आज गणपती बाप्पाच्या घरी वातावरण एकदम शांत शांत होतं. कुठेही उंदिरमामांची धावपळ नाही की पळापळ नाही. मोडतोड नाही की पडापड नाही. उंदीरमामा एका कोपर्‍यात विचारमग्न आहेत. तेवढ्यात गणपती उंदीरमामांना शोधत येतात. जरा फेरफटका मारून येऊ म्हणून मस्त बेत आखला होता. पण इकडे तर उंदीरमामा चिंतातूर! अरे बापरे!

 गणपतीबाप्पांनी जोरात विचारले, काय पिटुकलेराव. कसला एवढा विचार करताय? कसली चिंता वाहत आहात? हे ऐकून उंदीरमामा भानावर आले. बरं झाला बाप्पा तुम्हीच विषय काढला म्हणून. मला तुम्हाला चार गोष्टी विचारायच्या आहेत. द्याल खरीखरी उत्तरे?  बाप्पा गालातल्या गालात हसत म्हणाले  म्हणजे, ‘‘आज माझी मुलाखत आहे वाटत!’’ ‘‘तसा समजा हवा तर.’’ उंदीरमामांनी उत्तर दिले. ‘‘विचार मग पटापट.’’ गणपती बाप्पा म्हणाले.

उंदीरमामा : दर वर्षी या विचित्र विचित्र स्वभावाच्या माणसांत जायची भीती नाही वाटत तुम्हाला ?

बाप्पा : अरे, भाव तसा देव. माझे छोटे छोटे भक्त माझी किती आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांच्या प्रेमळ हाकेमुळे व निरागस भक्तीमुळे जावे लागते बाबा. मला ही त्यांना भेटावेसे वाटतेच ना!

उंदीरमामा : मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. असे तुझे भक्त. काय काय गंमतीशीर प्रकार करतात पूजेच्या वेळी? कंटाळवाणे वाटते फार. तुला राग नाही येत? 

बाप्पा : अरे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही बाबा. फुलांचा  नुसता भडीमार. श्वास घेता येत नाही धड. माझे हे कान दुखतात, डोके भणभणते ती कर्कश्य गाणी ऐकून. पण त्यांच्यातील भेदभाव नष्ट होतो. भांडणे कमी होतात. हेच माझं समाधान आणि हो सारखच तो उदबत्ती आणि धुपाचा धूर. मला ही गुदमरायला होता. पण त्या औषधी धुरामुळे रोगजंतू नष्ट होतात. माझे भक्त निरोगी राहतात. म्हणून मी घेतो सांभाळून. ते आनंदी तर मी आनंदी.

उंदीरमामा : आणि तुझे ते छोटे भक्त तर काय? आधी पोटोबा आणि मग विठोबा. फक्त प्रसादासाठी आरत्या म्हणतात. पटतं का तुला?

बाप्पा : अरे प्रेमाचा, भक्तीचा मार्ग पोटातून जातो म्हणतात. त्या 10 दिवसात बच्चे कंपनीची काय चंगळ असते. प्रत्येक घरात वेगवेगळे गोडधोड पदार्थ तयार होतात. प्रसाद, नैवेद्य दाखविले जातात. मोदकांची तर रेलचेल असते. एरव्ही मोठ्यांना वेळ नसतो, म्हणून ते छोट्यांना धड  खायलाही घालू शकत नाहीत. या काळात रोजरोज नवा खाऊ मिळतो. खूप खूप मज्जा येते त्यांना.

उंदीरमामा : कसलं काय! त्या छोट्यांना आरती-श्लोकांचा अर्थही माहीत नसतो. ते कोणताही शब्द कुठेही घुसडतात. त्यांना तू कधीच ओरडत नाहीस. का बरं? 

बाप्पा : अरे बाबा, दगडापेक्षा वीट मऊ. एरवी ही छोटी मंडळी काय काय बोलत असतात. काय त्यांची भाषा? मोठ्या माणसांकडून ऐकलेले वाईट शब्द जसेच्या तसे वापरतात रे! तू तर ते ऐकूही शकत नाही. पण तुला माहीत आहे की, त्यांनी मनात नुसता वाईट विचार जरी केला तरी मला ऐकू येतो. या दहा दिवसात मात्र मोडक्या-तोडक्या भाषेत का होईना ते चांगले वाचतात. आरत्या श्लोक म्हणतात. हळूहळू सुधारतील धीर धर जरा.

उंदीरमामा : तुला त्यांचाच कौतुक. प्रसाद आपल्यासाठी तयार करतात आणि सगळा हेच फस्त करतात. माझा काही विचार करशील की नाही?

 बाप्पा : अरे, एक तीळ सात जणांनी खाल्ला होता ना? मग खातात ते आपला प्रसाद तर बिघडलं कुठे? सर्वांनी मिळून खाल्ले की त्याची गोडी? आणखी वाढते. वाटून घेण्याची सवय लागते. प्रेम, माया, ममता, मैत्री, भक्ती या गुणांची वाढ होते. माझे छोटे भक्त शहाणे मोठे व्हावेत असे मला फार फार वाटते.

उंदीरमामा : तुला माहीत आहे का? कुठल्या-कुठल्या गोष्टींपासून मूर्ती बनवतात आणि नाही विरघळल्या की देतात निसर्गात इकडे-तिकडे फेकून. त्यामुळे प्रदूषण होते. त्यांचा सर्वांनाच त्रास होतो. असे तूच म्हणत असतोस ना? तू त्यांना शिक्षा का नाही करत?

 बाप्पा : अरे हो हो, खरंय तुझं. पण एवढा राग चांगला नाही. तू दर वर्षी माझ्याबरोबर येतोस ते काय फक्त मोडक खायला ? अरे आपल्या उत्सवात आता फार चांगले बदल होऊ लागलेत. आपले भक्त स्वतःबरोबर इतरांच्याही भल्याचा विचार करू लागलेत.

उंदीरमामा : म्हणजे काय? मी नाही समजलो?

बाप्पा : बघ आता विचार कर. नदीचे प्रदूषण होते म्हणून ते पूजेचे साहित्य, निर्माल्य नदीत टाकत नाहीत. फुलांपासून खत तयार करतात. आता शाडू मातीच्या मूर्ती तयार करतात. त्या ताबडतोब पाण्यात-मातीत एकरूप होतात. काहीजण मूर्ती दान करतात. बदल होतो आहे. फक्त त्याचा वेग वाढला पाहिजे. एकदम मोठा घास घेता येणार नाही.

नाहीतर अति घाई आणि संकटात जाई असे व्हायचे. होईल हळूहळू सगळं नीट.

उंदीरमामा : बाप्पा मानलं तुला. तुझ्या भक्तांना तू कधी एकटं टाकत नाहीस. सर्वांचं भलं करतोस. म्हणून तू सर्वांचा लाडका आहेस. आता माझीही इच्छा पूर्ण कर - ‘देवबाप्पा, देवबाप्पा नवसाला पाव, मोदकाचं झाड माझ्या अंगणात लाव.’

- सुनिता वांजळे