संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देवकुळे मास्तर त्यांची सायंफेरी आटपून पेन्शनर कट्ट्यावरून घरी परतत होते. घराच्या दारात उभे राहून बेल वाजवत असताना त्यांचे लक्ष समोरच्या काडगावकरांच्या फ्लॅटकडे गेले. काडगावकरांची शीतल तिच्या सहा-सात वर्षांच्या अर्णवला सारखा मोबाईलवर खेळतो म्हणून रागवत होती. मास्तरांना राहावले नाही आणि ते काडगावकरांच्या घरात शिरले. शीतलने त्यांना बसायला खुर्ची दिली व आपली कैफियत मांडायला सुरुवात केली. मास्तरांनी ‘थांब मी बोलतो’, अशी खूण केली. अर्णवला काहीतरी निमित्त काढून त्यांनी बाहेर पिटाळले.

“काका, हे ब्ल्यू व्हेलचं प्रकरण वाचलं, तेव्हापासून मला अर्णवच्या हातात मोबाईल द्यायची भीतीच वाटते. बरं, अर्णवला समजावून सांगताही येत नाही की, मोबाईलमध्ये काय वाईट आहे ते. तो म्हणतो, माझं होमवर्क पूर्ण झालेलं आहे. ग्राऊंडवर मी खेळूनही आलो आहे. आता मी काय करू?”

“अगदी बरोबर आहे त्याचा प्रश्‍न.”, मास्तर म्हणाले. “तुम्हा पालकांची मला गंमतच वाटते. दोन-तीन वर्षांची मुलं काही दुकानात जाऊन मोबाईल विकत घेत नाहीत. तुम्ही पालकच त्यांच्या हातात कौतुकाने मोबाईल देता आणि मग एखाद्या निळ्या देवमाशानं एखाद्या मुलाला गिळलं की खडबडून जागे होता. पालकांनी मुलांसाठी वेळ काढला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, अशी चहुबाजूंनी हाकाटी सुरू होते.”

“हे अगदी खरं आहे, पण पालकांनी वेळ जरी काढला अगदी आटापिटा करून, तरी त्या वेळेत संवाद साधायचा म्हणजे नक्की काय करायचं, हे फारसं कोणी सांगत नाही.” शीतल म्हणाली.

“मी सांगतो ना.”, मास्तर हसून म्हणाले. “संवाद म्हणजे गप्पा. वेगवेगळ्या विषयांवर भरपूर गप्पा. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गप्पागोष्टी अगदी ठरवून वेळ काढून केल्या पाहिजेत, असंही नव्हे. शीतल, आपल्या पुण्यामध्ये श्री. ज. जोशी नावाचे लेखक होते. (कै. श्री. ज. जोशी - ‘आनंदी गोपाळ आणि बखर रघुनाथाची’ या कादंबरीचे लेखक) त्यांनी लिहिलेला एक किस्सा आठवतो. पुण्यात अनाथ मुलांसाठी असलेल्या एका वसतीगृहयुक्त शाळेचे त्या मुलांसाठी असलेले नियम फार कडक होते. एकदा त्या मुलांनी भीतभीत वसतिगृहाच्या चालकांना विनंती केली की, आम्हाला आठवड्यातून थोडा वेळ तरी परस्परांशी गप्पा मारायला मिळाव्यात. चालकांनी विनंती मान्य केली आणि आठवड्यात एक दिवस रात्रीच्या वेळी अर्धा तास वेळ दिला. त्या वेळी ते चालक सर्व मुलांना एका हॉलमध्ये एकत्रित करत आणि स्वत:समोर बसून करड्या आवाजात फर्मावत, आता मारा गप्पा. अर्धा तासच फक्त. कै. श्री. ज. जोशी लिहितात, “एका हॉलमध्ये कोंडाळे करून भीतभीत चालकांकडे पाहाणारी आणि चिडीचूप बसलेली मुले असे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे येते.”

शीतल मनापासून हसली. मास्तर पुढे म्हणाले, “तेव्हा संवाद हा सहजगत्या साधला गेला पाहिजे. तो सकाळी चहा पिता पिता होऊ शकतो. संध्याकाळी एकत्र जेवताना होऊ शकतो आणि टी.व्ही.वर क्रिकेटचा सामना पाहता पाहता होऊ शकतो. तू मला सांग शीतल की, आई-वडिलांनी बरोबर साडेपाच वाजता ऑफिसचे काम पॅकअप केले, सहा वाजता घरात आले आणि सहा ते अकरा वेळ मुलांना दिला असे होणे आजच्या काळात शक्य आहे का?”

“छे! फारच अवघड आहे आणि कुणा पालकांना ते जमलं, तरी इतका वेळ एकमेकांसमोर बसून करायचं तरी काय? एकमेकांची नुसती तोंडं बघत बसायची?”, शीतलने हसत हसत विचारले.

“नाही ना! म्हणूनच मुलांशी संवाद साधण्यासाठी, सर्वांनी एकत्र येण्यासाठी काही किमान वेळ पालकांनी देणे आवश्यक असले, तरी त्या वेळेत आणि एरवीही मुलांबरोबर काय बोलायचे याचे नियोजन - हो, नियोजनच- गरजेचे आहे. मुलांच्या दृष्टीने संस्कार हे नकळत होत असतात. पण पालकांनी मात्र संस्कार आणि त्यासाठी करावा लागणारा संवाद हे जाणीवपूर्वक केले पाहिजे. म्हणून नियोजन आवश्यक आहे. म्हणून मुले तीन-चार वर्षांची झाल्यापासून त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरू करावयास हव्यात. या मुलांना त्यांच्या वयाला साजेशा अशा राक्षसांच्या, पर्‍यांच्या, राजपुत्रांच्या भरपूर गोेष्टी सांगाव्यात. गाणी शिकवावीत. वेगवेगळे बैठे, मैदानी खेळ शिकवावेत. मुलं अशा गोष्टीत जितकी जास्त गुंततील तितके मोबाईल, कॉम्प्युटर आणि टी. व्ही. हे तापत्रय कमी परिणामकारक होतील. मुलांना बागेत, सहलीला घेऊन जाण्यास सुरुवात करावी. बाहेरच्या जगात मुलांना नेल्यावर मुले जिज्ञासेने वेगवेगळे प्रश्‍न विचारतील. (विचारत नसतील, तर त्यांना विचारण्यास प्रवृत्त करावे.) त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांची उत्तरे द्यावीत.”

“मुले जसजशी मोठी होत जातील तसतसे गोष्टींचे, गप्पांचे विषय बदलतील, ते जाणीवपूर्वक बदलावेत. अद्भुतरम्य गोष्टींकडून देशभक्तांच्या, वीरांच्या वैज्ञानिकांच्या कथांकडे मुलांना वळवावे. यानंतर हळूहळू बाहेरच्या जगातील घटनांबद्दल चर्चेला सुरुवात करावी. त्यांच्या आवाक्यात असतील त्या वृत्तपत्रीय बातम्यांबद्दल बोलावे. त्यांना बोलण्यास, मते मांडण्यास उद्युक्त करावे. अशा रीतीने सुरुवात केल्यावर मुले किशोर वयात, कुमार वयात आल्यावर किंवा अगदी तरुण झाल्यावर संवादाचे स्वरूप कसेकसे बदलते आणि ते रूळावर ठेवून संवाद हा सुसंवाद राहील,  रीतीने कसा असावा, ते पालकांच्या अशा मुलांच्याही आपोेआप लक्षात येईल. मूल जसेजसे वाढत जाते, तसतशी पालक म्हणून आपलीही वाढ होत असते. मूल जन्माला आल्या दिवशीच पुढल्या वाटचालीच्या ब्ल्यू प्रिंट काढायची गरज नसते.”

“खरंच तुमच्याकडून फार महत्त्वाची गोष्ट मला समजली, काका. आपण असं भरपूर बोललो की, मुलंही आपोआपच वेगवेगळ्या विषयांवर बोलू लागतील.”

“हो, तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सुसंवाद हा एकतर्फी कधीच नसतो. मुलांचे बोलणे शांतपणे; ते जे काही बोलत आहेत, त्या विषयात रस घेऊन ऐकणे ही कलाही पालकांना विकसित करावी लागते. मुलांना शाळेत काय झाले ते घरी सांगायची ओढ असते. पालक ते ऐकून घेतातही; पण बरेचदा त्यांना मूल जे काय बोलेल, ते ऐकल्यावर त्याला उपदेशाचा डोस निष्कारण पाजून त्या रंगात आलेल्या मुलाच्या उत्साहाचा विरस केला जातो.

या सर्व संवादातून साधावयाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाचे सामाजिकीकरण(सोशलायझेशन) करणे. सोप्या भाषेत मुलांना समाजात मिसळायला शिकवणे. आजच्या त्रिकोणी कुटुंबांच्या काळात ही गोष्ट अत्यावश्यक होऊन बसली आहे. एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालल्यामुळे तडजोडीची मुलांना सवयच राहिलेली नाही. यासाठी पालकांनी मुलांना लहानपणापासूनच रा.स्व.संघ, राष्ट्र सेवा दल अशासारख्या संस्थांच्या शाखांमध्ये पाठवले पाहिजे. ज्या मुलांवर देशसेवेचे संस्कार होतात, ती आपोआपच कुटुंबीयांशी, शेजार्‍यांशी, मित्रांशी प्रेमाने, सौजन्याने वागण्यास शिकवतातच.

“काका, ही तशी मोठीच जबाबदारी आहे आमच्यावर.”

“आहे ना! म्हणूनच पालक होण्याची पूर्वतयारी म्हणून स्वत:चे व्यक्तित्त्व तसे घडवले पाहिजे. या दिशेने पालकांनी वाटचाल सुरू केली की, त्यांच्याही लक्षात येईल, मुलांबरोबर पालक म्हणून घडत जाणे, हा प्रवास आपलेही व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारा आहे. मग त्यांनाही तो प्रवास यातायात न वाटता सहल वाटेल.”

“काका तुम्हाला गुरुदक्षिणाच द्यायला पाहिजे आता. काय करू?”, शीतल म्हणाली.

“एक कप चहा फक्त.” काका हसत म्हणाले. आणि शीतलही चहा करायला उठली.

- मकरंद कुलकर्णी