सर्वत्र गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. तुम्हीही उत्सवाच्या तयारीला लागला असाल ना! आरास कशी करायची?, यंदाची मूर्ती कशी आणायची हे मनोमन ठरवलेही असेल. शाळेत जाता-येता गणेशमूर्तीचे अनेक स्टॉल तुमच्या दृष्टीस पडत असतील. मित्रांबरोबर जाता-येता तेथे रेंगाळत असाल. त्यातील कुठली मूर्ती कोणाला आवडली, याविषयी चर्चाही रंगत असतील. त्यात कोणाला बालगणेशाच्या रूपातील तर कोणाला मार्तंड भैरवाच्या रूपातील, कोणाला बाहुबली सिनेमातील बाहुबलीच्या रूपातील गणेशमूर्ती आवडल्या असतील. गणेशोत्सव जवळ आला की, अशा विविध रुपातील, नाना प्रकारच्या असानावर आरूढ झालेल्या गणेशमूर्ती आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. या अनेक प्रकारच्या मूर्ती पाहून एवढ्या वेगवेगळ्या रुपातील मूर्ती कशा साकारल्या जातात याविषयी तुम्हाला उत्सुकता असेलच. चला तर मग, या गणेशमूर्ती कशा साकारल्या जातात ते जाणून घेऊ या.

गणेशोत्सवाला सहा महिने अवधी असताना मूर्तिकार मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. आपण बाजारात सध्या ज्या मूर्ती पाहातो, त्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासून तयार करण्यात आलेल्या असतात. प्लॅस्टर ऑफ पॅरीस हा एक चुन्याचाच प्रकार आहे. मूर्ती तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरीसची माती किलोच्या हिशोबात मिळते. साधारण 25 किलोची एक गोणी असते. व्यावसायिक मूर्तिकार   आवश्यक तेवढ्या गोण्या एकाच वेळी विकत आणतात. प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासून मूर्ती तयार करताना, मूर्तिकार सुरुवातीला हाताने एक सुबक मूर्ती तयार करून घेतात. त्या मूर्तीसारख्याच इतर अनेक मूर्ती तयार करण्यासाठी सुरूवातीला तयार करण्यात आलेल्या मूर्तीपासून ‘साचे’ तयार केले जातात. अनेक व्यावसायिक मूर्तीकार साचे तयार करण्यासाठी लागणार्‍या सुबक मूर्ती चांगल्या मूर्तिकारांकडून विकतही आणतात. मूर्तीवरून साचा तयार केल्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरीसमध्ये फक्त पाणी मिसळून, त्याचे जरासे पातळ मिश्रण साच्यात ओतले जाते. साधारण दोन ते तीन तासांनी हे मिश्रण सुकल्यानंतर साच्यातून तयार झालेली मूर्ती बाहेर काढली जाते. साच्यातून काढल्यानंतर मूर्ती पूर्णपणे सुकलेली नसते, तसेच साच्यातून काढलेली मूर्ती कच्च्या स्वरूपात असते. साच्यातून काढताना मूर्तीच्या हातांना, इतर भागांना धक्का लागून ते खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा मूर्ती दुरूस्त करून काही दिवस पुन्हा त्या मूर्ती सुकण्यासाठी तश्याच ठेवल्या जातात. त्यानंतर पूर्णपणे सुकलेल्या मूर्तीला घासून, फिनीशींग करून जास्तीत जास्त गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. मूर्ती तयार करून, त्यावरून शेवटचा हात फिरवेपर्यंतच्या प्रक्रीयेला साधारण एक आठवड्याचा कालावधी लागतो.

फिनीशिंग नंतर मूर्तीला रंग देण्यास सुरूवात केली जाते. पहिल्यांदा संपूर्ण मूर्तीला यंत्राच्या साहाय्याने एकच रंग दिला जातो. हा रंग सुकल्यानंतरच मूर्तीवर वेगवेगळे रंगकाम केले जाते. त्यामध्ये वस्त्रे, सोंड, आयुधू,  आभुषणे यांना वेगवेगळे रंग दिले जातात. जेणेकरून मूर्ती अधिक आकर्षक दिसावी. हे रंगकाम ब्रशच्या साहाय्याने हातानेच केले जाते. यासाठी वापरण्यात येणारे रंग रासायनिक असातात. पेट्रोल, रॉकेल, थिनर मिश्रित रंग याकता वापरले जातात. मूर्तीच्या आभूषणांना चमक यावी म्हणून थिनर मिश्रित रंग वापरले जातात. मूर्तीचे रंगकाम पूर्ण झाल्यानंतर मूर्तीची सजावट केली जाते. अलीकडे मूर्तीच्या दागिन्यांना विविध प्रकारचे खडे, चमक लावून सजवले जाते. अशा रीतीने एक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी साधारण दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो.

छोट्या ते मध्यम आकाराच्या मूर्ती तयार करण्यासाठी एकच साचा वापरला जातो. मोठ्या आकाराच्या मूर्ती तयार करताना मूर्तीचा प्रत्येक भाग वेगळ्या साच्यात तयार करून नंतर सर्व भाग जोडून त्याची अखंड एक मूर्ती साकारण्यात येते. अशा गणेशमूर्तींच्या सोंडेला हातानेच आकार दिला जातो. विविध सार्वजनिक मंडळांच्या उंचच-उंच मूर्ती आपण  पाहतो, त्या मूर्तिकारांनी पूर्णपणे हातानेच साकारलेल्या असतात.

प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती ज्या पद्धतीने बनवल्या जातात,  साधारणपणे त्याच पद्धतीने शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यात येतात. पण शाडूच्या मातीपासून मूर्ती करताना वेगवेगळ्या साच्यात मूर्तीचे वेगवेगळे भाग तयार करून, नंतर एक मूर्ती साकारली जाते. तसेच, शाडूच्या मूर्ती रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.

आज सर्वत्र शाडूच्या मूर्ती घेण्याचा आग्रह केला जातो, कारण विसर्जनानंतर शाडूच्या मूर्तिंनी जलप्रदूषण होत नाही. या उलट प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने, मूर्तीला देण्यात आलेल्या रासायनिक रंगांमुळे जलचर प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. जलप्रदूषणाबरोबरच पर्यायाने पर्यावरणाचीही हानी होते. शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्वस्त असल्याने अनेक जण  याच मूर्ती घेणे पसंत करतात.

पण मित्रांनो, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किंवा शाडूच्या मूर्तीऐवजी एक उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही स्वत:च्या हातांनी गणेशमूर्ती साकारण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारच्या मातीपासून तुम्ही मूर्ती बनवू शकता. कदाचित इतर मूर्तिकारांसारखी ती आखीव-रेखीव येणार नाही, पण तुम्ही साकरलेल्या गणेशमूर्तीला आपल्या देवघरात स्थानापन्न करताना एक वेगळाच आनंद होईल, आणि तसेही मूर्ती कोणतीही आणि कोणीही साकारलेली असली तरी, ज्या भावनेने आपण तीची स्थापना करतो, ती भावना महत्त्वाची. देवत्व तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत असते आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही जर साध्या मातीपासून स्वत: बनवलेली मूर्तीच या वर्षी स्थानापन्न केली, तर ते गणपती बाप्पाला जास्त आवडेेल!

- रेश्मा बाठे