मित्रांनो, लहान बाळाला पावडर लावण्यासाठी आई जेव्हा पावडरचा गोल डबा उघडते, तेव्हा डबीत असतं ते मऊ केसांचं गोल आकाराचं पांढरं फूल. त्यालाच पावडर लावण्याचा ब्रश किंवा पावडर पफ असंही म्हणतात. अगदी अशाच आकारचं आणि असंच दिसणारं फूल तुम्हांला चक्क रस्त्याकडेच्या किंवा जंगलातल्या झाडावर पाहायला मिळालं तर? नक्कीच आश्‍चर्य वाटतं अपल्याला असं फूल प्रत्यक्षात झाडावर पाहिल्यावर! निसर्गाची किमया अफाट आहे, हेच जाणवतं कुंभीचं हे फूल पाहिल्यावर! मार्च, एप्रिल, मे महिन्यात कुंभीच्या दणकट झाडावर फांद्याफांद्यांवर ही गोल, मोठ्ठी, गुलाबी-पांढरी किंवा पिस्ता रंगाची ही फुलं फुललेली पाहाणं ही मोठी दुर्मीळ आणि आनंददायी गोष्ट असते. कोकण-गोव्यात तर कुंभीची फुलं कुंभीच्या झाडावर फुललेली हमखास पाहायला मिळतात. पांढरं किंवा पोपटी आकाराचं फूल छान दिसतंच; परंतु कृष्णकमळाप्रमाणे जेव्हा खालच्या बाजूस गुलाबी आणि वरच्या भागात पांढरं असं दुरंगी फूल पाहायला मिळतं, तेव्हा ती नजरेला पर्वणीच असते. सुटीत जंगल फिरायला गेल्यावर कुंभीचं झाड जरूर पाहावं. एरवी ओबडधोबड आणि वेडंवाकडं वाटणारं हे झाड फुलांनी भरून गेलं की, अत्यंत सुंदर भासतं. गोव्यात कोंब्यो (घेाउूे) आणि कोकणात कुंभी-कुंभा या नावानं ओळखलं जाणारं हे झाड केरिया अरबोरिया (उरीशूर ईउेीशर) या शास्त्रीय नावानं परिचित आहे. (ङशलूींहळवर उशरश या कुळातील) कुंभी हा संस्कृत शब्द आहे. त्याच नावाने मराठीत हे झाड ओळखलं जातं. कोकण आणि पश्‍चिम घाटाचा पायथा..., गोवा या भागात समुद्रसपाटीच्या भागात हे झाड आढळतं. हे झाड तसं खूप मोठं नसलं, तरी 50-60 फूट उंच वाढू शकतं. डेरेदार वृक्ष असतो. कुंभीची पानं जाड आणि आकारानं मोठी असतात. फांद्या तशा वेड्यावाकड्या वाढलेल्या आणि प्रत्येक फांदीच्या टोकाशी हे कुंभीचं फूल पाहायला मिळतं. भरपूर पाकळ्या आणि मध्ये एक मजबूत केशरदांडा, असं याचं स्वरूप, म्हणजे केसाळ पाकळ्या या एखाद्या फुलातील केसरफळांप्रमाणेच भासतात. अगदी पावडर लावण्याचं फूलच म्हणा ना! हे फूल आकारानंही इतकं मोठं असतं की, एका मुठीत एकच फूल मावेल एवढं! फुलाच्या खालच्या बाजूला मजबूत असा हिरवा देठाचा भाग असतो. खाली हिरव्या पोपटी रंगाच्या चकत्यांवर केसाळ रंगीत फुलामध्ये केशरदांडा असं अवर्णनीय सौंदर्य या फुलांचं असतं. फुलांचा रंग तर इतका मनमोहक असतो की, पाहातच राहावं. कधी दुरंगी रंगाचं फूलही पाहायला मिळतं, तर कधी पांढरशुभ्र पावडर फूल! कधी किंचित पोपटी रंग धारण करणारं नुकतंच उमललेलं ताजं फूल. अर्थात ही फुलं टिकतातही बरेच दिवस. पुढे हळूहळू सुकत जातात आणि मग त्या ठिकाणी पाहायला मिळतं ते मुठीत न मावणारं कुंभीचं हिरवं पोपटी फळ. ही फळं इतकी टणक व मोठी असतात की, ती छोट्या हिरव्या चेंडूप्रमाणे भासतात. चक्क टेनिसच्या हिरव्या बॉलप्रमाणे दिसतात. त्यालाच हिंदीमध्ये ‘बंदर लड्डू’ असंही म्हणतात. मराठीत रानपेरू असंही काही जण म्हणतात. फुलांचा हंगाम संपला की, ही मुठीएवढी फळं झाडावर लगडतात आणि झाडाला वेगळीच शोभा प्राप्त होते. या झाडाच्या फुलांचे आणि फळांचे औषधी उपयोग आहेत. सर्दी-पडशावरही त्याचे उपयोग होतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये ही फुलं-फळं वापरतात. कुंभीचं झाड एरवी दिसायला खडबडीत, सालीवर जाड चौकोनी आकाराची रचना असलेलं; पण एकदा का ते फुलांनी भरून गेलं की, त्याचं सौंदर्य पाहातच राहावं. लहानपणी खेडेगावात आम्हाला दहा रुपयांचा चेंडूही खेळायला नसायचा, तेव्हा ही कुंभीच आमचा चेंडूचा हट्ट पुरवायची. मग फळीची बॅट आणि कुंभीचा बॉल असा खेळ रंगायचा. आजही त्या आठवणीत मी म्हणूनच रंगून जातो.

- सुहास बारटक्के