बक्षीस...

दिंनाक: 14 Sep 2019 18:02:27


 

गेले आठ दिवस शाळेत नुसती धूमधाम सुरू होती. प्रत्येक वर्गातले विद्यार्थी एकच धावपळ करत होते. शाळेचा गणेशोत्सव सुरू होता आणि त्यानिमित्त शाळेत उपक्रमांची स्पर्धा होती. सगळे वर्गशिक्षक आपल्या वर्गाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची तयारी करत होते.

पाचवीच्या वर्गातील मुलं तक्ते, तोरणे, पताका असं सगळं लावून घेण्यासाठी शिपाईकाकांना आणि मोठ्या वर्गातील दादांना बोलवत होती. मोठी मुलं, मुली उत्साहाने काम करत होती. हळूहळू कुजबुजत काम करताना मजा येत होती. कारण कुणी काय उपक्रम केलाय, ते एकमेकांना कळू द्यायचं नव्हतं. सगळे उपक्रम आणि प्रकल्प हे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक येऊन पाहणार होते. त्यावर प्रश्‍न विचारणार होते. त्याची तयारी शिक्षक करून घेत होते. रोजचा अभ्यास सांभाळून हे सगळं चाललं होतं.

काही वर्गांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं पाठांतर सादरीकरण ठेवलं होतं. काहींनी चित्रकलेच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्या मांडल्या होत्या आणि त्याबद्दल मुलं-मुली बोलणार होते. काहींनी संगीत विषयातून सादरीकरण ठरवलं होतं. विविध काव्यप्रकार ते सादर करणार होते. वर्गातून पोवाडे, गौळणी, कोळीगीतं, समरगीतं ऐकू येत होती. एका वर्गाने नाट्यवाचन, तर दुसर्‍या एकाने नाटक बसवलं होतं.

सातवीच्या एका वर्गाने गणितातले पाढे आणि त्यातल्या गमतीजमती, नवीन पाढे तयार करणे असा उपक्रम शोधला होता. खूप जोरदार तयारी चालली होती.

दहावी डच्या वर्गात मात्र काहीच हालचाल नव्हती. त्यांना एकतर सगळे नावं ठेवायचे. अभ्यासात ते खूप हुशार नव्हते, पण मदतीला सदैव पुढे. त्या वर्गातला अमित हा दिव्यांग मुलगा होता. तो पाचवीत आल्यापासून त्याला सगळे खूप जपायचे. रोज त्याचे वडील त्याला उचलून घेऊन यायचे. सगळे विद्यार्थी त्यांना मदत करायचे. दिवसभर अमितला जपायचे. डबा उघडून द्यायचे, त्याच्याबरोबर आपली पोळी-भाजी शेअर करायचे. मैदानात किंवा इतर व्याख्यानासाठी कुठे जायचं असेल, तर अमितला सोबत म्हणून कुणी ना कुणी वर्गात बसायचे. परीक्षेच्या वेळी त्याला जास्त वेळ दिला जायचा, तेव्हा त्याचा पेपर होईपर्यंत दोन-चार जण थांबायचे. अमितवर सगळ्यांचा खूप जीव होता. अमित शांत, अभ्यासू, समंजस होता. तोही दर वाढदिवसाला मित्रांना खाऊ द्यायचा.

एरवी दहावी डच्या वर्गाचा खूप दंगा चालायचा. अभ्यास अजिबात नाही, शिकवण्याकडे लक्ष नाही, गणवेश, शिस्त, वेळेवर येणे, गृहपाठ करणे, निबंध वह्या देणे या सर्व बाबतीत या वर्गातले विद्यार्थी अजिबात गंभीर नव्हते. उशिरा येऊन रोज नवे नवे बहाणे ते शिस्तीच्या शिक्षकांना सांगायचे. दिलेली शिक्षा हसत हसत घ्यायचे आणि शिक्षकांच्या रागाचा पारा चढायचा.

या उपक्रमांच्या स्पर्धेत या वर्गाने भाग घेतला नाही आणि बाकीच्या वर्गांची लगबग बघताना ते नुसतेच फिरत होते. कुणी मदत करायला बोलावले, तर बाक सरकवायला; तक्ते लावायला जात होते.

उपक्रम स्पर्धेचा मुख्य दिवस उजाडला. तपासणी पथक वर्गावर्गात जाऊन प्रश्‍न विचारत होतं. मुलांचं काम पाहत होतं. शाबासकी मिळत होती. नंबरची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. दुपारच्या सुट्टीनंतर निकाल जाहीर होणार होता. माईकवरून सूचना मिळाल्यावर सर्व वर्ग चौकात एकत्र आले. वर्गशिक्षक आणि विद्यार्थी खूप अधीर झाले होते. मुख्याध्यापकांनी थोडे प्रास्ताविक केले आणि ते म्हणाले, ‘‘मुलांनो, उपक्रम या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत तुम्ही खूप अहमहमिकेने भाग घेतलात. वर्गशिक्षकांनी आणि तुम्ही कष्ट केले आणि 8 दिवस हा उपक्रम राबवलात, तुम्ही तुमच्या वर्गात. आज मी सर्व वर्गांचे खूप कौतुक करतो आणि निकाल जाहीर करतो. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे, ...सरांनी खूप मोठा श्‍वास घेतला. सर्वांचे कान टवकारले. ते म्हणाले, ‘‘प्रथम क्रमांक ‘इ. दहावी ड’ या वर्गाला देण्यात येतोय.’’

सर्वच मुलं कुजबुजायला लागली. ‘‘त्या वर्गाने भागच घेतला नाही आणि त्याला पहिलं बक्षीस? हे बरोबर नाही. असं कसं? याला काय अर्थ आहे’’, वगैरे चर्चा सुरू झाल्यावर मुख्याध्यापकांनी सर्वांना थांबवलं आणि ते म्हणाले, ‘‘हे बघा, तुम्हाला आश्‍चर्य वाटणं स्वाभाविक आहे; पण तुम्ही सर्व 8 दिवस हे उपक्रम करता आहात आणि दहावी डचा वर्ग गेली 6 वर्षे रोज, सातत्याने एक उपक्रम करतो आहे. इ. पाचवीपासून वर्गातल्या दिव्यांग अमितला सांभाळणं, उचलणं, व्हीलचेअरची ने-आण करणं, वर्गातील सर्वांनी मिळून, वर्गणी काढून अमितसाठी व्हीलचेअर खरेदी करणं, अमितची सख्या भावाप्रमाणे सर्वतोपरी काळजी घेणं, त्याला खाऊ-पिऊ घालणं; हे सगळं म्हणजे दहावी डचा उपक्रमच आहे ना? आणि हा वर्ग कुठल्याही स्पर्धेत उतरला नव्हता, पण त्यांचा उपक्रम गेली 6 वर्षे सुरू आहे. या मुलांनी हे सगळं अत्यंत सहजपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता केलंय. अमित आणि त्यांच्यातल्या मैत्रभावाला हे बक्षीस आहे. दहावी डच्या सामाजिक जाणिवेला हे बक्षीस आहे. भले ते अभ्यासात नसतील हुशार किंवा त्यांनी वर्ग नसेल सजवला! एका दिव्यांग मुलाला मदत करण्याची त्यांची ऊर्मी मनापासूनची आहे. हाच खरा उपक्रम; म्हणून हे पहिल्या नंबरचं बक्षीस त्यांना मिळतंय. त्यांचं काम या बक्षिसापेक्षाही मोठं आहे. दहावी डच्या चार वर्ग प्रतिनिधींनी आणि वर्गशिक्षकांनी ते बक्षीस स्वीकारलं, तेव्हा अमितच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते. सर्व शाळेने टाळ्यांचा कडकडाट केला. बक्षिसाचा खरा अर्थ सर्वांना उमगला होता!

चारुता प्रभुदेसाई

शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग