माझ्या तीन वर्षांच्या नातवाला मी सांगत होते, ‘हे तांब्यातलं पाणी त्या झाडाला नेऊन घाल. ती बाटली दिसतेय ना, त्याच्या जवळच्या झाडाला. अरे, तुझ्या समोर आहे बघ!’ त्याने काहीच केलं नाही. हातात छोटा तांब्या होता. समोरचं झाड तुळशीचं होतं. समोर अनेक झाडं होती. तो ज्या दिशेला तोंड करून उभा होता, तिकडे मात्र झाड नव्हतंच. मला वेळ नव्हता. त्याच्या हातातला तांब्या घेऊन मी पाणी ओतून आले. ज्या झाडाला पाणी घालणं अपेक्षित होतं, ते हे झाड नव्हतंच. असं का झालं? असाही विचार करू लागले. आपल्या मुलांचं काय झालं असेल? असाही विचार मनात आला. नातवंडं आहे म्हणजे आपण पन्नाशी ओलांडलेली. जरा निवांतपणा आलाय म्हणून विचार तरी करतेय. तेव्हा मात्र आपल्या घाई-गडबडीत मुलांना समजलं नाही; म्हणून आपण धपाटा तरी घातला होता किंवा काम आपण करून टाकलं होतं. तेच सोपं. म्हणून हळूहळू सूचना देण्याचं कमी होऊ लागलं. मुलं बहुधा आपल्या मनाला सूचना देऊन कामं (त्यांची त्यांची) करत होती.

मी किती गोंधळात टाकणार्‍या सूचना मुलांना देतेय! त्या झाडाला म्हणजे कोणत्या? समोर म्हणजे काय? पाणी नक्की कुठे नेऊन घालायचं? का घालायचं? हे जर समजलंच नाही, तर तो कृती कशी करणार? ‘तू असा उभा राहा.’, ‘हे बघ तुझ्यासमोर हे झाड आहे.’, ‘इथे बाटली पडलीय की नाही, इथे पाणी ओत.’ प्रत्येक सूचना मी करून दाखवली. दोन दिवस करून दाखवली. तिसर्‍या दिवशी त्यानेच विचारलं, ‘पाणी घालून येऊ?’ त्याने बरोबर झाडाला पाणी घातलं. सूचना अमूर्त न राहता प्रत्यक्ष दाखवल्या गेल्याने मला वाटतं त्याला समजलं नि त्याने पटकन कृती केली.

सूचना समजत नाहीत, तेव्हा मुलं त्यांच्यात दंग होतात. त्यांचं त्यांचं काम सुरू होतं किंवा आपण काय सांगतोय याकडे त्यांचं लक्षच नसतं. अगदी दहावीच्या वर्गातही मुलांना आपण काय बोलतोय ते न समजल्याने हा अनुभव येतो. नंतर नंतर तर आपलं बोलणं म्हणजे सूचना नि सतत सूचना असं होतं. लहानपणीच जर सूचनांचा क्रम लावला, प्रत्येक सूचना प्रत्यक्षात करत गेलं, तर सूचनांवर मुलं कृतीसाठी विचार करतात, हे मूलभूत तत्त्व माँटेसोरी पद्धतीने शिकवलं. एक सूचना देणं, तसं करणं, पुन्हा दुसर्‍या सूचनेसाठी तयार करणं, ती करून घेणं, असा सूचनांचा प्रत्यक्ष अनुभव देऊन क्रम लावता येतो. ‘चल, रुमालाची घडी घालू या.’ आपण असं म्हणून सगळ्या कृती करतो. त्या कृती भराभर करतो. मग मुलांना घड्या घालता येत नाहीत. त्यातही छोटा रुमाल ते मोठा कपडा यात फरक असतो.

सूचना अमूर्त असतात. त्यातले संबोध समजतातच असं नाही. म्हणून त्या मूर्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यावर सूचना कृतीत आणणं, त्याचा अनुभव देणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. या सूचनांमुळे होणार्‍या गोंधळाबाबत अनुताई वाघ यांनी इतकं सुंदर लिहिलंय की, आपल्यात आपोआपच ती जबाबदारी निर्माण होते. सूचना नीटपणे न गेल्याने मुलांना समजून घेण्यात अनेक अडचणी येतात आणि न समजण्याकडे/आकलन न होण्याकडे प्रवास सुरू होतो. आपण मुलांबरोबर जे शेअर करतो, त्यांना सांगतो ते अशा सूचनांचं आकलन न झाल्याने गुणवत्तेवर परिणाम करतंच.

आपण सूचना समजून घेण्यावर मुलांच्या लहान वयापासून सुरुवात करू. याबाबत माँटेसोरीबाईंनी खूपच काम केलंय. त्यांच्या तत्त्वांवर चालणार्‍या अंगणवाड्यांत मूलभूत पद्धती घालून सूचनांवर काम केलं जातं. प्रत्येक सूचना प्रत्यक्षात आणली जाते. तशी कृती झाल्यावर मध्ये क्षणभर विश्रांती घेऊन, दुसरी सूचना आणि त्याची कृती. या टप्प्यावर असं घडल्यानंतर खरं तर पुढेही काही प्रमाणात तसं घडायला हवं. सूचनांचे गट पाडणं, प्रत्येक सूचना वेगळी करून, सुटी करून समजून घेणं ही प्रक्रिया घडण्यास वेळ द्यावा लागेल. वेळ न देताच एकदम सूचनांचा गठ्ठा टाकला, तर आकलनात अडचणी येतात. आकलन ही मेंदूतली महत्त्वाची क्रिया आहे. याच टप्प्यावर वेगवेगळ्या वयात आपण अडखळतो.

शालेय वयातल्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा महत्त्वाच्या संबोधावर काम व्हायला हवं. वर्ग पहिलीचा असतो. व्यवहारात प्रत्यक्षात दिसणारे अंक शाळेत अमूर्त होऊ लागतात. एक पोळी, चार ताटं, दोन तांबे असे अनेक अंक मुलांना आपोआप आकलन होतात. वस्तुरूपात अंक दिसतात. शाळेत मात्र अमूर्तपणे अंक दिसतात. खरंच ते दिसतात का? काही ठिकाणी मुलं पाढे म्हणतात. म्हणून म्हणून/वारंवार सराव केल्याने ते पाठ होतात. याबद्दलही मतभेद आहेत. 99 म्हटल्यावर ९८ नंतर आणि १००च्या आधी एवढं तरी घडत असावं. नंतर नंतर तर याबद्दल ‘क्ष’ माना, याबद्दल ‘य’ माना. सुरुवातीपासूनची अमूर्तता अधिकच घट्ट होऊ लागते. शब्द दिसणं आणि शब्द जाणवणं याला खूप वेगळं महत्त्व आहे.

जे मूल पुढे गेलंय, त्याच्याबाबत फार विचार करायचं कारण नाही, कारण पुढे कसं जायचं हे त्याला समजलंय. पुढे कसं जायचं याची वाट ज्याला सापडत नाही, त्याचं अडलंय कुठे, हे मात्र समजून घ्यायला हवं. त्याला समजतील अशा सूचनांतून त्याची पुढे जायची वाट आपल्याला शोधायला हवी. ही वाट कुणी सांगितलेली असण्यापेक्षा आपण आपल्यापुरती शोधायला हवी. भले ती कुणी म्हणेल नवी, कुणी म्हणेल जुन्याच पद्धतीने तुम्ही पुढे जाताय. कुणी काही म्हटलं नि वाट कोणतीही असली, तरी शेवटी मूल पुढे जाणं हे महत्त्वाचं.

- रेणू दांडेकर