सुस्वागतम् ऑलिनग्युटो!!

ऑलिनग्युटो??  इंग्रजीतील हा कुठला कठीण शब्द नसून,  हे नाव आहे दक्षिण अमेरिकेत सापडलेल्या सस्तन प्राण्याच्या एका नवीन प्रजातीचे. टेडी बेअरसारखा दिसणारा हा प्राणी यापूर्वीही आढळला होता. अमेरिकेच्या एका अभयारण्यातून दुसऱ्या अभयारण्यात १९६७ ते १९७६ या काळात ऑलिनगोस समजून तो प्रजननासाठी हलवण्यात आला. पण प्रजननाचे प्रयत्न काही यशस्वी झाले नाहीत, कारण तो ऑलिनगोस नसून ऑलिनग्युटो होता. अर्थात, त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या ऑलिनगोस या प्राण्याशी त्याची गल्लत झाली. पण २००६ साली हेल्गन यांना आणि त्यांच्या साथीदारांना दोन्ही प्राण्यांमध्ये फरक असल्याचे आढळले आणि त्यांनी द. अमेरिकेच्या जंगलांमध्ये संशोधन केल्यानंतर ऑलिनग्युटोही पूर्णत: वेगळी प्रजाती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर काही वर्षांच्या सखोल संशोधनान तर, नुकतेच ऑलिनग्युटोला सस्तन प्राण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ऑलिनग्युटो हे लहान आकाराचे असून त्यांची शेपूटही लहान असते. गोल-गोंडस चेहऱ्याच्या ऑलिनग्युटोंचे कानही छोटेसे असतात. काळ्या-तपकिरी रंगाचे फरचे जाळे शरीरावर पसरलेले असून हे प्राणी फक्त रात्रीच्या अंधारात एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना दिसतात. आणि त्यामुळेच ते दिवसा सहजासहजी निदर्शनास येत नाही. प्रामुख्याने फलाहार करणाऱ्या ऑलिनग्युटोंचे वजनही एक किलोग्रॅमपर्यंत असते. ते वर्षातून एकदाच प्रजनन करतात. त्यामुळे या वसुंधरेवर आता कोणत्याही नवीन जीवांचे अस्तित्व नाही, असा समज करून घेणे अत्यत चुकीचे ठरेल. कारण अजूनही बरीच रहस्ये उलगडणे बाकी आहे.

लोकरीचे अल्पाका (Alpaca).

आपल्याकडे जसे शेळ्या-मेंढ्यांचे फार्म असतात, तसेच द. अमेरिकेमध्येअल्पाका या प्राण्याचे फार्म्स दिसून येतात. तेथील पशुपालनात प्राचीन काळापासून या पाळीव प्राण्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान राहिले आहे. मेंढ्यांपासून लोकर मिळवली जाते, त्याचप्रमाणे उंटाच्या परिवारात गणल्या जाणाऱ्या 'अल्पाका' या प्रजातीचा प्रामुख्याने लोकर मिळवण्यासाठीच वापर केला जातो. अल्पाकापासून मिळणारी लोकर मेंढ्याच्या लोकरीपेक्षा अधिक सुती, चकचकीत, उबदार आणि कमी काटेरी असते. लोकर देणारे सर्व प्राणी लॅनोलिन (अर्थात लोकर मेण) हा पिवळ्या रंगाचा द्रव स्रवतात. पण अल्पाका त्याला अपवाद आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यापासून मिळणारी लोकर अॅलर्जी-फ्री असते. ब्लँकेट, स्वेटर, हँड ग्लोव्ह्ज बनवण्यासाठीही अल्पाकाच्या लोकरीचा वापर केला जातो आणि बाजारात त्यांची किंमतही तुलनेने जास्त असते. एकट्या पेरू देशात अल्पाकाची लोकर ५२ नैसर्गिक रंगांमध्ये उपलब्ध असून कपड्यांपासून ते मोज्यांपर्यंत कापड उद्योगात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आकर्षक रंगसंगती, गोंडस चेहरा, आकाराने लहान आणि वजनाने कमी (४८  ते ८४ किलो) असलेल्या या प्राण्यांची लोकरीबरोबरच मांस, दूध यांसाठीही पैदास केली जाते. या प्राण्याचे सर्वसाधारण आयुर्मान वीस वर्षे असून अल्पाकाची मोठ्या प्रमाणात पैदास करणाऱ्या देशांपैकी पेरू हा एक प्रमुख देश आहे. हा प्राणी विविध रंगसंगतीमध्ये पाहायला मिळतो. पण पांढऱ्या रंगाचे अल्पाका प्रामुख्याने पेरूच्या मोचे जमातीच्या गुराख्यांच्या पसंतीचे आहेत. त्यामुळे यापुढे लोकर देणाऱ्या प्राण्यांच्या यादीमध्ये अल्पाकांचा उल्लेख करायला विसरू नका.

लांब जिभेचा अँटईटर (Antímatímr)

मुंग्या खाणारे म्हणून 'अँटईटर' असे या प्राण्याचे नाव पडले. मुंग्या, वाळव्या आणि इतर छोट्या कीटकांना भक्ष्य करणाऱ्या अँटईटरच्या एकूण तीन प्रजाती आढळतात. यामध्ये जायंट अँटईटर, सिल्की अँटईटर आणि सदर्न टॅमनड्युआ यांचा समावेश होतो. दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील विषुववृत्तीय पर्जन्यवनांमध्ये, मोकळ्या गवतांच्या पठारांवर आणि सॅवाना प्रदेशात त्यांचा वावर पाहायला मिळतो. आळशी आणि सुस्त असे हे अँटईटर आपल्या छोट्या सोंडेतून लांब जिभेच्या मदतीने मुंग्यांची शिताफीने शिकार करतात. त्यांची जीभ मिनिटाला १५० वेळा आतबाहेर हालचाल करू शकते आणि त्यामुळे कीटकांची शिकार करणे अँटईटरला सहज शक्य होते. त्यांची नजर जरी कमजोर असली तरी नाक आणि कान अतिशय संवेदनशील असतात. आपल्या तीक्ष्ण आणि वक्र नखाच्या साहाय्याने जमिनीत झाडांच्या खोडात लपलेल्या मुंग्यांना ते चपळाईने शोधून काढतात. दात नसल्यामुळे आपल्या लांब जिभेचा वापर करून ते मुंग्यांना थेट गट्ट करतात. काळ्या, राखाडी आणि तपकिरी रंगाच्या पट्टेरी अँटईटरच्या दाट फरमुळे त्यांचे इतर कीटकांपासून संरक्षण होते. या सस्तन प्राण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे. शरीराचे तापमान संतुलित करण्याची कला त्यांना अवगत आहे. म्हणजे च थंड वातावरणातही ते आपल्या शरीराचे तापमान उबदार ठेवू शकतात आणि उष्ण-शुष्क वातावरणात शरीराच्या तापमानात हवी तशी घटही करू शकतात. पण अतोनात जंगलतोड,  शिकार यामुळे अँटईटरच्या या प्रजाती आज लुप्त  होण्याच्या मार्गावर आहेत. द. अमेरिकेच्या वनांमध्ये आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अँटईटर असून त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी संघटनांनीही पुढाकार घेतला आहे.

- विजय कुलकर्णी