स्वर टिपेचा...

दिंनाक: 28 Sep 2019 15:41:45

 

 


 

शीर्षक वाचून विचारात पडलात? एवढं अगम्य नाही हो ते! आज आपण तुमच्या आवाजाबाबत बोलतोय. खूपजण विचारतात मुलांशी कशा आणि कोणत्या आवाजात बोलावं हो? यासाठीचं हे आजचं लेखन.

आपला आवाज ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे मुलांशी बोलताना तो बदलायची गरज नाही आणि घर म्हणजे काय रंगमंच आहे का तिथे आवाज बदलून बोलायला? त्यामुळे नेहमी नेहमी फार गोडगोड आणि लाडिक लाडिकच बोलायला हवंच मुलांशी असा अविवेकी विचार नकोच. कधीतरी आपण वैतागणार, चिडणार, रागावणार हे तर स्वाभाविकच आहे आणि ते असावंच. उद्या समाजात वावरताना मुलांना या भावनांना सामोरं जाण्याची गरज तर पडणारच आहे. त्यामुळे त्यांची या भावनांशी ओळख तर हवीच. पण, एक मात्र खरं, की जेव्हा हे सगळं होईल म्हणजे वैताग, राग, चिडचिड वगैरे वगैरे हो, त्या वेळी बरेचदा टिपेचा स्वर लागतो ना त्या वेळी फक्त एवढंच पाहायचं की ज्यासाठी टिपेचा स्वर लावणार आहोत त्यामागचं कारण त्या आपल्या कोकराला समजलंय ना? ते जर त्याला समजलंच नाही तर ते लेकरू अगदी ‘बिच्चारं कोकरू’ होईल ना आणि त्याचा त्याच्यावर आत्मविश्वास हरवणे, स्वप्रतिमेला ठेच पोहोचणे वगैरेसारखा वाईट परिणाम होईल. त्यामुळे टिपेचा स्वर लावण्याआधी दहा आकडे मोजायचे, लेकराला कारण सांगायचं आणि खुश्शाल टिपेच्या आवाजात दमात घ्यायचं.

आणि हो, अजून एक, टिपेचा स्वर लावायला हरकत नसली तरी तो सारखा सारखा आणि रोज रोज लावायचा नाहीच. कारण सतत वरच्या पट्टीत गाणारा गायक आपल्याला तरी आवडेल का? आणि त्याच्याकडे आपण लक्ष देऊ का सांगा बरं? त्यातूनच टिपेचा स्वर ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे, त्यामुळे तो उस्त्फुर्तपणे लागतो, हे जरी खरं असलं तरी त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न तर करता येईल. अनेकदा राग या भावनेतून हा स्वर लागतो आणि त्यातून हेटाळणी करण्याची सवय लागते. जर रागावर नियंत्रण करण्याची सवय किंवा राग व्यक्त करण्याआधी तो कसा व्यक्त करावा यावर थोडासा पुनर्विचार करणं शक्य झालं, तर चारचौघात टिपेचा स्वर नक्कीच लागणार नाही. आणि आपल्या कोकराला आपण उगाचच दुखावलं याची पश्चातबुद्धीही टाळता येईल. मग करता येईल ना एवढं?

-मेघना जोशी