‘गणपती बाप्पा मोरया!'

आले बरं का गणपती! पंचागाप्रमाणे भाद्रपद महिना आणि कॅलेंडरप्रमाणे सप्टेंबर मदिना! ही एक गंमतच आहे. भाद्रपद महिना सुरू झाल्यावर चौथ्या दिवशी. म्हणजेच चतुथीला गणेशोत्सव सुरू होतो. पण कितीतरी आधीपासून त्याच्या स्वागताची तयारी सुरू होते. फार मोठा पाहुणा येणार आणि दहा दिवस राहणार! सर्वांचीच धावपळ चालते. तऱ्हेतऱ्हेच्या सुंदर व सुबक मूर्तीनी, सजावटीच्या सामानाने आणि पूजेच्या साहित्याने दुकानं कशी भरलेली असतात. चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात. गावात ठिकठिकाणी लहानमोठे मांडव घालून गणपतीच्या मूर्ती बसवतात. मोठ्यामोठ्या घरांमध्ये, कित्येक सोसायट्यांमध्ये, शाळांमध्येसुद्धा गणपती बसवून छान छान सजावट करतात. आपण याच दिवशी 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात वाजतगाजत श्री गणरायाची मूर्ती आपल्या घरी आणतो. 'मोरया' म्हणजे काय? तर मोरया म्हणजे नमस्कार, 'गणराया, तुला नमस्कार' असे आपण म्हणतो. हिंदू धर्मात श्री गणेशाला बुद्धीचं व ज्ञानाचं दैवत मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात. कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे. गणपतीला गणेश, गजानन, लंबोदर, वक्रतुंड, विघ्नेश्वर, विनायक अशी कितीतरी नावं आहेत. गणपती ही तत्त्वज्ञानाची देवता म्हणूनही ओळखलं जातं. म्हणून गणपतीला हत्तीसारख्या अत्यंत बुद्धिमान प्राण्याच मस्तक बसवलं असावं. पूर्वीच्या काळा कोणी राजा बेवारस मृत झाला, तर हत्तिणीच्या सोंडेत माळ देऊन तिला राज्यात सर्वत्र फिरवत. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील, त्याला राजा बनवत असत. हत्तीच्या निवडीवर लोकांचा इतका विश्वास होता. लहान मुलांना तर गणपती बाप्पा फार आवडतात. पण बाप्पाचं दर्शन घेताना एक मोठा प्रश्न मनात येतो की गणपती बाप्पा असा विचित्र का? हत्तीसारखं डोकं, मोठे मोठे कान, लांब सोंड, इवलेसे बारीकबारीक डोळे, शिवाय ढेरपोट्या! गंमतच आहे. पण खूप गोष्टी समजून घ्यायच्या असतात. त्यातला अर्थ समजून घ्यायचा असतो. थोडी आपली कल्पनाही लढवायची असते. आपल्या गमतीदार स्वरूपातून गणपती आपल्याला शिकवत असतो. गणपतीचे कान खूप मोठे, सुपासारखे असतात, म्हणजे त्याला खूप चांगलं ऐकू येतं. सूप हेपूर्वीच्या काळी धान्य साफ करायचं साधन होतं. त्यात धान्य घालून पाखडलं की कचरा बाजूला होऊन स्वच्छ धान्य मागे राहतं. त्याचप्रमाणे सुपाच्या आकाराचे कान सांगतात की वाईट असेल ते फटकून बाजूला टाका, चांगलं असेल तेघ्या. त्याचा उपयोग करा. गणपतीला दोन सुळे असतात. एक पूर्ण व दुसरा (तुटलेला) अर्धा. पूर्ण सुळा श्रद्धेचा व तुटलेला बुद्धीचा. म्हणजेच जीवन विकासासाठी आत्मश्रद्धा व ईश्वर श्रद्धा असलीच पाहिजे. बुद्धी थोडी कमी असली तरीही चालेल. गणपतीचं पोट विशाल आहे. म्हणून त्याला लंबोदर म्हणतात. पण हे पोट घागरपोट नाही. तर सागरपोट आहे. सागरात जशा अनेक नद्या आपला प्रवाह मिसळतात, तशा लोकांच्या अनेक गोष्टी. अनेक अपराध ऐकून पोटात सामावण्याची गणपतीची क्षमता आहे. अशी खूप खूप सकट पोटात घेतल्याने तो असा ढेरपोट्या झाला आहे. गणपतीचे तीक्ष्ण दात त्याची धारदार एकाग्रता दाखवतात. गणपतीला चार हात आहेत. एका हातात अंकुश, दुसऱ्यात पाश, तिसऱ्यात मोदक व चौथ्या हाताने तो आशीर्वाद देत आहे. अंकुश वासनांवर संयमाची गरज सुचवतो. गरज पडली तर पाश आपले शिक्षा करण्याचे सामर्थ्य दाखवतो. मोदक म्हणजे संतोष आहे. दुसऱ्या हाताने तो आशीर्वाद देतो आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे. मात्र गणपतीचेवाहन उंदीर पिटुकलं असलं तरी ते काळाचं प्रतीक आहे. उंदीर केव्हा चावला हे कळत नाही, तसा काळ कसा उडून गेला ते कळत नाही. गणपतीला मोदक खूप आवडतात. म्हणून पहिल्या दिवशी घरोघरी बहुतेक मोदक बनवतात. मग रोज आरती झाल्यावर पेढे, लाडू, पंचखाद्य, साखर-खोबरं, फखं वगैरे पदार्थांचा नैवैद्य असतोच. दहा दिवस. अगदी धमाल सुरू असते. गणपतीला दूर्वा अतिशय आवडतात. गणपतीची पूजा करताना दूर्वा जरूर पाहिजेत. दूर्वा म्हणजे एका प्रकारचे गवत. गणपतीला दूर्वांच का हव्या असतात? असा प्रश्न आला ना तुमच्या मनात? दूर्वा म्हणजे एक प्रकारचं औषधी गवत आहे. पुष्कळ आजारावर त्याचा उपयोग होतो. विशेषत: अंगातली उष्णता वाढली आणि अंगाची आग होऊ लागली की दर्वांचा रस अंगाला लावला तर आग कमी होते. ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या सिंदुरासुर राक्षसाला गणपतीने ठार मारलं. त्याच्या रक्ताने गणपतीच्या अंगाची आग-आग होऊ लागली. औषधी वनस्पतींची जाण असलेल्या ऋषिमुनींनी गणपतीला दूर्वा आणून वाहिल्या, गणपतीच्या अंगाला त्याचा रस लावला आणि त्याच्या अंगाची आग थांबली. तेव्हापासून गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय झाल्या. त्याचप्रमाणे त्याला जास्वंदीची लाल फुलंही आवडतात. जास्वंदीचं झाडही औषधी आहे. एकंदरीत गणपतीलालाल रग आवडतो. गणपती उत्सव सुरू असताना गौरी येतात. गौरी म्हणजेच गणपतीची आई पार्वती. गणपतीला भेटायला ती येते, अशी कल्पना आहे. गणपतीचा उत्सव संपतो तेव्हा त्याला निरोप द्यायचा समारंभ असतो. खूप मोठी, भव्य मिरवणूक काढतात. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" अशा घोषणा करीत गणपतीचं विसर्जन करतात.

 

  • स्नेहल सुनील मोडक