निसर्गसहल

दिंनाक: 20 Sep 2019 17:11:01

 

 


 

“ आई, धबधबा म्हणजे काय? “ चिपळूणला जाताना अवनी आणि पार्थचे अधूनमधून प्रश्न चालूच होते.

“ धबधबा म्हणजे उंचावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह.” पार्थनी पुस्तकातील पाठ केलेली व्याख्या अवनीला सांगितली.

“ अगदी बरोबर..” पार्थच्या उत्तराचं मी कौतुक केलं. अवनी आता शांत बस बघू. बाहेर बघ कसा रिमझिम पाऊस पडतोय..आणि हो बाहेर बघत बस अधूनमधून छोटे छोटे पाण्याचे ओहोळ दिसतील आणि घाटाच्या कडेला बांधलेल्या या कठड्यावर माकडंही बर का!

 मी अवनीला सांगितलं तस अवनी बाहेर बघू लागली.

“ आई, हा मुंबई-गोवा महामार्ग आहे ना.?.एनएच१७ “ पार्थने प्रश्न विचारला तसं त्याच्या बाबांनी उत्तर दिलं.

“ नाही पार्थ, आधी हा एनएच १७ होता आता ६२ आहे. ” पार्थ आणि अवनी अधूनमधून एकेक प्रश्न विचारत होते.

“ आई ही कोणती ग नदी..?” चिपळूण सोडून पुढे येताना वशिष्टी नदी पाहून पार्थनी विचारलं.

“ पार्थ, ही चिपळूणची वशिष्टी नदी आहे. ही नदी चिपळूण आणि त्याच्या आजूबाजूच्या शहराला पाणीपुरवठा करते. कोकणातली ही एक मोठी नदी आहे. ही पश्चिम घाटातून प्रवास करत अरबीसमुद्राला जाऊन मिळते.” पार्थ गप्प बसून मी सांगत होते ती माहिती ऐकत होता. चिपळूण सोडून १५ मिनिटात आम्ही पेढे या गावात आलो. ‘सवतसडा’ रस्त्यावरूनच आम्हाला कोसळताना दिसत होता. अवनी गाडीतूनच ओरडली.

“ आई, waterfall, चल ना ग लगेच आपण तिथे जाऊया..” अवनीला मज्जा वाटत होती. आम्ही गाडी एका बाजूला पार्क केली. धबधब्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांची रचना केली होती. पार्थ आणि अवनी बाजूच्या लोखंडी रेलिंगला धरून भराभर पुढे जात होते. आम्ही मागे राहतोय हे पाहून पुन्हा मागे येत होते. एकंदरीत त्यांची मज्जा चालू होती.

“ आई, हा धबधबा कुठून  कोसळतोय ग..?”

“ इथे जवळच परशुरामाचे मंदिर आहे पार्थ, त्याच्या जवळून सह्याद्री पर्वतातून हा धबधबा कोसळत असतो.”

“ आई, आपण पुढच्या सुट्टीतही इथेच यायचं हा..” अवनी उड्या मारत म्हणाली.

“ नाही अवनी, हा काही बारमाही कोसळणारा धबधबा नाही. हा फक्त पावसाळ्यात पडतो. म्हणूनच इथे फक्त पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते.” त्यानंतर आम्ही धबधब्याजवळ पोहचलो. अवनी बाबाजवळ होती. तर पार्थ माझ्यासोबत. दोन-अडीच तास धब्याधाब्याखाली सगळ्यांनी मनसोक्त मज्जा केली, फोटो काढले, एकमेकांवर पाणी उडवलं. त्यानंतर मात्र दोघानाही कडकडून भूक लागली. रिमझिम पावसालाही सुरुवात झाली होती. तेथेच असलेल्या खाण्याच्या स्टॉलवर मुलांनी गरमागरम भज्यांवर ताव मारला. थोडावेळ तिथे थांबून नंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परत येताना आम्ही विसावा पॉईंटजवळ थांबलो तिथून पूर्ण शहराचे, आजूबाजूच्या हिरवळीचे दर्शन होत होते. अवनी व पार्थ हे दृश बघून हरखून गेले. शहरात फक्त सिमेंटची घर दिसतात. इथे मुलांना खरा निसर्ग दिसला. पार्थ आणि अवनी आज खूप खुश होते. वर्षातून निदान एकदा तरी मुलांना निसर्गसहल घडवायची अस ठरवून आम्ही मागे फिरलो.

 

-उत्कर्षा सुमित