पर्वत म्हटले की डोळ्यांसमोर येतो तो शूरासारखा उभा असलेला, अभेद्य, येणार्‍या कुठल्याही संकटाचा न डगमगता सामना करणारा आणि आपल्या प्रदेशाचे रक्षण करणारा साहसी शिपाई!, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पर्वतरांगा म्हणजे आपल्याला निसर्गाकडून मिळालेले वरदानच आहे. जगाच्या निर्मितीमध्ये पर्वतरागांनी खूप मोलाचे काम केलेले आहे. या पर्वतांमुळेच वेगवेगळे भूप्रदेश निर्माण झाले आहेत. पृथ्वीच्या निर्मितीच्या काळात तिच्यावर प्रचंड भूकंप, पूर, वादळे, ज्वालामुखी यांचा हाहाकार उडाला होता; पण या सर्वांतूनच पर्वतरांगा तयार झाल्या आणि त्यामुळे विविध प्रदेश!

आपल्या महाराष्ट्रालादेखील पर्वतरांगांचे वरदान लाभले आहे. संपूर्ण पश्‍चिम भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरल्या आहेत. जूणकाही महाराष्ट्राभोवती तटबंदीच उभारली गेली आहे. सह्याद्री पर्वत म्हणजे दख्खनच्या पठाराची पश्‍चिम सीमा. अगदी गुजराथपासून ते दक्षिणेकडील अन्नमलाई एवढ्या विस्तृत क्षेत्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरल्या आहेत. या पर्वतरांगांंची लांबी सुमारे 1500 किलोमीटर एवढी मोठी आहे. या सर्व पर्वतरांगांमध्ये अग्निजन्य खडक आढळतो.

महाराष्ट्रामधला सह्याद्रीचा भाग हा तापी नदीच्या दक्षिणेस असणार्‍या गाळण्याच्या डोंगरापासून गोव्यापर्यंत मानला जातो. सातमळा, हरिश्‍चंद्र व महादेवाचे डोंगर हे पूर्वेकडील पठारावर पसरले आहेत. बाळेश्‍वराच्या डोंगरातील कळसूबाई (1646 मी.) हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे.

गोदावरी, भीमा, कृष्णा या प्रमुख नद्यांचा उगम सह्याद्रीमध्ये होतो; तर वैतरणा, सावित्री, शास्त्री या वेगवान नद्यासुद्धा सह्याद्रीमध्ये उगम पावतात व अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पर्वतरांगा या नद्यांच्या उगमासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच, या पर्वतांमुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया होऊन पाऊस पडण्यासाठी मदत होते. यातूनच नद्यांची निर्मिती होेते. या नद्यांमुळेच तर आपल्याला शुद्ध पाणी पिण्यास मिळते.

गोवा व कर्नाटक राज्यातसुद्धा सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहे. या पर्वतरागांच्या दक्षिणेस निलगिरी पर्वत आहे. याच पर्वतात पूर्व घाट व पश्‍चिम घाट एकत्र येतात. त्या ठिकाणी केमेनगुंडी व कुद्रेमुख ही शिखरे आहेत. या शिखरांचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे शोला फॉरेस्ट तयार झालेले आहेत. दोन पर्वतांमध्ये अडकलेले जंगल म्हणजे ‘शोला’! या जंगलात मोठमोठी सदाहरित झाडे आढळतात; तसेच अनेक दुर्मीळ प्राणी, पक्षी, कीटकसुद्धा वास्तव्य करतात. या पर्वतांवरील झाडांमुळे जमिनीतील माती धरून ठेवायला मदत होते, परिणामी जमिनीची धूप होत नाही.

सह्याद्री पर्वतरांगांमुळे संपूर्ण पश्‍चिम भागात सदाहरित व घनदाट जंगलांची निर्मिती झालेली आहे. पश्‍चिम घाटाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घाटात अनेक प्रदेशनिष्ठ, तशाच दुर्मीळ वनस्पती आढळतात. पक्ष्यांच्या असंख्य जाती येथे पाहायला मिळतात. बेडूक, साप यांच्या काही दुर्मीळ जाती फक्त इथेच पाहायला मिळतात. कास पठारावर ‘ड्रॉसेरा’सारख्या कीटकभक्ष्यी वनस्पती आढळतात, तर ‘कार्वी’सारख्या दर सात वर्षांनी फुलणार्‍या वनस्पती येथे पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे महाराष्ट्राला संपन्न जैवविविधता लाभलेली आहे. जी इतर ठिकाणी क्वचितच बघायला मिळते आणि म्हणूनच महाराष्ट्र सर्वच बाबतीत श्रीमंत राज्य आहे.

मध्य सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांच्यामध्ये पालाघाट खिंड आहे. या खिंडीमधल्या जंगलात निलगिरी फ्लायकॅचर, ब्लॅक ऑरेंज फ्लॉयकॅचर यांसारखे देखणे; पण दुर्मीळ पक्षी आढळतात. कोल्हापूरजवळच्या अंबोली घाटात ब्लॅक पँथर हा दुर्मीळ प्राणी दिसून आला आहे. नैॠत्येकडून येणारे नैॠत्य मान्सून वारे सह्याद्रीस अडतात, त्यामुळे सह्याद्रीच्या पश्‍चिम भागात जास्त पाऊस पडतो. कोळसा, लोह, खनिज यांचे मोठे साठे या पर्वतरांगांमध्ये आढळतात.

सह्याद्रीच्या पर्वतरांगा या फक्त नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहेत असे नाही, तर तेथील गड-किल्ले यांमुळे त्यांना सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे. शिवाजी महाराजांना या पर्वतराजींमुळेच तर स्वराज्याची स्थापना करता आली. अशा कणखर गड-किल्ल्यांमुळे औरंगजेबाला त्यावर कधीच चढाई करता आली नाही. म्हणजेच, नकळतच या पर्वतरांगांपासून इथल्या सर्व माणसांचे बाहेरील शत्रूंपासून नेहमीच रक्षण होत आले आहे.

हरिश्‍चंद्रगड, राजगड, जीवधन-नाणेघाट, लोहगड, शिवनेरी, रायगड, तोरणा, प्रतापगड, कोरीगड, भीमाशंकर, मंडणगड अशा असंख्य गडांचे वैभव महाराष्ट्राला लाभले आहे.

अशा या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटला पाहिजे. या पर्वतांमुळेच आपली संस्कृती समृद्ध झाली आहे. आपले आयुष्य सुखकर बनले आहे; त्यामुळे या सर्व पर्वतांचे, गडांचे, किल्ल्यांचे रक्षण करणे; त्याबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

- पल्लवी दाढे