ग्रंथाचे कुटुंब

दिंनाक: 27 Sep 2019 15:12:05

 


 

 

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या एका आगळ्यावेगळ्या कुटुंबाची माहीती सांगणार आहे. आवडेल ना तुम्हाला ऐकायला?

नमस्कार आमच्या कुटुंबाचे नाव आहे ग्रंथ आणि आमच्या घराचे नाव आहे ग्रंथालय. आमचे पूर्वज प्राचीन काळापासून सर्वांना माहीतच आहेत. त्यातील काही जणांना तर तुम्ही पण ओळखता. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांसारख्या आमच्या परिवारातल्या ज्येष्ठांना ओळखता की तुम्ही!  तुम्हीच काय पण यांना सगळं जगच ओळखतं. यांच्यामुळेच तर खरे आपल्या देशाची संस्कृती सर्वांना समजली.

तुम्हाला माहीत आहे का आपल्या भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील अनेक थोर व्यक्ती वाचनाने घडल्या आहेत. तुम्हाला सिकंदर माहीत असेलच युद्धाच्या अगोदर व युद्धाच्या काळात तो स्वतः त्याच्या सैनिकांसह दररोज ‘इलियड’ या ग्रंथाचे वाचन करायचा. डॉ. आंबेडकर, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. अब्दुल कलाम यांसारख्या अनेक थोर लोकांनी आमच्या कुटुंबाचा लाभ घेतला आहे. त्या बद्दलची माहीती आपण पुढच्या काही सदरात घेणार आहोत.

वाचनाचे महत्त्व तर आपल्याला माहीतच आहे. वाचनाने सर्वच क्षेत्रातील सखोल माहिती आणि ज्ञान मिळते. शब्दसंग्रह वाढतो, थोडक्यात काय तर आपण वाचनाने बहुश्रुत होतो.

बरं का मित्रांनो! आता आमचे घर पण खूप बदलत आहे. सध्याच्या संगणकीय युगात आमचे घरसुद्धा digital झाले आहे. आमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांची माहिती आपण घरी बसून वाचू शकता. आमच्या घरात कथा, कादंबरी, काव्य, संदर्भग्रंथ अशी बरीच मंडळी राहतात. यांच्यासोबतच पाठ्यपुस्तके, खेळाची पुस्तके इ. भरपूर सदस्य राहतात हळूहळू  आमच्या कुटुंबातील या सर्व सदस्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे.

 

                                                                                   -गायत्री जवळगीकर