला खूणेनेच थांबवत मामाजी म्हणाले, ‘‘खरंय तुझं. आम्हाला मारण्याचे अनेक प्रयत्न माणसं करत असतात. काहीजणं पिंजरे वापरतात. काहीजण जाड कागदावर गोंद लावून त्यावर खाण्याची वस्तू ठेवून आम्हाला फसवतात. तर काहीजणं खाण्याच्या पदार्थात विष मिसळून किंवा गोड वासाच्या विषारी गोळ्या शेतात किंवा घरात पसरून ठेवतात.

पण तुला म्हणून आमचं एक सिक्रेट सांगतो. आम्हाला मारायला वापरलेले विष हे जर पुरेसे प्रभावी नसेल तर आमच्या शरीरात त्या विषाची प्रतिकारक्षमता तयार होते. त्यामूळे त्या विषाचा आमच्या शरीरावर थोडाही परीणाम होत नाही. आणि आमची पुढची पिढी तर त्या विषाला अजिबात दाद देत नाही. आम्ही लई भारी आहोत, हे कळलं का?’’

मी पुन्हा एकदा हो..हो. करत मान हलवत विचारलं, ‘‘मामाजी तुमच्या कुरतडाकुरतडीचं कारण काय? कारण तुम्हाला निवांत बसलेलं कुणी पाहिलेलं नाही.’’

‘‘अरे, आम्ही जर निवांत बसलो तर आमची तोंडं फाटतील.’’

‘‘मामा कोड्यात बोलू नका. नीट सांगा हो.’’

‘‘आम्ही तुमच्यापेक्षा खूपच वेगळे आहोत. तुम्ही रात्री चाचपडता पण आम्हाला रात्री अगदी स्पष्ट दिसतं. म्हणून तर आम्हाला निशाचर म्हणतात.’’

‘‘आराम हराम आहे, कामातच राम आहे असं आमच्यात म्हणतात. म्हणून आम्ही झोपतो कमी आणि भटकतो जास्ती. भटकताना कुरतडतो जास्तीतजास्ती. कारण आम्हाला तुमच्या सारखे मठ्ठ दात नसतात तर आम्हाला वाढणारे दात असतात. आमच्या जबड्यात वर दोन व खाली दोन असे एकूण चार धारदार पटाशीचे दात असतात. हे दात आयुष्यभर वाढतच असतात. पण कठीण, कडक वस्तू कुरतडल्याने या दातांची झीज होऊन त्यांची लांबी आटोक्यात राहाते. म्हणून तर आमच्यात म्हणतात, रोज करावी कुरतडाकुरतडी नाहीतर तोंडे होतील वाकडी फाकडी. आता तरी कळलं का?’’

मी पुन्हा एकदा हो..हो. करत मान हलवली.

‘‘तुला आणखी एक आमचं रहस्य सांगतो. आम्हाला तुमच्याप्रमाणे जेवताना हे नको, ते नको, हा शाकाहारी, तो मांसाहारी, याचा उपवास, त्यांच व्रत असल्या नाठाळ खोड्या अजिबात नाहीत. आम्ही आनंदाने गटारात राहतो, घाणीत लोळतो. जे-जे मिळेल ते गट्ट करतो. इतकंच काय, आम्ही इतके चिवट आहोत की ऊंटापेक्षा जास्त काळ पाण्याशिवाय आम्ही जगू शकतो. म्हणून तर आमचा संचार जगभर आहे. बघा तुम्हाला जमतंय का?’’

हे ऐकून माझ्या अंगावर शहारा आला.

मी नकळत नम्रपणे नाही..नाही.. अशी मान हलवली.

इतक्यात कुठूनतरी हाक ऐकू आल्याप्रमाणे मामाजी क्षणभर दचकले. कान फिरवत, शेपटी हलवत त्यांनी कानोसा घेतला.

माझ्याकडे हसून पाहात म्हणाले, ‘‘ओह. निघालं पाहिजे. पण जाण्याआधी एक गंमत सांगतो. संपूर्ण जगात भाद्रपद महिन्यात आमचा भाव वाढतो. तेव्हा मात्र आम्हाला कुणी शत्रू-बित्रू म्हणत नाहीत. या महिन्यात देवाबरोबर आमची वरात काढतात. उंदीर मामा की जय असं म्हणत ओरडतात. आमचं मनोरंजन होण्यासाठी माणसं आमच्यासमोर नाचतात. काहीजणं आम्हाला ढोल वाजवून दाखवतात. झांजा वाजवून दाखवतात. आणि ज्यांना हे काहीच जमत नाही ते गुलाल उधळतात. अनेक देवळात आमचे पुतळे मी स्वत: पाहिले आहेत. माझे काही टूरिस्ट मित्र म्हणाले की, आपले पुतळे असणारी देवळं जगभर आहेत.’ हे ऐकताना तर माझ्या शेपटीवर आनंदाने काटा आला.’’

‘‘जसे आम्ही देवाच्या समोर त्याच्या पायाशी बसून असतो तसेच आमच्याच नावाचे काहीजण संगणकासमोर त्याच्या पायाशीच बसून असतात. त्यांना पण माऊस म्हणतात.’’

‘‘जे माऊस धरती आपल्या हाती, ते बसल्या जागी जग पाहती. ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील म्हणा.’’

मी पुन्हा हात जोडून नम्रपणे हो..हो. अशी मान हलवली.

- राजीव तांबे