सन २००५:

छोट्या तेतेईचे आजोबा आज सकाळपासूनच खूप चिंतीत दिसत होते. तेतेईच्या ते लक्षात आलं आणि तिने लगेच ते आपल्या दादाला - इओमा ला सांगायचं ठरवलं. पण अजून इओमा शाळेतून आला नव्हता.  मग तिने थोडा वेळ दादाची वाट बघायची असं ठरवलं. थोड्याच वेळात इओमा शाळेतून परत आला.   तेतेईने लगेच धावत त्याच्या जवळ जाऊन त्याला सांगितलं, "दादा, आज आजोबांना बहुतेक बरं वाटत नाही. ते माझ्याशी नेहेमीसारखे खेळले नाहीत आणि कुणाशी नीट बोलत पण नाहीत..तू विचार ना त्यांना... " मग इओमानेही प्रयत्न केला खरा, पण खरंच आज आजोबा कुणाशीच नीट हसून बोलत नव्हते. तेतेई आणि इओमा चे आजोबा म्हणजे माफाका हे सुमारे ७५ वर्षांचे होते. गावातले सगळे  लोक त्यांना खूप आदर आणि मान देत. गावातल्या अनेक प्रश्नांविषयी ते लोकांना मार्गदर्शन करत. लोकांचा त्यांच्यावर फार विश्वास होता. माफाका आज सकाळपासून खरंच फार चिंतीत होते कारण त्यांनी काहीतरी असं पाहिलं होतं ज्यामुळे त्यांच्या मनात फार मोठी भीती दाटून आली होती. असं काय पाहिलं होतबरंत्यांनी?

जेमतेम एक हजार लोकवस्तीचं हे छोटंसं गाव होतं. भारतातल्या अगदी टोकावरच्या राज्यातलं - मिझोरममधलं. मिझोरम हे भारतातलं अगदी पूर्वेचं एक छोटं पण  हिरवंगार, दाट वनांनी नटलेलं आणि डोंगरदऱ्यांचं राज्य. बहुतेक लोकवस्ती अरण्यात राहणारी आणि त्यावरच उपजीविका करणारी. मिझोराम पूर्वेला असल्याने तिथे दिवस फार लवकर उजाडतो. माफाका नेहेमीसारखे पहाटे ४ लाच  फिरायला बाहेर पडले होते. मात्र त्यांनी आज एका विशिष्ट प्रकारची फुले यायला सुरुवात झालेली पाहिली आणि त्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. ती फुले होती बांबूची. खरंतर झाड-झुडुपांना फुले येतांना पाहणे हा किती सुंदर अनुभव असतो. पण बांबूची फुले पाहून माफाका अस्वस्थ का झाले? याचं कारण असं होतं कि, बांबूला फुले येणे हे मिझोरम मध्ये चांगले मानले जात नाही. फक्त मिझोराम मध्येच नव्हे तर भारताच्या सगळ्या पूर्व आणि ईशान्य राज्यांमध्ये, तसेच चीन, जपान, म्यानमार, तिबेट, आफ्रिका असे जिथे जिथे बांबूची बने आहेत अशा सर्व ठिकाणी बांबूला फुलोरा येणे हे एक धोक्याचे चिन्ह मानलं जातं. बांबूच्या फुलांना "दुष्काळाची फुले" असं म्हंटलं जातं.

माफाकांनी ज्या बांबूला फुले येण्याची चिन्हे पाहिली होती तो बांबू होता - मेलोकॅना  बॅसीफेरा (Melocannabaccifera) या जातीचा. सुमारे ४८ ते ५० वर्षांनीच या बांबूला फुले येतात. ४८ वर्षांपूर्वी जेव्हा त्या बांबूला फुले यायला सुरुवात झाली होती तेव्हाचे भीषण दिवस आठवून माफाका अस्वस्थ झाले होते.  बांबूची फुले आणि दुष्काळ यांचे असे काय नाते आहे? 

इतर बहुतांश झाडांसारखी बांबूला दर वर्षी फुले येत नाहीत . खरंतर बांबू हे झाड नसून तो गवताचाच  एक प्रकार आहे. त्याच्या एका मुळापासूनच अनेक शाखा फुटतात  आणि मोठ्या होत जातात. पुढे पुन्हा नवीन मुळांचे जाळे मातीखाली तयार होते.  काही वेळी मूळ खोडाला नव्या शाखा फुटत जातात आणि बांबूचे बन तयार होते. बांबू फार वेगाने वाढतात. काही जाती तर दिवसाला एक-दीड फूट उंच होतात. त्यामुळे बांबूला पुनरुत्पादन करण्यासाठी फुलांची गरज नसते. मात्र काही विशिष्ट परिस्थितीतच बांबूला फुले येतात. जगात ज्या ज्या प्रदेशात बांबूची बने उगवतात,तिथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या लोकांनी  हे निरीक्षण केलेले आहे की, बांबूच्या विशिष्ट जातींना विशिष्ट वर्षांनीच फुलोरा येतो. बांबूच्या काही जातींना २५ वर्षांनी, काहींना ४८ वर्षांनी तर काहींना अगदी १२० वर्षांनी फुले येतात. बांबू  बहुतेक वेळी पाणथळ जागी म्हणजे जमिनीत भरपूर पाणी असते तिथे, वेगाने वाढतात. बांबूला फुले येणे म्हणजे  जमिनीतले पाणी कमी होण्याचे लक्षण मानले जाते. जेव्हा बांबूच्या झाडांना जमिनीतले पाणी कमी होते आहे याची जाणीव व्हायला लागते तेव्हा पुनरुत्पादन करण्यासाठी नेहेमीप्रमाणे मुळातून किंवा आधीच्याच खोडातून नव्या शाखा निर्माण करणे हे मार्ग उपयोगाचा नाही हे कळते. त्यामुळे  पुढील पिढी दुष्काळी भागापासून दूर जन्माला यावी यासाठी बांबू फुले निर्माण करतात. ही फुले एक-दोन नाहीत तर प्रचंड संख्येने उमलतात. मग फुले येणाऱ्या इतर झाडांप्रमाणे फ़ुलांचे जीवनचक्र हळूहळू  पूर्ण होऊन शेवटी बिया तयार होतात आणि त्या सगळीकडे पसरतात. वाऱ्यामुळे  आणि कीटक, उंदरांसारखे  छोटे प्राणी  यांच्याद्वारे या बिया खूप  दूरदूरवर जातात आणि जिथे योग्य पाणी, हवामान मिळेल तिथे रुजतात आणि नवे आयुष्य सुरु करतात. 

जगात अनेक ठिकाणी असेही नोंदले गेले आहे की, जर एकाच जातीचे बांबू जगात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असले तरी त्यांना जवळपास एकाच वेळी फुलोरा येतो. उदाहरण द्यायचे तर, Phyllostachys bambusoidesया जातीच्या बांबूला सुमारे १२० वर्षांनी फुले येतात. मग ते जगातल्या कोणत्याही देशात असले तरी या जातीची सगळी बांबूची बने एकाच वेळी फुलू लागतात! १९६० साली या जातीचे जगातले सगळे बांबू फुलले होते. अर्थात असे का होते याचे गूढ शास्त्रज्ञांना काही अजून उलगडले नाही.परंतु नेहमीच्या मार्गाने आपला वंश जर वाढणार नसेल तर खबरदारीचा उपाय म्हणून असे होत असावे.

माफाकांच्या चिंतेचे कारण होते ते असे- बांबूला फुले येणार म्हणजे जमिनीतले पाणी कमी झाल्याचे लक्षण. पाऊस कमी आणि साहजिकच पीकही  कमी. दुष्काळी परिस्थितीत फक्त त्यांच्या गावाची  नाही तर पूर्ण मिझोरामची  परिस्थिती फार वाईट होते याचा ४८ वर्षांपूर्वीचा त्यांचा अनुभव होता. त्यांच्यासारख्या सगळ्या जुन्या-जाणत्या लोकांच्या मनात मागच्या दुष्काळाची आठवण जागी होती. पण फक्त अवर्षण आणि नापिकी इतकेच नाही तर बांबूची फुले आणखी एक मोठे संकट घेऊन येतात.  बांबूची फुले मोठ्या संख्येने फुलतात आणि त्यांच्या बिया दूरवर जाव्यात यासाठी या फुलांकडे कीटक आणि उंदीर आकर्षित व्हावेत म्हणून ही फुले भरपूर स्टार्च आणि साखरयुक्त असतात. फुले आणि त्यांच्या बियांचा आजूबाजूच्या जमिनीवर जणू पाऊसच पडू लागतो. मग आजूबाजूच्या उंदरांना त्यांचा वास लागतो आणि ते या पौष्टिक खाऊवर तुटून पडतात! इथवर सगळं नैसर्गिक आहे, पण मिझोरामचा खरा प्रश्न त्यानंतर सुरु होतो. हे उंदीर अचानक मिळालेल्या या भरपूर अन्नामुळे खूप पिल्ले जन्माला घालतात आणि लवकरच त्यांची संख्या प्रचंड होते! लाखोंच्या संख्येने हे उंदीर जन्माला येतात. हळूहळू ते बांबूच्या बनांमधून बाहेर पडून मानवी वस्तीत शिरतात आणि तिथल्या अन्नसाठ्यावर हल्ले करतात. शिवाय शेतात लावलेली पिके, त्यांची मुळे , कणसे  आणि भातशेती हे सगळेच खाऊन फस्त करतात. त्यांना आवरणे मुश्किल होऊन जाते.

१९५९-१९६० मध्ये  याच प्रकारच्या  दुष्काळामुळे आणि उंदरांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये मिझोरामचे अन्नसाठे संपले होते. लोक भुकेने तडफडत प्राण गमावत होते! शिवाय या उंदरांनी प्लेगचे जंतूही आणले! आधीच पाऊस नाही म्हणून दुष्काळ, मग उंदरांनी उरलेले अन्नसाठेही खाऊन टाकणे आणि पिके नष्ट करणे, आणि शेवटी प्लेगचा विळखा  अशा दुष्टचक्रात मिझोराम सापडले होते. त्या काळात मिझोराममध्ये  सुमारे १० ते १५ हजार लोक भुकेने आणि प्लेगने मरण पावले होते! रस्तोरस्ती लोकांचे, प्राण्यांचे मृतदेह पसरलेले आहेत असे विदारक दृश्य दिसत असे. गावे उजाड झाली होती आणि जिकडे तिकडे उंदीर आणि मृतदेह खाणारे इतर प्राणी, पक्षी दिसत होते.  त्यापूर्वी ब्रिटिश काळात १९११ साली आणि त्याआधी १८६३ साली असेच भीषण दिवस मिझोरामने अनुभवले होते.  

या साऱ्या आठवणी माफाकांना अस्वस्थ करत होत्या. माफाकांनी गावाची बैठक बोलावली. त्यांनी आणि इतर जुन्या लोकांनी पूर्वीचे अनुभव सांगितले. पुन्हा मागचीच परिस्थिती ओढवू नये यासाठी काय करावे अशी बरीच चर्चा झाली. लोकांनी अनेक मार्ग सुचवले. जसे बांबूची फुले आधीच तोडून टाकणे, मका आणि भातशेती न लावणे किंवा जाळून टाकणे, आणि शेवटी दिल्लीकडे मदत मागणे आदी. हे उपाय करण्याशिवाय दुसरे मार्गच नव्हते. बांबूची फुले नाही पसरली तर उंदीर तरी येणार नाहीत असा सगळ्यांचा अंदाज होता. पण हे उपाय शेवटी  विध्वंसकच होते. शाश्वत उपाय कुणाकडेच नव्हता. शिवाय येणारे अवर्षण चुकणार नव्हते. तेतेई, इओमा आणि गावातली सगळी छोटी मुले हे सगळे लक्षपूर्वक बघत होती. मनात साठवून ठेवत  होती. येते दिवस कठीण असणार आहेत हे त्यांना कुणी न सांगता कळत होते.  

जसे या गावात झाले तसेच सगळ्या मिझोराम मध्ये झाले. २००५ ते २००७ या दोन वर्षात मिझोराम मध्ये मोठा दुष्काळ पडला, अन्नधान्याचे उत्पादन अतिशय कमी झाले. परिस्थिती खूप अवघड झाली. मिझोरामने केंद्र सरकारकडे मोठी मदत मागितली आणि आपले नागरिक कसेबसे वाचवले. तरीदेखील अनेक लोक भुकेने आणि कुपोषणाने मरण पावले. तेतेईचे गाव सुद्धा दोन वर्षे उजाड झाले  होते! सगळे लोक अन्नाच्या शोधात दुसरीकडे गेलेले होते. मात्र आपल्या प्रदेशावर अतिशय प्रेम असलेली ही माणसे २००७ सालानंतर पुन्हा  परत आली . पुन्हा त्यांनी जिद्दीने आपली गावे वसवली आणि शेते पिकवली! पुन्हा शाळा सुरु झाल्या. मुलांच्या आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने गावे ताजीतवानी झाली.  

इओमा आणि तेतेईने मात्र आपसात काही ठरवले होते आणि त्यांना ते आपल्या कुटुंबाला सांगायचे होते. त्यांचे आजोबा आता आणखीच वृद्ध झाले होते, थकले होते. एका संध्याकाळी प्रार्थना झाल्यावर इओमा आणि तेतेईने अंगणात झाडाखाली बोलत बसलेल्या आई-बाबा आणि आजोबांना सांगितले, "आम्ही मागच्या दोन वर्षांचा अवघड काळ पाहिला, भुकेले राहावे लागल्यावर काय होते हे पाहिले, आणि आम्ही उपाशी राहू नये म्हणून तुम्ही मोठ्या माणसांनी आपले अन्नही आम्हाला कसे दिले हेही पाहिले.  पण जेव्हा पुन्हा ४८ वर्षांनी त्या बांबूला फुले येतील तेव्हा आतासारखी परिस्थिती नक्की येणार नाही. ती येऊ नये म्हणून आम्ही आणि आमच्यासारखे अनेक जण प्रयत्न करू. आम्ही तेव्हा मोठे झालेले असू. दुष्काळावर आणि हल्ला करणाऱ्या उंदरांवर मात कशी करायची याचे उपाय आम्ही नक्की शोधून काढू ...  आमच्यासारखी कितीतरी मिझो मुले आणि भारतातली इतर ठिकाणची मुलेही  मोठी होऊन यासाठी आम्हाला मदत करतील..." 

मेलोकॅना  बॅसीफेरा (Melocannabaccifera)  जातीच्या मिझोराम मधल्या बांबूला पुन्हा २०५३-५४ या वर्षी फुले येतील. तुम्ही असाल का तेव्हा  इओमा, तेतेई आणि मिझोरामच्या इतर लोकांच्या मदतीला? मला तुमचे उत्तरनक्की  पाठवा, मी वाट बघते आहे. 

**

- अपर्णा जोशी

[email protected]

Indian Institute of Science Education and Research (IISER), Pune