‘द डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे जागतिक साहित्य विश्‍वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीय मुलीची ही अनुभव गाथा वाचताना डोळे पाणावणार नाही अशी व्यक्तीच नाही. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला, त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका.

अॅनाच्या मृत्यूनंतर तिची डायरी वडिलांच्या हाती आली आणि १९४७ साली ती जेव्हा प्रसिद्ध झाली; तेव्हा तिचे वाङ्मयीन आगळेपण वाचकांना समजले.

महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल झाले होते, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो, याचे प्रत्ययकारी चित्रण या डायरीत येते. अॅन म्हणते, “मला मृत्यूनंतरही जगायचे आहे आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे.”, असे तिने लिहिले आहे. ही देणगी म्हणजे, तिच्यात वसणार्‍या सर्व भावभावनांना शब्दांत पकडण्याचे सामर्थ्य.

गेल्या ७० वर्षांत या पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्या!!

अॅन १२ जून, १९४२ पासून १ ऑगस्ट १९४४ पर्यंत रोजनिशी लिहीत होती. सुरुवातीस ती फक्त स्वत:साठी लिहीत होती. पण एकदा लंडनच्या रेडिओवरून एक घोषणा झाली, ‘युद्ध समाप्तीनंतर’

उच्च लोकांना जर्मनांच्या आक्रमणानंतर जो छळ सोसावा लागला, त्याचा वृत्तांत जमवून तो डच जनतेला उपलब्ध करून दिला जाईल, वृत्तांत म्हणजे पत्रे, रोजनिश्या वगैरे.

त्यानंतर अॅनने त्याचे पुनर्लेखन केले. आणि तिच्या मृत्यूनंतर त्याला प्रसिद्धी मिळाली.

तिच्याशी मनातले हितगुज करायला कोणी मैत्रीण नव्हती म्हणून वडिलांनी भेट दिलेल्या डायरीत तिने तिच्या मनातल्या खळबळीला वाट करून दिली आणि तो आज एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरला.

तर, विद्यार्थ्यांनो जरूर वाचा हे पुस्तक आणि कसे वाटले ते शिक्षणविवेकला जरूर कळवा.

डायरी ऑफ अॅन फ्रँक

अनुवाद - मंगला निगुडकर

- स्वाती गराडे, सहशिक्षिका

कै.दा.शं. रेणावीकर विद्यामंदिर, नगर