छोटू आणि देवबाप्पा

दिंनाक: 24 Sep 2019 14:48:47

 


 

एकदा छोटू सरळ देवाकडेच गेला
जग बदलून हवंय अर्ज त्याने केला

काय देवा अशा चुका केल्यास किती
सांगायला सगळ्यांना तुझी वाटे भीती

एवढ्या गोड आंब्यात हवी कशाला कोय?
जाईजुई मोग-याला रंग विसरलास होय?

किती सुंदर गुलाब टोचतात मला काटे
अबोलिच्या रंगाला गंध हवासा वाटे

कावळे किती काळे नि गोरेपान बगळे
गोरे कर कावळे नि रंगीबेरंगी बगळे

एवढ्या मोठ्या फणसाचे गरे किती छोटे
माशांच्या अंगात आत का दिलेस काटे?

समुद्र एवढा मोठा आणि नदी केलीस लहान
इतक्या सगळ्या लोकांची कशी पुरेल तहान?

देवाने म्हणले तथास्तु छोटुने डोळे उघडले
गंमतच!!! स्वप्नच होते... काहीच नाही बदलले

-स्वाती यादव