शिक्षणविवेक आयोजित आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा,२०१९

वृत्तांत

दि.१९ ऑगस्ट,२०१९ रोजी सकाळी दहा वाजता डेक्कन कॉर्नरच्या स्वा. सावरकर अध्यासन केंद्राच्या प्रशस्त सभागृहात प्रसिद्ध बाल साहित्यिक व शिक्षणविवेकचे संपादकीय सल्लागार राजीव तांबे यांच्या हस्ते आंतरशालेय पपेट सादरीकरण २०१९ स्पर्धेचे उद्घाटन झाले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर यांनी प्रास्ताविक केले. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून आर्या जोशी व आरती देवगावकर यांनी काम पाहिले.

उद्घाटक व परीक्षकांचा परिचय रुपाली निरगुडे यांनी करून दिला. स्पर्धेच्या प्रायोजक व माय पपेट स्टोरीच्या प्रोप्रायटर योगजा कुलकर्णी आवर्जून उपस्थित होत्या.

मी आणि माझे इतकाच भावनांचा मर्यादित परीघ आजूबाजूला दिसत असण्याच्या या काळात मुद्दामच "कुटुंब" हा विषय स्पर्धेसाठी दिला होता. कुटुंब या  संकल्पनेचे विविध आयाम या चारही दिवसात पाहायला मिळाले. वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना विविध गटांनी मांडली. आजीआजोबांच्याअभावी एकाकी पडलेल्या छोट्यांची भावनिक गरज त्यांची प्रेमाची, माणसांच्या सहवासाची भूक स्पष्टपणे सर्वच सादरीकरणात दिसली. मोबाईल, लॅपटॅाप इंटरनेटच्या आजच्या युगात माणसामाणसांतील नाते हरवत चालल्याची खंत प्रत्येकानेच व्यक्त केली.

या चार दिवसांमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या एकूण ६६ गटांनी सादरीकरणे केली.  

या सर्व स्पर्धांचा निकाल www.shikshanvivek.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

शिक्षक पालकांच्या गटांच्या सादरीकरणानंतर पारितोषिक वितरण सोहळा लगेचच सुरू झाला. यात प्रथम न्या. रानडे बालक मंदिराच्या शिक्षिकांनी सर्व उपस्थितांसमोर त्यांचे सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्यास सुरुवात झाली.

या सोहळयासाठी अध्यक्ष म्हणून बालसाहित्यिक राजीव तांबे उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक भालचंद्र पुरंदरे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संचालक डॉ.सविता केळकर, शिशुविहार कर्वेनगरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य, शि.प्र .मंडळी मुलींची शिशुशालेच्या मुख्याध्यापिका जयश्री एडगावकर, माय पपेट स्टोरीच्या योगजा कुलकर्णी व परीक्षक आरती देवगावकर उपस्थित होत्या. मुलींच्या  ईशस्तवनाने  कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. परकायाच नव्हे तर परवस्तूही  प्रवेश करू शकणाऱ्या पपेटस्  मुलांना आवडण्याचे सखोल विश्लेषण राजीव तांबेंनी केले. हसतखेळत मनोरंजक पद्धतीने पालकत्वाचे धडेच त्यांनी उपस्थित पालकांना दिले.

डॉ सविता केळकर यांनी माउथ ऑर्गनवर एक सुंदर गीत वाजवून मुलांना खूश केले. प्राजक्ता वैद्य यांनी मुलांना एक अभिनय गीत म्हणून दाखवले. मुलांना तसेच त्यांच्या पालक व शिक्षकांना सादरीकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने एक सकारात्मक बदल मुलांमध्ये दिसल्याचे जयश्री एडगावकर यांनी सांगितले. स्पर्धेच्या एकही दिवशी पुरुष पालक उपस्थित नसल्याचे तसेच स्पर्धक म्हणूनही सहभाग नसल्याचे निरीक्षण आरती देवगावकर यांनी नोंदवले. तसेच कुटुंबाला वेळ देणाऱ्या हसऱ्या, आनंदी कुटुंबाचे चित्रणही दिसावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या चारही स्पर्धांच्या सत्रांचे सूत्रसंचालन स्वाती यादव यांनी केले तर पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन आदिती दाते यांनी केले.

सायली शिगवण यांनी आभार मानले. नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थिनींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शिक्षक पालक विद्यार्थी या सर्वांनाच समृद्ध करणारा हा अनुभव होता.