जन गण मन हे गीत कवी  रवींद्रनाथ ठाकुर यांनी १९११ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लिहीले. हे संपूर्ण गीत २६ ओळींचे व ५ कडव्यांचे आहे. कलकत्ता येथे २६, २७ व २८ डिसेंबर १९११ रोजी भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दि. २७ डिसेंबर रोजी सादर केले. याची संगीतरचना स्वत: रवींद्रनाथांचीच आहे. पंचमजॉर्ज या बादशहाने बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल त्याच्या सन्मानार्थ रवींद्रनाथांनी गीत लिहावे अशी विनंती रवींद्रनाथांचे चूलत घराण्यातील प्रघोत कुमार ठाकुर यांनी केली. त्याचा रवींद्रनाथांना रागही आला वाईटही वाटले, त्या क्षोभातून आमचा देश पंचमजॉर्ज नव्हे तर ब्रह्मदेवाप्रमाणे जगानियंता चालवतो. आहे असे विचार व्यक्त करणारे हे गीत लिहीले. पुढे प्रघोतकुमारांनी दुसर्‍या कवीकडून युग युग जीवोभरे पादशा हे गीत लिहून घेतले.

१९१९ मध्ये मद्रास मदनापल्ली येथील महाविद्यालयात रवींद्रनाथांनी The Morning Song Of India या नावाने इंग्रजी अनुवाद केला. स्वातंत्र्यानंतर घटनासमितीने या भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) म्हणून मान्यता दिली. यात फक्त पहिले कडवेच राष्ट्रगीत म्हणून मान्य झाले. हे ५२ सेकंदातच गायले जावे असा नियम आहे. व लघुरुपात ध्वजवंदनासाठी गायल्यास किंवा वाजवल्यास ते १० सेकंदात फक्त धृवपद पुर्ण करावे.

 

वंदे मातरम्

हे अमर राष्ट्रगान कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी कलकत्याजवळील नैहाटी या आपल्या जन्मगावी दि. ७ नोव्हेंबर १८७५ (कार्तिक शु.९ शके १७९७) रविवार अक्षयनवमी या दिवशी सायंकाळी लिहीले. १८८० मध्ये ‘आनंदमठ’ या कादंबरीत त्यांनी या गीताचा समावेश केला. २८ डिसेंबर १८६९ रोजी कलकत्ता राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कवी रवींद्रनाथ ठाकुर यांनी याचे प्रथम जाहीर गायन केले. १९०१ पासून दरवर्षी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात हे गीत नियमित गायले जाऊ लागले. १९०७ अरविंद घोष(योगी श्री अरविंद) यांनी वन्दे मातरम् चे इंग्रजी भाषांतर केले.

७ ऑगस्ट १९०५ बंगालच्या फाळणी विरोधात कलकत्ता येथील टाऊन हॉल येथे झालेल्या प्रचंड सभेत ‘वन्दे मातरम्’ हे शब्द युद्धघोषाप्रमाणे प्रथमच वापरले गेले. यावेळेपासून ‘वन्दे मातरम्’ हे शब्द इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात एखाद्या शस्त्राप्रमाणे वापरले जाऊ लागले. १९०५ मध्ये भगिनी निवेदितांनी तयार केलेल्या ध्वजावर तसेच १९०६ मध्ये कलकत्यात सुरेंन्द्रनाथ बॅनर्जी यांनी फडकविलेल्या व १९०७ मध्ये स्टुटगार्ड जर्मनीत भरलेल्या अधिवेशनात मादाम कामा यांनी फडकविलेल्या भारताच्या ध्वजांवर वन्दे मातरम् हेच शब्द होते. पुढे खुदिराम बोस, रामप्रसाद बिसमिल्ल, आशा फाकडल्लाखान असे अनेक क्रांतिकारक वन्दे मातरम् म्हणून फासावर चढले. १९४३ मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये वन्दे मातरम् मार्चिंग साँगप्रमाणे वापरले. २६ जानेवारी १९५० रोजी वन्दे मातरम्च्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीताचा समाना दर्जा घटनेने प्राप्त करून दिला. वन्दे मातरम्च्या एकूण ओळी २४ कडवी ५ आहेत.

 

आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा

आंध्रप्रदेशचे तेलगु साहित्यिक ‘पेदेमरी व्यंकटसुब्बाराव’ यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा लिहीली. २६ जानेवारी १९६५ पासून भारताच्या सर्व राज्यांच्या पाठ्यपुस्तकात त्या-त्या भाषेत याचा राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणून समावेश केला गेला. सुब्बाराव हे स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक होतेच; पण तेलगु भाषेतील एक प्रख्यात कादंबरीकार व लेखक होते.

 - मिलिंद सबनीस