अंतरात्म्याला साद घालत चेहर्‍यावर कसल्याशा आंतरिक भावनेने उमटलेलं हास्य त्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर आणखीनच प्रसन्न वाटत होतं. आपली पांढरीशुभ्र सशाच्या केसांसारखी मऊशार दाढी कुरवाळत तो म्हातारा मनातच काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या मागे प्रकाशच प्रकाश आणि सुगंधी धूर... मधूनच त्याचं सुहास्य वदन...

अंगात भगवं-पांढरं वस्त्र आणि पायापर्यंत लोंबणारे त्याचे गळ्यातले रेशमी वस्त्र-कफनी...

‘बोल बच्चा, तू मनका सच्चा।’ असं म्हणत गळ्यातील काळ्या-हिरव्या मण्यांची माळ बोटात पकडून तो पुटपुटला. ती माळ त्याने कुठल्या बाजारातून की कुठून खरेदी केली होती कुणास ठाऊक... ती माळ त्याने बोटात पकडून जप सुरू केला आणि थोड्या वेळाने पुन्हा पुटपुटला ‘बोल बच्चा, तुझे क्या चाहिए? दिल्ली का कुतुबमिनार या आग्रे का ताजमहाल? तू अगर चाहे तो में कुछ भी दे सकता हूँ, एक पलक झपकनेसेभी पहले.’ फारच आश्‍चर्यकारक होता तो म्हातारा... त्याने पुन्हा त्याच्या लांबच लांब भगव्या झग्यातून बोटाहून थोडी लांब असणारी काठी काढली. काठीभोवती प्रकाशाची वर्तुळं घिरट्या घालत होती. तो प्रकाश पांढराशुभ्र नव्हता. ती काठी त्याने हवेतच दोन-तीन वेळा वर-खाली, इकडे-तिकडे अशी क्रमाने फिरवली आणि क्षणात कुतुबमिनार आणि ताजमहाल जसे आहेत, तसे त्याच्या हाताच्या तळव्यावर निर्माण झाले... ‘अब देख मेरी कमाल।’ म्हणत त्याने डोळे बंद केले, मनात काहीतरी पुटपुटला, डोळे उघडले... डोळ्यांतून प्रकाश नुसता वाहतच होता. प्रकाशाचे कवडसे जणू... त्या कवडशांतून असंख्य निळे, पिवळे, हिरवे, पांढरे, गुलाबी असे विविधरंगी पक्षी बाहेर पडले. पक्षी किती असावेत, याचा अंदाज येत नव्हता. काही पक्षी फारच वेगळे होते. आत्तापर्यंत कुणीही न पाहिलेले... पक्ष्यांना पंख होते, पण ते त्यांच्या डोक्यावर तुर्‍यासारखे... म्हातारा हे सर्व करत करत खदखदून हसत होता. खूप मोठ्याने..!

‘ए बच्चे ठिक तरह से बैठ, नहीं तो एक लगाऊँगा गालपर।’ तो म्हातारा जरा रागानेच ओरडला. या ओरडण्याच्या आवाजाने विठू त्याच्या अर्धवट झोपेतून जागा झाला. स्वप्नातला म्हातारा एवढा रागीट कसा झाला? याचा विचार करत विठू पूर्ण जागा झाला आणि त्याला आठवलं की, आपण एस.टी.मधून प्रवास करत आहोत आणि शेजारी एक पांढरी दाढी असलेला म्हातारा बसलेला आहे. झोपेत मध्येमध्ये तो विठूला त्याच्या स्वप्नात दिसत होता आणि विठू त्याच्या खांद्यावर कलंडत होता. विठूला स्वप्न पाहायची आवडच होती. चंद्र, तारे, आकाश, पक्षी यांची स्वप्नं त्याला पडायची. त्याची शाळा परगावी असल्याने तो एस.टी.तून रोज शाळेत जात असे. मधूनच एक डुलकीही यायची. या डुलकीमध्ये आजूबाजूची माणसं, चित्रं त्याच्या स्वप्नात यायची. स्वप्नापूर्वी त्याने चित्रांच्या पुस्तकात कुतुबमिनार, ताजमहालची चित्रं पाहिली होती. तो म्हातारा, ही चित्रं त्याच्या स्वप्नात आली होती. स्वप्नातला जादू करणारा म्हातारा वास्तवात एवढा रागीट कसा असू शकतो, याचा विचार करता करता त्याच्या दप्तरातून त्याने एक ‘अग्निपंख’ नावाचं पुस्तक बाहेर काढलं, वाचनासाठी. ते होतं भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांचं. विठूने सहज ते पुस्तक न्याहाळलं आणि त्याला त्या पुस्तकातलं एक वाक्य फारच आवडलं. अब्दुल कलामांनी लिहिलं होतं, ‘स्वप्नं पाहा, मोठी स्वप्नं पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या.’ अब्दुल कलामांनी मातृभूमीसाठी, तिच्या प्रगतीसाठी मोठी स्वप्नं पाहिली आणि ती पूर्ण केलीसुद्धा. विठूला स्वप्नांची गंमतच वाटली आणि ताकदसुद्धा समजली. मुळातच विठूला स्वप्नं पाहायचं वेड. आता तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठापण केली पाहिजे, याची त्याला जाणीव झाली होती... एस.टी. आता त्याच्या शाळेच्या स्टॉपवर थांबली. विठू एका नव्या स्वप्नात प्रवेश करणार होता, अब्दुल कलामांचं बोट धरून...

- शशिकांत कुपटे

कलाशिक्षक, वासुदेव बळवंत फडके विद्यालय