एक छोटसं, सुंदर, निसर्गरम्य गाव होतं. त्या गावाचं नाव होतं ‘गंगापूर’. धनधान्याने, फळाफुलांनी समृद्ध असं हे गाव होतं.

तिथली सगळी माणसं खूप कामसू होती. गावाजवळूनच एक नदी वाहत होती. तिचं नाव होतं ‘गंगामाँ’. गंगामाँच्या काठावर फळाफुलांनी बहरलेली झाडं, शेतं होती. बाराही महिने गंगामाँ खळाळून वाहायची. गावातल्या सगळ्या बायका नदीवर पाणी भरायच्या, मुलं नदीत पोहण्याचा आनंद लुटायची.

नदीच्या पलीकडेच जंगल होतं. जंगलामध्ये माकडं, हरीण, वाघ-सिंह, ससा, हत्ती असे प्राणी होते. झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी होती. जंगलातले प्राणीसुद्धा नदीवर यायचे, पाणी प्यायचे.

हत्तीदादा तर नदीत डुंबायचा. खूप खूप मजा करायचा. नंतर हळूहळू काय झालं, पाऊस काही पडेना. प्यायलापण पाणी मिळेना, पाण्यावाचून शेतं वाळून गेली. जंगलंपण वैराण झालं; ऊन खूप वाढलं; सगळी माणसं, प्राणी-पक्षी हैराण झाले.

नेहमीच्या सवयीने एक दिवस हत्तीदादा नदीवर डुंबायला गेला. बघतो तर काय! नदीमध्ये पाणीच नव्हतं. नदीचं पाणी गेलं कुठे? असा त्याला प्रश्‍न पडला. ‘‘कोण बरं विचारतंय, नदीचं पाणी गेलं कुठे? अरेच्चा! हत्तीदादा तू होय! ये, ये, हत्तीदादा. तुलाच रे माझी काळजी.’’ असं गंगामाँ हत्तीला म्हणाली.

हत्तीदादाने गंगामाँला विचारलं, ‘‘अगं गंगामाँ, तू आता नेहमीसारखी वाहत का नाहीस? तुझं खळखळणारं पाणी गेलं कुठे? रागवलीस का आमच्यावर?’’ ‘‘छे रे बाबा, मी कशाला रागवू तुझ्यावर? पण काय सांगू तुला, ढग काही इथे थांबत नाहीत, पाऊस काही पाडत नाहीत. मग मला पाणी कुठून मिळणार? आणि तुला डुंबायला तरी कसं मिळणार?’’

‘‘गंगामाँ पाऊस का गं पडत नाही?’’

‘‘ते मला नाही रे माहीत. तू समोरच्या डोंगरावर जा. तिथे तुला ढगोबा भेटेल. त्यालाच विचार.’’

मग हत्तीदादा चालत चालत डोंगरावर गेला. ढगाला विचारले, ‘‘ढगा, ढगा रुसलास का? आमच्याशी गट्टी फू केलीस का?’’ ढग म्हणाला, ‘‘मी कशाला तुमच्यावर रुसू?’’ ‘‘मग का रे तू इथे थांबत नाहीस? आणि पाऊसपण पाडत नाहीस. त्यामुळे नदीला पाणी नाही, म्हणून मला डुंबायला मिळत नाही.’’ ढग म्हणाला, ‘‘अरे, आम्ही तर नेहमी येतो, पण आम्हाला इथे अडवायला झाडंच नाहीत. वारा आम्हाला ढकलत ढकलत पुढे घेऊन जातो.’’ ‘‘अरेच्चा! कुठे गेली बरं सगळी झाडं?’’ ढग म्हणतो, ‘‘अरे, माणसांनी झाडं तोडली, जंगलं नष्ट झाली. मग सांग, सांग हत्तीदादा, आम्ही कसं बरं थांबणार? तू जाऊन माणसांनाच विचार. झाडं का बरं तोडलीस?’’

हत्तीदादा डोंगर उतरून गावात गेला. गावात हत्ती आलेला पाहून गावकरी आश्चर्यचकीत झाले. हत्तीने गावकर्‍यांना विचारलं, ‘‘तुम्ही जंगलातली झाडं का तोडलीत? आमच्यासारख्या प्राण्यांनी-पक्ष्यांनी राहायचं कुठं?’’

गावकर्‍यांनी त्याला सांगितलं, ‘‘आम्ही जळणासाठी, घरं बांधण्यासाठी, खुर्च्या-टेबल करण्यासाठी झाडं तोडली.’’ हत्तीदादा गावकर्‍यांना म्हणाला की, ‘‘तुमच्या या झाडं तोडण्यामुळे जंगलच नष्ट झालं. सगळे डोंगर उजाड झाले. ढगांना अडवायला उंच उंच झाडंच राहिली नाहीत. त्यामुळे ढग आता डोंगरावर थांबत नाहीत, पाऊस काही पाडत नाहीत. तुम्हाला-आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही.’’ हत्तीदादाचं बोलणं ऐकून सगळे गावकरी विचार करू लागले.

अरेच्चा! आपण तर नुसती झाडं तोडली, पण नवीन झाडं लावली नाहीत. ही चूक सगळ्यांच्या लक्षात आली. प्रत्येकाने ठरवलं की, आपण आपल्या वाढदिवसाला एक तरी झाड लावू. त्या झाडाची आपल्या मुलांसारखी काळजी घेऊ. मग -

झाडं खूप खूप मोठी होतील

जंगल हिरवंगार होईल

खूप खूप ढग येतील

झाडं ढगांना पकडून ठेवतील

धो-धो पाऊस पडेल

गंगामाँ खळाखळा वाहील

आपल्याला खूप पाणी मिळेल

सगळ्यांना शुद्ध हवा मिळेल

सगळं गाव सुखी होईल.

- वर्षा शशांक जोशी

न्या. रानडे बालक मंदिर