पवन मावळातल्या मुळशी खोर्‍यात पवना जलाशयाच्या काठावर तिकोना गड उभा आहे. याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हा गड दुरूनही सहज ओळखता येतो आणि त्याच्या याच आकारामुळे गडाला तिकोना असे नाव पडले आहे. इतिहासाच्या कागदपत्रांत या गडाचा उल्लेख वितंडगड म्हणूनसुद्धा सापडतो; तर काही ठिकाणी अमानगड म्हणूनही या गडाला संबोधल्याचे दिसते. समुद्रसपाटीपासूनची या गडाची उंची 3580 फूट भरते; परंतु गडपायथ्याच्या तिकोनापेठ गावातून जेमतेम 800 ते 1000 फुटाची चढाई करून आपण गडमाथा गाठतो. पुण्यातून या गडाला जाण्यासाठी आपल्याला प्रथम कोथरूड इथल्या चांदणी चौकमार्गे पिरंगुट, पौड, कोळवण, तिकोनापेठ असे जाता येते.

तिकोनापेठ गावातून गड उजव्या हातास ठेवून थोडे अंतर पार केल्यावर आपली गडचढाई सुरू होते. तसा हा गड चढायला सोपाच आहे़  तरी आपली गडचढाई दोन टप्प्यांत होते.

गडपायथ्यापासून सोपी, मळलेली पायवाट धरून चालत राहिले की दहापंधरा मिनिटांतच आपण तटाखाली येऊन पोहोचतो. मध्ये आपल्याला एकदोन मेट वा चौक्याही दिसतात व वेताळ दरवाजाही लागतो. खरे तर ही वाट गडाची शिवकाळातली वाट नव्हे. शिवकाळात गडावर येण्यासाठी जी वाट होती; ती आता दगडधोंडे पडल्यामुळे बरीच अवघड झाली आहे. या वाटेवरचा पहिला दरवाजा आपणास गडावरून दिसतोही... परंतु तिथे पोहोचणे आता सुकर नाही; त्यामुळे सध्याच्या प्रचलित वाटेनंच आबालवृद्ध गडावर येताना दिसतात. याच वाटेने वेताळ दरवाजा पार करून थोडेसे पुढे गेल्यावर प्रचंड मोठ्या आकाराची मारूतीची एक शिळा दिसते. याखेरीज बुरूज, वाड्यावस्त्यांचे अवशेष, रामाची गादी म्हणजेच सदर गणेश लेणी़, त्यासमोरचे तळे असे अनेक अवशेष आपल्याला दिसतात. गडचढाईचा पहिला टप्पा इथेच संपतो.

 

 


बुरुजापासून थोड्याच अंतरावर गडचढाईचा दुसरा टप्पा सुरू होतो. तिथेच आपल्याला खोदीव पायर्‍या दिसतात. या पायर्‍या अवघड जरी नसल्या; तरी दम नक्कीच काढतात. त्या चढून आल्यावर बालेकिल्ल्यावर वितंडेश्वराचे मंदिर प्रचंड मोठ्या आकाराचे वरणतळे दिसते. पायर्‍या चढताना वाटेतच दरवाजे आणि पिण्याच्या पाण्याची टाकीही दिसतात.

पायथ्यापासून गडचढाई करताना दरवाजे, बुरूज, चुन्याचा घाणा, लेण्यापाण्याच्या टाक्यांची रचना असे सर्व वास्तू अवशेष पाहत दीडदोन तासांत आपली गडफेरी आरामात पूर्ण हेाते.

इथल्या पाण्याच्या टाक्यांची रचना विशेषत्वाने वेगळी व अभ्यासण्यासारखी आहे. गडाच्या सर्वोच्च भागातल्या प्रचंड आकाराचे वरणतळे पावसाच्या पाण्याने भरले जाते. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा यात साठवला जातो़ त्यालाच समांतर थोडे खालच्या बाजूला मंदिराखाली हेच तळ्यातले पाणी दगडांच्या झिरप्यांतून वळवले आहे. या मंदिराच्या टाक्याखाली अजून एक पाण्याचे टाके आहे. या पाण्याच्या टाक्यात मंदिराखालच्या टाक्याच्या झिरप्याचे पाणी वळवले आहे. अशा पद्धतीने दोनदा पाण्याचे शुद्धीकरण होऊन पिण्यासाठीचे पाणी जमा केले जाते. हे शुद्धीकरण होत असतानाच तिथल्या दगडांमधली अनेक खनिजे पाण्यात मिसळतात. हेच खनिजयुक्त पाणी पिण्यासाठी उपयुक्त होते.

इतिहासाच्या पानांत तिकोना गडाचे जे उल्लेख मिळतात; त्यानुसार हा गड 1658च्या सुमारास मराठ्यांनी आपल्या अमलाखाली आणला. याच प्रभावळीतल्या लोहगड, विसापूर, तुंग आदी किल्ल्यांबरोबरीनेच या किल्ल्याची जबाबदारीही नेताजी पालकर यांच्याकडे होती. तिकोना किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जाई.

शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट लोहगडावर ठेवली होती. त्या वेळी टेहळणीच्या दृष्टीने या गडाची भूमिका नक्कीच महत्त्वाची असेल. मध्यंतरीच्या काळात काही लढाया झाल्याही; पण सन 1700च्या आसपास तिकोना मराठ्यांच्याच ताब्यात असल्याचे कागदपत्रांवरून कळते. सप्टेंबर 1703मध्ये अमानुल्लाखान या औरंगजेबाच्या सरदाराने तिकोना जिंकून घेतला. याचदरम्यान या किल्ल्याचे नामांतर ‘अमानगड’ असे झाले. त्यानंतर पुन्हा हा गड मराठ्यांच्या ताब्यात यायला 1707 साल उजाडावे लागले. सन 1750मध्ये तिकोन्यावरील दारूगोळा, तोफा वगैरे जिन्नस विसापुरास हलवल्याचे उल्लेख मिळतात. पुढे सन 1818मध्ये इंग्रजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला.

 -दर्शन वाघ