नमन शारदेचे...!

दिंनाक: 14 Sep 2019 15:06:55


 माझ्या छोट्या दोस्तांनो,

मला सांगा, गणपती बाप्पा आल्यावर तुम्ही खूप धम्माल केली ना? मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं ते. सगळ्यांनी मिळून झांजा वाजवून बाप्पाची आरती करायची अन् रोज छान छान प्रसाद खायचा. जेवणातही रोज गोड गोड खाऊ. मग काय मोदक बिदक खाल्लेत की नाही भरपूर. उकडीचे, तळणीचे, खव्याचे, गुलकंदाचे रंगीबेरंगी मोदक. आणि हो श्लोक, स्तोत्रं वगैरे म्हणायला शिकलात की नाही? का आपला नुसताच प्रसादावर डोळा. ही आपली गंमत हं...

आपण देवाच्या स्तुतीचे, वर्णनाचे जे श्लोक म्हणतो ना, ते कधी तुम्ही चालीवर, सुरांत म्हणून पाहिलेत? छे छे... त्यात काही कठीण नसतं. सुरांच्या साहाय्यानं म्हंटले ना की तेच श्लोक जास्त भावपूर्ण, मनापासून म्हटल्यासारखे वाटतात आणि तुम्हाला माहिती आहे का की, ज्या गोष्टी समूहाने म्हणायच्या असतात ना, त्याच्या चाली खूप सोप्या असतात. म्हणजे अगदी दोन-तीन स्वरातच, खाली-वर आवाज बदलायचा.

आता हेच पाहा. गणपती बाप्पांचा तुम्हाला माहीत असलेला श्लोक ....

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ।्।

कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी, ते काम नीट पूर्ण व्हावं, त्यात काही अडचणी (विघ्नं) येऊ नयेत म्हणून आपण या श्लोकामधून गणपतीची प्रार्थना करतो. मग तो असा सुरांत म्हणून पाहिला तर?

तसाच आणखी एक नेहमी तुम्ही म्हणता तो श्लोक....

देवी शारदेचा.... सरस्वतीचा.

या कुन्देन्दु तुषार हार धवला । या शुभ्र वस्त्रावृता । 

या वीणावर दण्डमंडित करा । या श्वेत पद्मासना ।्।

 या ब्रह्माच्युत शंकर: प्रभ्रृतीभि: । देवै: सदा वन्दिता।

सा माम् पातु सरस्वती भगवती। नि:शेष जाड्या पहा।्।

आवडेल ना तुम्हाला हे सुरात म्हणायला. म्हणून पाहात जा, मग जमेल हळुहळू.

आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. बर्‍याच वेळी असं होतं की हे श्लोक ऐकून ऐकून पाठ केले जातात. आपले आजोबा, आजी, आई यांच्याबरोबर म्हणत म्हणत ते पाठही होऊन जातातङ्ग पण थोडं मोठे झाल्यावर याचा अर्थही समजून घ्यायला हवा. अर्थ न कळता म्हणणं काही बरोबर नाही बरं कां. आम्हीसुद्धा तुमच्यासारखे लहान होतो ना, तेव्हा असंच अर्थ न समजता, रोज ही प्रार्थना म्हणायचो. आणि मला अजूनही आठवतंय, शेवटच्या ओळीत ... नि:शेष जाड्या पाहा ... म्हणताना वर्गातल्या जाड्या मुलाकडे पाहून गालातल्या गालात हसायचो. आहे की नाही मोठ्ठी गंमत? ...........काय? तुम्ही पण असंच करता ना?

मग तुम्हाला या मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगणारा हा श्लोक ऐका. याला समश्लोकी भाषांतर असं म्हणतात. देवी सरस्वती कशी आहे आणि आपण तिची प्रार्थना कशासाठी करायची, हे या श्लोकात सांगितलंय. जी चंद्रासम शुभ्रकांती विलसे । जी श्वेतवस्त्रा असे ।

वीणेने कर दोन शोभती जिचे । जी श्वेतपद्मी वसे ।्।

ब्रह्मा विष्णु शिवादि देवही जिला । भावे सदा वंदिती ।

माझे रक्षण श्री सरस्वती करो । अज्ञान नाशून ती।्।

देवी सरस्वती विद्येची देवता. दसर्‍याला पाटीपूजन करून, देवी सरस्वतीची प्रार्थना करून आपण श्री गणेशा करतो... म्हणजेच शिकायला सुरुवात करतो. सुरुवातीला कोणत्याही देवाला बाप्पा म्हणणारे आपण, हळुहळू प्रत्येक बाप्पाचं वेगळेपण समजून घेतो. मग फक्त गणपती हा कायम ‘बाप्पा’ राहतो आणि मग राम, कृष्ण, शंकर, हनुमान असे निरनिराळे देव आपल्याला ओळखू यायला लागतात. त्यांच्या हातात असणार्‍या निरनिराळ्या गोष्टींवरून, तर कधी त्यांच्या विशिष्ट पोझवरून त्यांचं रूप आपल्या मनात ठसतं.

तसंच पांढरी शुभ्र साडी नेसलेली, पांढर्‍या शुभ्र (श्वेत) कमळात बसलेली, दोन्ही हातांनी वीणा वाजवणारी अशी सरस्वतीची मूर्ती आपण नेहमी पाहतो. ब्रह्मा, विष्णू (अच्युत), महेश यांसारखे मोठमोठे देव (प्रभ्रृती)सुद्धा जिला मनोभावे वंदन करतात, अशा सरस्वतीची आपण प्रार्थना करतो आणि आपलं अज्ञान (जाड्य) दूर करून माझं रक्षण कर अशी विनंती या सरस्वती देवीच्या श्लोकातून करतो.

 याचं देवी शारदेचं एक छानसं गाणं मी तुमच्यासाठी लिहिलंय आणि त्याला चाल लावली आहे. पाहा तुम्हाला आवडतं कां?

हे नमन शारदेस । हे वीणाधारिणी ।

प्रथम नमन करूनि तुजसि । लाभो कृपाप्रसाद ॥

सप्तस्वर तुझे दास । करिती चरणी तव, निवास ।

साधक मी हीच आस ।

प्रथम नमन करूनि तुजसि । लाभो कृपाप्रसाद ॥

मग छोट्या दोस्तांनो असे श्लोक आणि गाणी, अर्थ समजून तालासुरांत म्हणायची प्रॅक्टिस करा बरं कां.

मला सांगा हं म्हणून पाहिल्यावर.

- मधुवंती पेठे