देशप्रेम आणि राष्ट्रवाद हा जन्मजात रक्तातून पाझरणारा भाव आहे. तो निमित्ता-निमित्ताने पाझरतही असतो. आपल्या देशातील अभिमान वाटाव्या अशा वास्तू, घटना, व्यक्ती यांविषयी आपल्या मनात आदरभाव असतो. एक घट्ट निष्ठा असते. हेच देशप्रेमाचं-राष्ट्रवादाचं बीज ठरतं. देशप्रेमाला वयोगटाची, स्त्री-पुरुष असण्याची, साक्षर-निरक्षर असण्याची कुठलीच आडकाठी नसते. म्हणूनच स्वातंत्र्यचळवळींमध्ये बाबू गेनूंसारखे अल्पवयीन देशभक्त, राणी लक्ष्मीबाईंसारखी शौर्यसम्राज्ञी आणि कितीतरी जाती-धर्माच्या क्रांतिकारकांची एक धगधगती परंपरा आहे.

स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या अंगावर शहारा आणणार्‍या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत, काही तुम्हाला अभ्यासातही आहेत. पण परीक्षेपुरती त्यांची उजळणी न करता, त्या कथानकांचा विचार तुम्ही केला आहे का? काही जणांनी तो केला असेल तर फारच छान! पण एक मात्र नक्की-कथा, कादंबर्‍या व चित्रपट या माध्यमांनी या सगळ्या गोष्टी आजही जागत्या ठेवल्या आहेत. बहुतेक सर्व भाषांमध्ये असे चित्रपट तयार झाले आहेत. पण आपल्याला माहीत असलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्येही देशभक्तीवर आधारित असंख्य चित्रपट आले.

आमीर खान, शाहरुख खान यांसारख्या लोकप्रिय नायकांनासुद्धा मंगल पांडे, सम्राट अशोक व राजगुरू-भगतसिंग यांच्या कथांवर बेतलेल्या चित्रपटात काम करायचा मोह झाला. चित्रपटातील कलाकार, वेषभूषा, रंगभूषा, चित्रीकरण आणि प्रगत तंत्र यांमुळे पडद्यावर एखाद्या युद्धाची कथा पाहणं आपल्याला आवडू लागलं. पहिलं, दुसरं महायुद्ध ही तर इंग्रजी चित्रपटांसाठी एक संधी ठरली. बॉर्डर, कारगील, सरफरोश, बेबी, हॉलिडे हे अलीकडच्या काळातील चित्रपट भारत-पाक युद्ध, दहशतवाद यांवर प्रकाश टाकणारे होते.

‘युद्धस्य कथा: रम्या:।’ ही उक्ती खरी ठरवणारी ‘वॉर अँड पीस’ ही कादंबरी जगभर गाजली. त्यावरील कथा, उपकथांवर चित्रपट आले. अमेरिका-रशियामधील तणावपूर्ण संबंधांचे चित्रण करणारा ‘द गन्स ऑफ नेव्हरोन’ हा चित्रपट धाडस आणि देशाकरता सर्वस्व अर्पण करायला तयार असलेल्या सैनिकाचे साहस दाखवणारा होता.

एकीकडे देशावर अतीव प्रेम असलेले सैनिक, ज्यांच्या त्यागामुळे सुरक्षित देशवासी आणि याच युद्धाच्या काळात देवदूत बनून सैनिकांसाठी बलिदान देणारे डॉ. कोटणीस या गोष्टीसुद्धा चित्रपटांमुळे मनावर कोरल्या गेल्या. ‘डॉ. कोटणीस की अमर कहाणी’ हा तो चित्रपट होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून चीनमध्ये केलेली रुग्णसेवा ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली.

‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत आपण शाळेत रोज म्हणतो. याच नावाचा बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट खूप लोकप्रिय झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेल्या या कादंबरीवर ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही कादंबरी पुन्हा एकदा वाचकांसाठी खुली झाली. 1952 साली या कादंबरीवर बेतलेला ‘आनंदमठ’ हा चित्रपट स्वातंत्र्यलढ्यातील घटनांवर आधारित होता. साधूंच्या स्वातंत्र्यलढ्यातली ही गोष्ट आणि ‘वंदे मातरम्’ हे त्यामधलं राष्ट्रगान तर देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलं.

इंग्रजी आणि हिंदी चित्रपटाप्रमाणे मराठी चित्रपटांवर असा प्रभाव असणं अपरिहार्य होतं. स्वातंत्र्यलढ्यातील चापेकर बंधूंची घटना म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासातलं एक स्वतंत्र पान. जयू आणि नचिकेत पटवर्धन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे ब्रिटिश अधिकारी चार्लस् वॉल्टर रँड याच्या वधाची नाट्यमय घटना आणि त्यातून उलगडलेला चापेकर बंधूंचा या लढ्यातील सहभाग दाखवणारा ‘22 जून 1897’. या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कितीतरी ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांचा सहभाग या लढ्यामध्ये होता. ठळक व्यक्तिमत्त्व वगळता आपल्याला ठाऊकही नाही की किती जणांचा त्याग, समर्पण या स्वातंत्र्यलढ्यामागे आहे. ‘विटीदांडू’ ही कोकणातल्या पार्श्‍वभूमीवरची आजोबा आणि नातवाच्या नात्यातले बंध सांगणारी आणि स्वातंत्र्याची बीजं मनात कशी खोलवर असतात, याचं लोभस दर्शन घडवणारी कथा चित्रपटातून पाहताना एक अनोखा अनुभव देते.

आज अनेक दशकं लोटल्यानंतर गांधीजी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारे चित्रपट तयार होत आहेत.

समाजात भवतालात घडणार्‍या घटनांचे पडसाद साहित्यकृतींतून आणि चित्रपटांतून उमटतात. त्यामुळे या दोन्ही कलाकृती लोकाभिमुख आहेत. तेव्हा अशा चित्रपटांचा तुम्ही नक्कीच आस्वाद घेतला पाहिजे. इतिहासाच्या पाऊलखुणा ज्या रंजकतेने चलत्चित्रांतून दाखवल्या जातात, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. इतिहासाच्या डोळस अभ्यासासाठी राष्ट्रवाद जागवणारे चित्रपट आवर्जून बघा आणि ते बघताना तुमच्या मनात कोणत्या भावना तरळून गेल्या त्या आम्हालाही सांगा.

- नेहा वैशंपायन