महती २१ पत्रींची...

दिंनाक: 31 Aug 2019 18:31:00


 

आपल्या पारंपारिक उपासना पद्धतीमध्ये तसेच सणवार यामध्ये आपण मूर्तीपूजा करतो. अशावेळी निसर्ग संरक्षण, सामाजिक, आरोग्य यांचा सुरेख संगम आपल्या पूर्वजांनी केलेला दिसतो आणि त्यांची सांगड देवांशी घातली. जेणेकरून ह्या एकवीस पत्री, पूजा, निधीसाठी तोडल्या जाऊ नयेत. त्या देवळांजवळ किंवा घराजवळ लावल्या जातील नाहीतर त्या लवकरच दुर्मिळ होतील. त्यांचे औषधी गुणधर्म जाणून घ्यावेत. त्यांची नीट ओळख लोकांना झाल्यास त्यांची तोड आपोआप कमी होऊन त्यांना संरक्षण मिळेल. अशा या पत्रींची आपण ओळख करून घेऊ, हा उद्देश.

गणपतीला प्राणप्रतिष्ठेच्यावेळी गणपतीचे एकेक नाव घेऊन पत्री अर्पण करतात.

 • मालतीपत्र – मदनवेल या नावानेही ही ओळखली जाते. सदाहरित पाने व सुवासिक पांढरी मध्ये पिवळा रंग असलेली लाल, गुलाबी, गुलबक्षी रंगांची ह्या नाजूक फुलांचा उपयोग आज घराच्या आवारात बाग सुशोभीकरणासाठी करतात. याच्या तीन पंखवाल्या बिया दूरवर उडत जाऊन रुजतात. पिवळ्या, पांढऱ्या हिच्या फुलांना मंद सुवास असतो. ती सांधेदुखी, श्वसन व त्वचा रोगावर गुणकारी आहे.
 • माका-भृंगराज – ही पावसाळ्यात मुबलक आढळणारी लहान वनस्पती सुर्याफुलासारखी रूपाने, पाने साधी, लहान, लांबट, छोटे देठ असलेली ही वनस्पती. केशवर्धनासाठी हिच्या पानांचा रस प्रसिद्ध आहे. तसेच मुळव्याध, त्वचारोग, विंचूदंश, तसेच ‘जिराडीया’ या पोटातील जंतूंचा नाश यासाठी माक्याचा वापर प्रभावी.
 • बेल – शंकराला आवडणारी ही वनस्पती गणपतीच्या पूजेतही महत्त्वाची आहे. हिचा उपयोग अतिसार, आव, जंत, हृदयाची धडधड यावर उपयुक्त. याच्या फळाचा मुरांबा आमांशात आरामदायी.
 • पांढऱ्या दुर्वा – नेहमीच्या दुर्वाप्रमाणे असणाऱ्या पण रंगद्रव्य नसणाऱ्या या दुर्वा क्वचितच आढळतात. त्या वाहाव्यात. नाहीतर हिरव्या दुर्वा वहिल्या जातात. त्यांचे २५० प्रकार आहेत. दुर्वा शीतल आहेत. दुर्वांचा रस आग, ताप, मूत्राशय विकार, विषमज्वर तसेच नाकातून रक्त येणे यावरही उपयुक्त आहे. हे भारततात सर्वत्र विपुल व अपोआप उगवते.
 • बोर (बदरी)- कमी पाण्यावर वाढणारी, रस्त्याच्याकडेलाही आढळते. मध्यम आकाराचा काटेरीवृक्ष, मध्यम उंची. त्याची फळे आंबटगोड असल्याने आवडीने खाल्ली जातात. तापातील दाह, डोळ्यांची जळजळ , डोळ्यातील खुपर्‍या यावर वापर करतात. याच्या लाकडाचा उपयोग जाळण्यासाठीही होतो.
 • धोतरा - हे पडीक जागेत आढळणारे झुडूप. दलदलीच्या, घाणीच्या ठिकाणी ही वनस्पती वाढते. काटेरी विषारी गोल फळ. पांढरी जांभळट, लांब नरसाळ्या सारखी फुले. दमा, कफ, वेदना, सांधेसूज यावर याची पाने व बियांचा वापर करतात. त्रिभुवनकीर्ती, सूतशेखरमात्रा या औषधात याचा वापर होतो.
 • तुळस - ही घरोघरी आढळणारी आपल्या परिचयाची आहे. तुळस गणपतीला निषिध्द असली तरी गणेशचतुर्थीला ती वाहतात. वाहून झाल्यावर लगेचच बाजूला काढतात. ती डासांना दूर ठेवायला उपयुक्त तसेच तिचा मुख्य गुणधर्म म्हणजे हवा शुध्द करणे. आयुर्वेदानुसार महत्त्वाच्या कर्पुर, हिरवी, काळी तुळस आहेत. दमा, कफ, उचकी, पोटशूळ, सर्दी, नायटे, कीटकदंश या वरती उपयुक्त आहे.
 • शमी - ही गणपतीला अत्यंत प्रिय. शमीत सुप्त अग्नी असतो म्हणून यज्ञाच्या ठिकाणी वृक्ष आवर्जून दिसतो. तो कोरड्या हवामानात वाढतो. दमा, कुष्ठरोग, रक्तपित्तावरही उपयोग होतो.
 • आघाडा - पावसाळ्यात बागेत, शेतात, रस्त्याच्याकडेने आपोआप वाढते. ही असामान्य औषधीगुणधर्माची वनस्पती आहे. शरीरातील विषारीद्रव्ये काढून टाकण्यासाठी हिचा उपयोग श्वासाचे विकार, दातविकार, आर्तव साफ होणे, तेथील शूल, कान दुखणे तसेच विंचवाच्या विषावर उपयोगी.
 • डोरली – पडीक जागेत, कुंपणाजवळ, रानात आढळणारे, पावसाळ्यातील अत्यंत काटेरी झुडूप-पानांवरही ते असतात. बोराएवढी लहान फळे. डोरलीची मुळे अतिशय औषधी असतात. पोटदुखी, मुरडा, ज्वर यामध्ये मूळ वापरतात. त्वचारोगात, आणि उलटी थांबविण्यासाठी पानांचा रस देतात.
 • कण्हेर (करवीर) – परसदारी वा बागांमध्ये लावले जाणारे प्रसिध्द विषारी झुडूप. विविध रंगी फुले सुगंधी असतात. पाने केळ्यांच्या पानांप्रमाणे दिसतात. ही पाने उत्तम प्रिझर्व्हेटिव्ह आहेत. वाताविकार, सर्पविषावरही औषधी.
 • मंदार (रूई) - अर्कपत्र-ओसाड जागी सर्वदूर सहज येणारी वनस्पती पांढरी फुले येतात. त्यांना कॅलाटोपीज म्हणतात. हीच मंदारची फुले गणेशाला फार प्रिय . मंदारचे तीन प्रकार. हिला जांभळ्या रंगाची खूप देखणी फुले येतात. हिचा चीक ताप, खोकला, गुडघे दुखींवर उपयुक्त आहेच. तसेच हत्तीरोग व कुष्ठरोगावरही अत्यंत गुणकारी.
 • अर्जुन – खूप उंच वाढणारा पांढऱ्या खोडाचा पवित्र वृक्ष. पाने मोठी, लांबट असतात. या वृक्षात कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. रक्तदाब, हृदयविकार, मोडलेले हाड लवकर जुळते. यासाठी याच्या पानांचा रस घेतात तर, हृदयविकारात आतल्या सालांपासून केलेले ‘अर्जुनारिष्ट’ वापरतात. रक्त वाहिन्यांचे काठीण्य हा घालवतो. रामायणात झाडाचा उल्लेख आहे. याची फुले पांढरी पिवळसर सुवासिक असतात.
 • विष्णुकांत (शंखपुष्पी) –पावसाळ्यात माळरानावर शेतात उगवणारे, जमिनीलगत पसरणारे नाजूक औषधी तण. निळसर सुंदर फुले, बुद्धीवर्धक, अल्झायमर, कंपवात यावर ही वनस्पती गुणकारी आहे. ज्वरानंतर पौष्टिक म्हणून वापरतात.
 • डाळिंब – हे सर्वांच्या परिचयाचे. त्याचे अनेक प्रकार. देखण्या फुलांचे काटेरी झुडूप पित्त, कफनाशक, अतिसार, जंतावर अतिशय गुणकारी. काविळीवर देखील वापरतात. याच्या फळाच्या रसाने अशक्तपणा दूर होण्यास मदत.
 • देवदार – हिमालयात वाढणारा महाकाय सूचिपर्णी वृक्ष. पाने लांब पंजासारखी. अवजारे व कोरीव कामास उपयुक्त. देवदारापासून मिळणारे तेल सौंदर्यप्रसाधनासाठी व संधिवातावर अतिशय उपयुक्त. कफ, पडसे, उचकीवर हा औषधी. बाळंतकाढ्याचा हा घटक आहे.
 • मरवा (मरूकपत्र) – जमिनीलगत पसरणारी सुगंधी तेल, अगरबत्ती बनविण्यात याचा उपयोग केला जातो. जखमांचे डाग घालविण्यासाठी याच्या रसाचा उपयोग होतो.
 • पिंपळ – हा सर्वत्र दिसणारा मोठा डेरेदार वृक्ष. हा हवा शुद्ध करतो. त्याच्यामुळे शीतलता लाभते. श्वसनरोग, क्षयरोग अशा आजारांवर हा अतिशय उपयोगी. हा शक्तिवर्धक आहे. पिंपळाचा चिक हा तोतरेपणावर रामबाण उपाय आहे.
 • जाई – हा घराजवळ लावला जाणारा सुगंधी फुलांचा वेल. याच्या फुलांपासून अत्तर व उदबत्त्या बनवतात. पानांचा रस केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच तोंडातील व्रणांसाठी तो गुणकारी आहे.
 • केवडा(केतकी) -समुद्र किनाऱ्यालगत आढळतात केवड्याची बने. सोनकेवड्याला केतकी म्हणतात. याची नर फुले सुगुंधी असतात. याचाही वापर अत्तरे, उदबत्त्या तयार करण्यासाठी होतो. हा तापात वापरतात. हा अँटीऑक्सिडंट आहे. तसेच थायरॅाईड दोषांवर उपयोगी आहे. त्वचा सतेज होण्यासाठी फुलांचा रस वापरला जातो.
 • हदगा – (अगस्ती) – हा मध्यम आकाराचा वृक्ष, बहुउपयोगी वनस्पती हाद्ग्याच्या फुलांचा वापर खाण्यासाठी केला जातो. आदिवासी लोक या फुलांची भाजी करतात. मोठी बोरीच्या आकाराची फुले येतात. हा लहान मुलांच्या कफावर वापरतात. अर्धशिशीवर गुणकारी आहे व शक्तीवर्धक आहे.

 

या २१ फुलांबरोबरच पूजेत वापरली जाणारी...

 • लाल जास्वंद – केस रंगवण्यासाठी, टक्कल पडू नये व स्त्रियांच्या रक्तप्रदरावर औषधी आहे.
 • आपले राष्ट्रीय फूल कमळ ! याची पाने थोडी पाण्याबाहेर राहतात, पूर्णपणे पाण्यावर तरंगत नाही. हे हृदयरोग, पित्त, अतिसारावर उपयुक्त.
 • गणेशाचे मखर सजावटीसाठी कौंडल वापरले जाते. दमा, कान दुखणे, कृमी, फीट यावर औषधी ते विरेचन आहे.
 • मालकांगणी हे फार मोठे नर्व्हटाँनीक आहे. ते स्मरणशक्ती नाशावर उत्तम आहे. नुकत्याच झालेल्या अर्धांगवातावर गुणकारी आहे.

या पत्रींच्या माहितीचा मुख्य हेतू जेणे करून वेळ प्रसंगी या वनस्पतींचा उपयोग औषध म्हणून करता येईल. नेहमी पाहण्यात येणाऱ्या वनस्पतीची नावे व उपयोग समजेल. त्यांचे पूजनातील महत्व समजेल. या  पत्रींची एकवट पाहून  समजेल की  गणपतीला सर्वसमावेशक का म्हणतात. तेव्हा गणेशवंदन करून आसपासची वरील वनस्पती शोधू या त्यांचे जतन करण्याचा संकल्प करू या.

- मीनल पटवर्धन