राजगड

राजगडाबद्दल काय सांगावे आणि काय नको अशीच त्याची ख्याती आहे, एकाच वाक्यात सांगायचे तर... हा गडांचा राजा आणि राजांचा गड.

पुण्याजवळ वेल्हे तालुक्यात गुंजण मावळात बलाढ्य असा राजगड उभा आहे. या गडाची उंचीच छाती दडपणारी आहे. तीन बाजूनी सरळ उतरत गेलेल्या तीन माच्या, मधेच सरळसोट उभा बालेकिल्ला, गडावरील अभेद्य बांधकाम, हे सारे थक्क करणारे आहे.

गडावरील बुरुज, तटबंदी, दरवाजे, परकोट, आणि इतर वास्तू म्हणजे राजगादी, मंदिरे, सदर, बाजारपेठ, राजवाडा, हे सर्वच ह्या गडाचे जणूकाही अलंकार आहेत. प्रत्येक वास्तूचे बांधकाम वैशिष्ट्य म्हणजे दुर्गबांधणीतील अविष्कार आहेत,

 

 

काय आणि किती वर्णन करू?

मुरुंब देवाचा डोंगर हे या गडाचे अगोदरचे नांव, हा गड कधी निजामशाहीत तर कधी आदिलशाहीत असायचा. तोरणा स्वराज्यात आल्यावर महाराजांनी हा गड जिंकून घेतला आणि नैसर्गिकच बेलाग असलेल्या या गडावर अभेद्य असे बांधकाम करून तो बळकट केला. आणि तो राजगड या नांवाने वसविला. तोरण्यावर मिळालेल्या संपत्तीचा राजगडावरचे काम करण्यास वापर केला.

सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती या त्या तीन माच्या...! त्यातील पद्मावती माची विस्तृत आहे, त्यामुळे ही महत्वाची आहे. गडावर येण्याचे प्रमुख प्रवेशद्वार पाली दरवाजाख्र इथेच आहे, हे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. हे इतके उंच आणि रुंद आहे की हत्ती अंबारीसह सहज येऊ-जाऊ शकत असत... देवडी, परकोट, चोर दिंडी, इतके चपलख बांधले आहेत की या वरून गडाची संरक्षण सिद्धता पराकोटीची होती हे लक्षात येते.

पुढे पद्मावती देवीचे मंदिर, राजवाडा, अंबरखाना, घोड्यांच्या पागा, पाण्याचे तळे, रामेश्वर मंदिर, सईबाईंची समाधी, अशा बर्‍याच वास्तू आहेत. पद्मावती माचीवरून बालेकिल्ल्यास जाता येते, आणि बालेकिल्ला उजव्या हातास ठेऊन दिंडीतून प्रवेश करून उगवतीच्या दिशेला म्हणजेच सुवेळा माचीकडे जाता येते. जाताना मध्य भागी असलेले एक टेकाड म्हणजे डूबाख्र हा नैसर्गिक आहे. इथे जवळच तानाजी मालुसरे, येसाजी कंक यांच्या बरोबरच इतर सैनिकांच्या घरांचे अवशेष दिसतात. या पुढे बुलंद असा चिलखती बुरुज निरीक्षण करण्यासारखा आहे, त्यातील परकोट आणि चोरदिंडी यांच्या जागा अभ्यास करण्यासारख्या आहेत. हनुमान मंदिर, कालेश्वर मंदिर ही अति प्राचीन असावीत...

 बरोबर विरुद्ध बाजूला पश्चिमेकडे संजीवनी माची आहे, दुर्ग बांधणीतील एक उत्कृष्ट नमुना पहायचा असेल तर तो इथेच, त्याचे चिलखती बुरुज, भुयारी परकोट, दुहेरी तटबंदीची बांधणी पाहिल्यावर दुर्ग बांधणीच्या शात्रात त्यावेळी स्वराज्यात किती प्रगती साधली होती हे आपल्या ध्यानी येते.

या माचीच्या टोकाला बांधलेला भक्कम बुरुज, चोरवाट, अळु दरवाजा असे बांधकाम या माचीवर दिसते, या माचीवरून पुढे तोरणा गडावर जाण्यासाठी एक डोंगर-रांग आहे ती तोरण्याच्या बुधला माची पर्यंत जाते. या तीनही माच्यांच्या मध्ये उभा आहे तो बालेकिल्ला... जवळजवळ 300 ते 400 फूट उंचावर असावा, त्यात जननी देवीचे मंदिर, ब्रम्हऋषी तलाव आणि महाराजांच्या वाड्याचे अवशेष पाहता येतात.

जवळपास 22-24 वर्षे महाराजांनी याच किल्ल्यावरून स्वराज्याचे नियोजन केले आणि डावपेच आखले, ते अगदी पहिल्या लढाई पासून ते जयसिंग बरोबर झालेल्या तहापर्यंत.

राजाराम महाराजही येथेच जन्मले

 या गडाबद्दल लिहिणे किंवा बोलणे म्हणजे स्वतंत्र ग्रंथाचे वाचन करण्यासारखेच आहे!!

 

- दर्शन वाघ