मुलांनो, कोणतेही काम करताना आपल्या मनात 'मला यातून काय फायदा' असा

विचार येतो. परंतु असा विचारही मनात न आणता, सर्व जगासाठी निस्पृहतेने काम केलेल्या

मेरी क्युरी या शास्त्रज्ञ स्त्रीची ही कहाणी आहे ..

 

पोलंड या देशातल्या वॉर्सा नावाच्या नगरात ७ नोव्हेंबर १८६७ मध्ये मरिया उर्फ मेरी

रक्लोडोव्हस्का हिचा जन्म झाला. अत्यंत हुषार असलेल्या मेरीने, मोठे झाल्यावर सन १८९३

मध्ये फिजिक्समध्ये आणि पाठोपाठ सन १८९४ मध्ये गणितात एमएस्सी पदवी मिळवली. पुढे

तिला साथ देणारा अनुरूप पतीही मिळाला. त्याचे नाव पिअरी क्युरी. संशोधनाची आवड

पतीपत्नीला स्वस्थ बसू देईना . अथक प्रयत्नांनी मेरीने १९०२ मध्ये युरेनिअमच्या शेकडो पट

प्रखर किरण असलेल्या, रेडिअम या धातूचा शोध लावला, अर्थातच पतीराजांच्या मदतीने .

त्याबद्दल १९०३ मध्ये त्यांना जगातले सर्वोच्च असे नोबेल पारितोषिक मिळाले .

 

एक दिवस पतिपत्नी सकाळच्या कोवळ्या उन्हात चहापान करत असताना पिअरी

म्हणाला - 'मेरी, या नोबेल पारितोषिकाने आपण जगद्विख्यात आणि श्रीमंतही झालो आहोत.

आता आपण या शोधाचे पेटंट घेऊयात.'

'कशासाठी ?' मेरीने विचारले .

'पेटंट घेतले की रेडियमच्या संशोधनावर आपलाच मालकी हक्क राहील. त्यामुळे आपल्याला

परवाना फी च्या रूपात लोकांकडून बरेच पैसे मिळतील . आपण आणखी श्रीमंत आणि

कीर्तिमंतही होऊ !-पिअरी.

मेरी फक्त हसली आणि म्हणाली . 'पिअरी, जरा या खिडकीकडे आणि त्यातून आत येणाऱ्या

सूर्यप्रकाशाकडे बघ.'

'म्हणजे?' - पिअरी.

'अरे हा सूर्यप्रकाश या खिडकीतूनच आत येतोय . पण म्हणून खिडकीने सूर्यप्रकाशावर हक्क

सांगितला, तर चालेल का ?' - मेरी.

'मी नाही समजलो .'- पिअरी.

'हे बघ . जगातले सर्व ज्ञान त्या परमेश्वराचे आहे. अगदी रेडिअमचे सुध्दा! पण ते

आपल्याद्वारे प्रगट झाले म्हणून आपण त्याच्यावर हक्क सांगायचा का? सूर्यप्रकाशावर खिडकीने

 

हक्क सांगणे जसे चुकीचे, तसे रेडियमच्या शोधावर आपण हक्क सांगणेही चुकीचेच आहे.

उलट ते ज्ञान प्रगट करण्यासाठी, माध्यम म्हणून आपली निवड केली, याबद्दल आपण

परमेश्वराने आभार मानूया .' - मेरी .

पिअरी मनातून खजील झाला पण लगेच सावरून म्हणाला 'मेरी, मी तुझा आभारी आहे, मला

पैशाच्या मोहातून सावरल्याबद्दल!

पुढे मेरीने युध्दातल्या जखमी सैनिकांवर उपचार करणे आणि कॅन्सरवरील उपायाचे

संशोधन यासाठी आपले जीवन वाहून घेतले. तिने शोधलेल्या रेडियमचा वापर मानवी

जीवनातील सर्वच क्षेत्रात होऊ लागला. कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीवरही तो रामबाण उपाय

ठरला . आपल्या शोधाचे पेटंट घेऊन खरेतर मेरी फीच्याद्वारे अफाट पैसे मिळवू शकली

असती. पण तिने आपले संशोधन निस्पृहपणे जगाला बहाल केले . एक पैसाही न घेता! पण

तिची निस्पृहता वाया गेली नाही. तिला सर्व जगाचा दुवा आणि थोरामोठयांचे आशीर्वाद

मिळाले . परमेश्वराने मग तिच्यावरच नव्हे तर तिच्या सर्व परिवारावर कृपेची बरसात केली .

१९११ मध्ये तिला पुन्हा एकदा नोबेल पारितोषिक मिळालेच मिळाले, पण पुढे १९३५ मध्ये तिच्या

पश्चात तिची मुलगी आयरिन आणि जावई फ्रेडरिक यांनाही रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक

मिळाले . संपूर्ण परिवार नोबेल पारितोषिकाने सन्मानित झाला . एकाच कुटुंबात चौघांना नोबेल

पारितोषिक मिळण्याचे हे जगातले एकमेव उदाहरण! मेरीच्या निस्पृहतेचे फळ तिला असे

मिळाले .

-अविनाश हळबे