रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ला हा पुणे जिल्हयाच्या दक्षिण सीमेवर भोर प्रांतात असून भोरपासून ८ कि.मी. अंतरावर वसलेले बाजारवाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातूनच किल्ल्यावर जाणारी सोपी चढण चालू होते. सहयाद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला हा किल्ला असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३६५० फूट आहे. एक ते दीड तासात ही सोपी चढण पार करून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. पहिला गणेश दरवाजा दुसरा दरवाजा व तिसरा महादरवाजा अशी तीन दरवाजांची साखळी पार करून आपला गडप्रवेश होतो. युद्धशास्त्राच्या दृष्टीने या तीनही दरवाजांची एकमेकांत असलेली गुंफण व रचना, त्यांच्या दिशा, त्यांची स्थाने हे सर्व निरखून पाहाण्यासारखेच आहे.

किल्ल्याचा पसारा आटोपशीर असला तरी तीन दरवाजे सात बुरूज मंदिर वाडेवस्त्यांचे अवशेष पंधरासोळा पाण्याची टाकीतळी, चुन्याचा घाणा, दारूगोळा कोठारं, सदर असे अनेक अवशेष असल्याने किल्ला आजही संपन्न वाटतो.

गडाच्या पूर्व बाजूला सदरेचा बुरूज शर्जा बुरूज तर पश्‍चिमेच्या बाजूला दामगुडे बुरूज, पाटणे बुरूज आहेत. उत्तरेला प्रचंड आकाराचा वाघजाई बुरूज तर दक्षिणेला त्याचीच बरोबरी करणारा शिरवले बुरूज आहे. अशा प्रकारचे बुरूज उभ्या महाराष्ट्रात फार कमी किल्ल्यांवर पाहावयास मिळतात. येथील भौगोलिक परिस्थितीला छेद देऊन किल्ल्याची व किल्ल्यावरील संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे बुरूज बांधल्याचे जाणवते. या बुरूजांचे बांधकाम तर निरीक्षण करून बघण्यासारखेच आहे. अनेक भौमितिक, भौतिक सिद्धांतांचा केलेला बेमालूम वापर तर अभ्यासण्यासारखाच आहे. 

गडाच्या उत्तर भागात एकमेकांंना संलग्न अशी सात पाण्याची टाकी, त्यांची रचना, एकमेकांतील गुंफण पाहताना पुन्हा एकदा गतकाळातील पाणी साठवणुकीचे शास्त्र किती प्रगत होते याचीच अनुभूती येते.

या व्यतिरिक्त अनेक वाड्यावस्त्या, चुन्याचा घाणा़ मंदिर सदर असे सर्व न्याहाळत गडफेरी करायला दीडएक तासांचा अवधी लागतो. 

या किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीचा मागोवा घेताना़ किल्ल्यावर अनेक सत्तांतरे झाल्याचे दिसते. हा किल्ला यादव काळात बांधला असल्याचे मानले जाते. यादव काळानंतर हा किल्ला बहमानी व त्यानंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. मार्च १६५६ साली शिवाजी महाराजंानी हिरडस मावळ प्रांतातील बांदल देशमुखांशी लढाई करून किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला. या लढाईचा शिवाजी महाराजांना दुहेरी फायदा झाला एक म्हणजे आदिलशाहीला वचक बसवून स्वराज्यात अजून एक बेलाग किल्ला दाखल झाला आणि दुसरा म्हणजे या लढाईत शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांना ठार मारल्यानंतर त्यांचे दिवाण बाजीप्रभू देशपांडे यांना स्वराज्याची आण घालून आपल्याकडे वळवून घेतले आणि स्वराज्यास आणखी एक निधड्या छातीचा वीर मिळाला. १६६५ मधील पुरंदरच्या तहानुसार या किल्ल्याचा ताबा मोगलांना दिला होता, परंतु जास्त काळ तो मोगलांच्या ताब्यात राहिला नाही. जून १६७० मध्ये हा किल्ला परत स्वराज्यात सामील करण्यात आला. सन १६७१ मध्ये शिवाजी महाराज रोहिडा पाहाण्यासाठी येणार होते, असे काही कागदपत्रांवरून समजते. १६७१ ते १६८९ या काळात हा किल्ला काही काळ मोगलांकडे तर काही काळ मराठ्यांकडे होता. १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जेमतेम चारसहा महिने किल्ल्याचा ताबा मोगलांनी घेतला. पण लगेचच १६९० मध्ये कान्होजी जेध्यांचे पुत्र सर्जेराव जेध्यांनी रोहिडा मोगलांकडून जिंकून परत स्वराज्यात आणला.  पुढे १७०७ मध्ये भोर संस्थानचे सचिव शंकराजी नारायण यांच्याकडे या किल्ल्याचा ताबा होता. शंकराजी नारायण यांचा अंत या गडावरच  झाल्याचेही काही कागदपत्रांवरून कळते. या नंतरच्या काळात १८१८ पर्यंत हा किल्ला भोर संस्थानच्याच ताब्यात होता. १८१८ - १८१९ मध्ये संस्थाने खालसा झाली आणि इतरही बर्‍याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लादेखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली येथून एका दिवसात या किल्ल्याची ऐतिहासिक सफर अगदी आरामात होऊ शकते.   

-दर्शन वाघ