आपल्या हिंदूधर्मात एक-दोन नव्हे तर तेहतीस कोटी देवांना महत्त्व दिले गेले असले तरी ‘सुखकर्ता दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया’ या एकाच ओळीतून गणेशाचे आगळेपण सिद्ध होते. चौदा विद्या, अडुसष्ट कला, पाच वेद अशांनी परिपूर्ण या भगवंताला संकट प्रसंगी हाक दिली जाते तसेच विवाहाचे वेळी, विविध ठिकाणी प्रवेश करताना, कुठल्याही चांगल्या कामाची सुरूवात करताना श्री गणेशाचे स्मरण केले असता सकल विघ्नांचा नाश होतो असा दाखला पुराणात देखील सापडतो. विद्येच्या या देवाचे स्मरण मुलांच्या प्रथम (शाळा) विद्याग्रहण प्रसंगी सुद्धा केले जाते.

असा हा वरदविनायक, महागणपती, बालगणेश, विघ्नहर्ता, लंबोदर, भालचंद्र, एकदंत, वक्रतुंड, कृष्णपिंगाक्ष, गणपती महाराष्ट्रातल्या घराघरातून प्रस्थापित झाला आहे. तसेच सार्वजनिक रित्या होणार्‍या गणपती पुजनाला सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे. अनादि अनंत काळापासून हिंदूधर्मियांच्या घरातून भाद्रपद महिन्यात गणेशचतुर्थी पासून ‘गणेशउत्सव’ साजरा केला जातो.

गणेशचतुर्थीला महत्त्व असण्याचे कारण की त्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. तर काही असे सांगतात की या दिवशी गणेशाने गणासूर राक्षसावर विजय मिळवला. या गणासूराने फक्त मानवांनाच नाही तर देवांना सुद्धा सळो की पळो करून सोडले होते म्हणून भगवान विष्णूंनी, भगवान शंकर व देवी पार्वती यांचा पुत्र म्हणून जन्मास येऊन गणासूराचा वध केला.

गणेशोत्सवात  लोक गणपतीच्या मुर्ती घरी आणून त्यांची प्रतिष्ठपना करतात. काहींकडे दिड दिवस, काहींकडे पाच दिवस तर काही ठिकाणी दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. गणपतीला आवडणारे लाल जास्वंदीचे फुल व दुर्वांची जुडी अर्पण केली जाते. खोबरे आणि गूळ यांपासून बनवलेले ‘मोदक’ यांचा नैवेद्य दाखविला जातो. या उत्सवाची सांगता गणेशमुर्तीच्या विर्सजनाने होते.

तुंदिल तनु अशा गणेशाचे शिर हे हत्तीचे आहे. सुपासारखे मोठे कान व लांब सोंड असणार्‍या गणेशाला ‘गजानन’ हे नाव त्याच्या रुपामुळे मिळाले आहे. देवी पार्वतीनी एका मुलाचा पुतळा बनवून त्याला घराची राखण करण्यास सांगितले भगवान शंकरांनी जेव्हा घरात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा या मुलाने त्यांना घरात जाऊ न दिल्याने चिडून भगवान शंकरांनी या मुलाचे शिर धडापासून वेगळे केले. नंतर जेव्हा देवी पार्वतीनी हा आपलाच मुलगा असल्याचे सांगितले तेव्हा भगवान शंकरांनी एका हत्तीचे शीर त्या मुलाच्या धडावर बसवून त्याला जीवदान दिले अशी आख्यायिका आहे.

घराघरात पूजन होणार्‍या गणपतीचे महत्त्व स्वातंत्र्यपूर्व काळात वाढले. इ. स. १८९३ दरम्यान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना  एकत्र आणून त्यांच्यात देशभक्ती जागवण्यासाठी गणेशोत्सवाचा आधार घेता येईल याची टिळकांना जाणीव होती म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान संगीतसभा, व्याख्याने, निरनिराळ्या वक्त्यांच्या सभा, पथनाट्ये यांद्वारे जनतेमध्ये इंग्रजांविरूद्ध बंडाचे बीज पेरले.

लोकांच्या मनातील गणेशोत्सवाचे भावना जरी तशाच असल्या दरी सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप खूपच झाक आली आहे. रस्त्यांवर उभारले जाणारे मोठाले मांडव, ध्वनिवर्धकांच्या मोठाल्या भिंती, मोठ मोठे देखावे यांच्यामुळे कित्येक कारागिरांच्या हाताला काम मिळते तसेच कित्येक लोकांची गैरसोयही होेते. मोठाल्या मांडवांमुळे होणारी कित्येक लोकांची गैरसोयही होते. मोठाल्या मांडवांमुळे होणारी वाहतूकीची गैरसोय, ध्वनिवर्धकांमुळे होणारे ध्वनिप्रदुषण मोठमोठाल्या गणेशमूर्ती व निर्माल्य विर्सजनामुळे होणारे नद्यांचे, पाण्याचे प्रदुषण याचबरोबर वाईट वृत्तीच्या लोकांचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात वाढणार्‍या मंडळांच्या संख्येबरोबर पूर्वंपार छोटीशी सुबक असणारी गणेशमूर्ती वेगवेगळ्या भिडणार्‍या गणेशमूर्तींमुळे श्रेष्ठत्वाच्या चढाओढीमुळे लोकांवरील आर्थिक बोजासुद्धा वाढू लागला आहे. तरीही जनसामान्यांमध्ये श्री गणेशाबद्दल असणारे प्रेम, आदर कधीही कमी होणार नाही.

 

- अनुराधा परांजपे