विनायकाची कृपा...

दिंनाक: 11 Sep 2019 18:32:53


राजस्थानमधल्या एका खेड्यात राहणाऱ्या दोन शाळकरी मुलांची गोष्ट आहे ही. एकाचं नाव होतं दगडू. तर दुसऱ्याचं बबडू. दगडू नावाप्रमाणेच अक्षरशः दगड होता. अभ्यासात त्याचं लक्ष नसायचंच, पण दगडूची आईही त्याला कधी चांगल्या गोष्टी शिकवायची नाही. उलट दगडूने कधी कुणाशी मारामारी केलीच, तर दगडूची आई त्याला प्रोत्साहन द्यायची. दुसऱ्याशी भांडायला ती सदैव तयार असे. एक हावरट आणि भांडखोर स्त्री म्हणूनच ती गावात कुप्रसिद्ध होती. परिस्थितीने मात्र खूप गरीब होती.

याउलट बबडूची आई मात्र गरीब, कष्टाळू आणि अगदी प्रामाणिक होती. कधी कुणाशी त्रास द्यायची नाही. बबडूवरही तिने चांगले संस्कार केले होते. देव कधीतरी आपली गरिबी दूर करेल, यावर तिचा विश्वास होता. दगडू आणि बबडू यांची घरं एकमेकांना लागून एकाच गल्लीत होती. घरापासून फर्लांगभर अंतरावर दोघांची शाळा होती. शाळेच्या वाटेवर गणपतीचं एक मंदिर होतं. मात्र शाळेला जाताना दगडू गणपतीचं दर्शन न घेताच मागील बाजूने पटकन शाळेकडे धावायचा. ‘मी बघ तुझ्याआधी शाळेत आलो’ असं म्हणून बबडूला चिडवायचा. बबडू मात्र बाहेरून, रस्त्यावरून का होईना, दररोज गणपतीचं दर्शन घ्यायचा आणि मगच पुढे जायचा. गणपतीच्या पुढ्यात रोज गुळाचा नैवेद्य ठेवलेला असे. त्यावर भरपूर डोंगळे जमलेले असत, ते मात्र बबडूला आवडायचं नाही. एकदा न राहवून त्याने रस्त्यावरचा एक दगड उचलून त्या डोंगळ्यांना मारला. डोंगळे पळून गेले. बबडूला बरं वाटलं. मग बबडू रोजच दगड मारून त्या डोंगळ्यांना पळवून लावू लागला. त्यामुळे त्याला शाळेला जायला थोडा उशीर होई खरा, पण डोंगळे पळून गेले की बबडूला आनंद व्हायचा. राजस्थानात गणपतीला ‘विनायक’ म्हणतात. बबडू म्हणायचा, “ रे विनायका, डोंगळे पळाले, आता तरी गुळाचा प्रसाद खा. ” देवाला आग्रह करून व नमस्कार करून तो पुढे शाळेला निघून जायचा. आजकाल त्याचा हा दिनक्रम ठरूनच गेला होता. अकराची शाळा असेल तर दगडू आणि बबडू दहा वाजताच बाहेर पडायचे. दगडू मंदिराजवळ आला की शाळेकडे धावत सुटायचा, तर बबडू छोटा दगड मारून डोंगळ्यांना पळवून लावायचा.

एकदा काय झालं, शाळेत जरा लवकर बोलावलं होतं. परीक्षा सुरु होणार होती. दगडूबरोबर वेगाने चालत बबडूही निघाला होता. मंदिरामागच्या वाटेने दगडू पळत सुटला, तसा बबडूही त्याच्यामागे धावला. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच दोघेही शाळेत पोहोचले. पण तिथे पोहोचताच मात्र बबडूच्या लक्षात आलं की आज आपण डोंगळ्यांना दगड मारायला विसरलो. डोंगळ्यांमुळे गणपती हैराण झाला असेल. आज आपण आपला नित्याचा नेम मोडला. गुरुजींना सांगून बबडू धावतच पुन्हा गणपतीच्या मंदिराकडे आला. रस्त्यावरचा एक खडा उचलून त्याने गणपतीच्या पुढ्यातल्या गुळाला आणि त्यावरच्या डोंगळ्यांना मारला. खडा गणपतीच्या पोटालाही थोडा लागला. तेवढ्यात मंदिरातून आवाज आला, "बबडू, इकडे ये.” आवाज कुठून आला? याचा विचार करीत घाबरून बबडू परत निघाला, तोच पुन्हा आतून आवाज आला, “ बबडू, इकडे ये. “ आता मात्र आवाज मंदिरातूनच येतोय हे ओळखून बबडू घाबरत घाबरत मंदिरात शिरला. साक्षात विनायक महाराज त्याच्याशी बोलत होते. बबडू खूप घाबरला. कान पकडून गणपतीपुढे लोटांगण घालीत म्हणाला, "रे विनायका, आता यापुढे कधीच तुला दगड मारणार नाही. मला माफ कर. माझी परीक्षा आहे. मला जाऊ दे." त्यावर गणपती म्हणाला, "तसं नाही रे. उलट मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तू दररोज नित्यनेमाने खडा मारतोस. आज विसरलास तरी शाळेतून परत आलास. तुझा हा स्वभाव मला आवडला. बोल, काय हवं तुला? " "रे विनायका, मी काय मागणार तुझ्याकडे? मी लहान आहेना ! आईला विचारून उद्या सांगतो. चालेल?” “ठीकाय तर... ये मग" गणपती म्हणाला, तसा बबडू शाळेकडे धावत सुटला. परीक्षा झाली. संध्याकाळी बबडू घरी परतला. त्याने आपल्या आईला सगळा प्रकार सांगितला. आईला विचारलं, “आई, मी काय मागू विनायकाकडे?" आई म्हणाली, “मी सांगते तसं पाठ कर आणि विनायकाला सांग." आईने एक श्लोकच सांगितला –

'अनं मांगूधनं मांगू

जालीने झरोखामांगू

ढोल्यो मांगूपाटको

उपर बचको भात को

फुरसणवाली एहडी मांगू

जाणै फूल गुलाबको'

बबडूने रात्रभर जागून हा श्लोक पाठ केला. सकाळी जरा लवकर आटपून तो शाळेकडे निघाला. जाताना वाटेत त्या गणपतीच्या मंदिरात थांबला. पाठ केलेला सगळा श्लोक त्याने गणपतीपुढे

म्हणून दाखवला. गणपती म्हणाला, “अरे वा! मागता येत नाही असं म्हणून बरंच काही मागितलंस की. श्लोकातून मागितलंस की, देवा मला पोटभर अन्न दे. धन दे. जाळीदार खिडक्यांचं घर दे. बसायला पाट, पुढ्यात ताट, त्यामध्ये पक्वान्न दे आणि हे सगळ देणारी गुलाबासारखी सुंदर अशी स्त्री दे. ठीकाय, तथास्तु. हे सगळं मी तुला देतो.” असं म्हणून

गणपतीने बबडूला जायला सांगितलं. सायंकाळी बबडू शाळेतून घरी परतला. पाहतो तर काय - त्याची गरीब आई खूप आनंदून गेली होती. तिला जाळीदार खिडक्यांचं नवं घर, धन, धान्य, असं देवाने भरपूर दिलं होतं. आईने बबडूचं कौतुक केल. त्याच्या आवडीचे पदार्थ करून खाऊला घातले. शेजारी राहणाऱ्या दगडूच्या आईने हे सगळं पाहिलंच की. “हे सगळं कसं मिळालं?" असं तिने विचारलं. त्यावर भोळेपणाने बबडूच्या आईने तिला सगळी हकीकत सांगितली. विनायकाला दगड मारल्याने तो प्रसन्न झाल्याचं सांगितलं. दगडूची आई तत्काळ घरी आली. तिने दगडूला सांगितलं, "अरे, त्या बबडूने देवाला एवढासा दगड मारला तर त्याला एवढं सगळं मिळालं. तू चांगला मोठा दगड घेऊन विनायकाला मार. मग तो तुला बोलावून विचारेल-काय देऊ? तेव्हा तू धन, धान्य, संपत्ती सगळं माग, बरं का?“ "ठीकाय" असं म्हणून दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे दगडू विनायकाच्या मंदिरात गेला. बचकभर मोठ्ठा दगड त्याने नेम धरून गणपतीच्या पोटावर मारला. गणपती रागावला. मंदिरातून आवाज आला, "दगडू, इकडे ये" दगडू तत्काळ मंदिरात धावला. गणपती म्हणाला, "हे बघ दगडू, तू दगड मारल्यामुळे माझ्या पोटाला काय झालंय.' दगडूने

गणपतीच्या पोटाला हात लावून दगड कुठे लागला ते पाहायला सुरुवात केली. तसं गणपतीने 'तथास्तु' म्हटलं. दगडूचा हातच दगडाचा बनला व गणपतीच्या पोटावर चिकटून बसला. त्याला तो काढता येईना. त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. एक हात दगडाचा बनलेला दगडू मंदिरातच अडकून पडला. थोड्या वेळाने कुणीतरी सांगितल्याने दगडूची आई मंदिरात आली. तिने पाहिलं की दगडूने मोठा दगड मारल्याने गणपतीच्या पोटाला जखम झालीय... खड्डा पडलाय. तिने गणपतीच्या पायाशी लोटांगण घातलं. म्हणाली, " विनायका, आमची चूक झाली. माफ कर. माझ्या दगडूला पुन्हा पाहिल्यासारखं कर. यापुढे मी कधीही हावरटपणा करणार नाही. कुणाशी

भांडणार नाही. तुझी मनोभावे भक्ती करीन. " तिची ही प्रार्थना ऐकून अखेर गणपतीलाही दया आली. त्याने दगडूचा हात पुन्हा पूर्ववत केला. दगडूची आई त्याला घेऊन घरी परतली. तिने आणि दगडूनेही त्यापुढे मग कुणाशीही न भांडण्याची शपथ घेतली व ते विनायकाची भक्ती करू लागले...

 

- प्रा. सुहास द. बारटक्के