विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी शिक्षकांना देशाचा कारभार करताना पाहिले आहे का? विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा शिक्षक देशाचे भवितव्य घडवताना ऐकले आहे का? नाही ना? अहो, असे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व आपल्या भारत देशात होऊन गेले आहे.

फक्त भारत देशातच नव्हे; तर संपूर्ण जगातच विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा कणा असतो. हा कणा जर बळकट व्हायचा असेल, तर विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक  कणखर असायला हवा, नाही का! कितीही आधुनिक तंत्रज्ञान आले, तरी शिक्षकांचे आजच्या काळातील महत्त्व कमी होत नाही, परंतु त्यांची भूमिका ही काळानुसार मार्गदर्शकाची आहे. उत्तम मार्गदर्शक हा उत्तम शिक्षक असतो शिक्षकांच्या सन्मानार्थ आपण भारत देशात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करतो. या दिवशीच आपण शिक्षकदिन का साजरा करतो?

‘तपोवनातून तुझ्या उमटली उपनिषदांची वाणी।

मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी॥

असेच एक नररत्न म्हणजे ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ होय. त्यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर १८८८ रोजी झाला. हा दिवस म्हणजे जणू भारत देशाचा भाग्यदिवस. राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्ताणी येथे एका गरीब कुटुंबात झाला. अनेक भावंडे असूनही त्यांनी बिकट आर्थिक परिस्थितीला शिक्षणाच्या आड येऊ दिले नाही. त्यांचे माध्यमिक शिक्षण तिरुपती येथे झाले. जे ठिकाण तिरुपती बालाजी मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. त्यांना खेळणे, गप्पा मारणे आवडत नसे. त्यांचा स्वभाव लाजाळू होता. त्यांना अभ्यासाची, वाचनाची खूप आवड होती. त्यांनी तत्त्वज्ञान घेऊन बी.ए.ची पदवी मिळवली. तसेच, मद्रास विद्यापीठातून त्यांनी एम.ए. केले. नंतर ते उत्तम तत्त्वज्ञ बनले. त्या गुणवत्तेमुळे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. ‘‘शिकण्यासाठी नव्हे; परंतु शिकवण्यासाठी नक्की युरोपला जाईन आणि भारतीय शिक्षणाचा, तत्त्वज्ञानाचा प्रसार करीन.’’ हे आपले म्हणणे त्यांनी वास्तवात आणले.

डॉ. राधाकृष्णन यांनी जवळपास ४० वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले. गरीब विद्यार्थ्यांना ते मोफत पुस्तके देत. त्यांचे शुद्ध, अस्खलित इंग्रजी भाषेतील व्याख्यान ऐकताना विद्यार्थी तल्लीन होऊन जात व त्यांच्याकडून प्रेरणा घेत. परदेशात त्यांनी १५ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. ते एक सफल प्राध्यापक व विचारवंत होते.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आंध्र सरकारने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना डी.लिट. ही मानाची पदवी दिली. भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब बहाल केला. ते स्वतंत्र भारताचे सुरुवातीला उपराष्ट्रपती होते. काही काळानंतर ते भारताचे राष्ट्रपती बनले. त्यांनी राष्ट्रतीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

असा हा ज्ञानयोगी २४ एप्रिल १९७५ रोजी अनंतात विलीन झाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की -

‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच!’

विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याकडून शिक्षक; तसेच आदर्श व्यक्ती म्हणून घेण्यासारखे खूप काही आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

- अंजुषा हिंगसे