कलाशिक्षकाचे कार्य काय असावे? साधे आणि सरळ उत्तर आहे- चित्र काढायला शिकवणे व त्यात रंग भरायला शिकवणे. पण, त्याशिवाय कळत नकळत कलाशिक्षक एक कार्य सातत्याने करत असतो, ते म्हणजे मुलांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कलात्मक करणे, त्यांची सौंदर्यदृष्टी वाढवणे. प्रत्येक विद्यार्थी कलाकार बनेल किंवा नाही हा वेगळा विषय आहे, पण त्याला एक कलाप्रेमी तर नक्कीच बनवता येऊ शकते आणि हेच कलाशिक्षकाचे अथक कार्य आहे.

मुलांमधील सुप्त कलागुण शोधण्याचे माझे काम माझ्या शाळेतील पहिल्या दिवसापासूनच सुरू झाले. पहिले काही दिवस माझ्या पदरी थोडी निराशा आली. मुलांच्या कल्पना तर चांगल्या होत्या; पण त्या सर्वांपर्यंत पोहचणे गरजेचे होते, मग मी त्यांच्या सादरीकरणावर काम करणे सुरू केले. रंग भरण्याची काही तंत्रे मी त्यांच्याकडून सरावाने करून घेतली. सोप्या पद्धतीने रंगांची निवड कशी करावी, हे मी त्यांना समजावून सांगितले.

प्रथम मी मुलांशी गोष्टीरूपाने किंवा गप्पांच्या स्वरूपात संवाद साधण्यास सुरुवात केली. मुलांचे आकर्षण चित्रे काढण्यापेक्षा रंग भरण्याकडे जास्त होते. शाळेतील माझ्या पहिल्या तासालाच चित्र काढण्याअगोदर त्यांच्या नवीन पेस्टल कलर्सच्या पेट्यावरील आवरण काढण्यासाठी ते नुसते आतूर झाले होते. त्यासाठीच मी प्रथम रंगाला महत्त्व असणारे विषय शिकवण्याचे ठरवले.

इयत्ता १ लीच्या मुलांचे आवडते विषय म्हणजे फुलपाखरे, फुले, आईसक्रीम, केक, जोकर, फळांची टोपली इ. यात सरळ सरळ मुलांचे रंगांबद्दलचे आकर्षण दिसून येते. उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली मजा त्यांच्या कागदावर उतरत होती. त्यांच्यासाठी मोठ्या आकाराच्या वहीची निवड योग्य ठरली होती.

हळूहळू त्यांच्याशी बोलून प्रश्‍न-उत्तरांमधून चित्रातील बारकावे वाढत गेले; पण अजूनही चित्रे उठून दिसत नव्हती. रंग दिल्यावर पेन्सिलने काढलेेले बारकावे विरून जात होते. मग काळ्या रंगाच्या स्केचपेनने आऊटलाईन करण्याची युक्ती कामी आली. त्यामुळेच चित्रातील रेषा जास्त प्रभावीपणे दिसून येऊ लागल्या. रंगांना जास्त उठाव आला व बारकांव्यामध्ये व्यवस्थितपणा आला. सादरीकरणाच्या माझ्या अपेक्षेप्रमाणे मुले व्यवस्थित काम करू लागली होती.

चित्रांमध्ये वेगळेपणा आणण्यासाठी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मी फक्त पट्टयांमध्ये शेडींग करण्यास शिकवले. तर इयत्ता तिसरी व चौथीसाठी फेदरींग, सॉफ्टशेडींग व ग्लोईफेक्ट सारखे वेगळेवेगळे प्रकार शिकवले, त्याचा योग्य वापर ते त्यांच्या चित्रात करू लागल्यानंतर चित्रामध्ये ‘दृकपोत’ (optical texture) चा आभास निर्माण होऊ लागला, वस्तूंमध्ये त्रिमतीचा अभास ते निर्माण करू लागले.    तिसरी-चौथीच्या वर्गात ‘मेमरी ड्रॉईंग’ विषयासाठी निरीक्षण वाढवणे गरजेचे होते. आदल्या दिवशी मी मुलांना सांगितले. घरी जाताना फुलांच्या दुकानामधील फुले नीट पाहायची, त्यांचा आकार, पाकळ्या, रंग सगळे नीट लक्षात ठेवायचे. उद्या आपल्याला फ्लॉवरपॉट काढायचा आहे. दुसर्‍या दिवशी त्यांच्या पेपरवर मला नानाविध रंगातील फुले पाहायला मिळाली. आकार, रंगकाम यात जास्त वास्तवता आली होती आणि दिसत होता तो आत्मविश्‍वास, जो चित्राला वेगळच आकर्षण झळाळी देत होता.

लहान मुले चित्र सुरू करतात ते सूर्य, डोंगर, झाडे, घर असे ठरलेले चित्र असते. मला त्याला फक्त आकर्षक बनवायचे होते. डोंगरांना तपकिरी मातकट रंग देण्याऐवजी हिरव्या रंगांच्या छटा देण्यास सांगितले व त्यावर त्यांना खुलासाही केला की, पाऊस पडून गेल्यावर ते असेच हिरवळीने भरलेले हिरवेगारच दिसतात व आपल्या सर्वांना बघायला ते जास्त आवडतात. कारण ते जास्त सुंदर व ताजेतवाने दिसतात. डोंगराच्या मध्ये असलेला अर्धा सूर्य मी त्यांना पूर्ण काढायला सांगितला. तर घराला थोडे नवीन पद्धतीने काढण्यास शिकवले. या सगळ्या बदलांमुळे चित्र जास्त सुंदर व आकर्षण दिसू लागले आणि सर्वांना ते जास्त आवडले.

वयानुसार त्यांची कल्पकतेची झेप वाढवणेही गरजेचे होते. त्यासाठी इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमात मी ‘भविष्य काळातील तांत्रिक जग’ किंवा ‘माझ्या स्वप्नातील शाळा’, ‘तरंगते शहर’, ‘मी आणि माझा आवडता सुपरहिरो’ विषयांचा समावेश केला. त्यामुळे मुलांच्या कल्पकतेला वेगळीच दिशा मिळाली नव्या जगाबरोबरच भविष्यातील जगाचा ते विचार करू लागले.

मला त्यांना माझ्या लहानपणी मी काढलेल्या चित्रांच्या विषयात बांधायचे नव्हते. मी त्यांना नवीन आव्हाने देत होते आणि ते त्याच्यावर माहिती गोळा करत होते. इंटरनेटवर शोधत होते. माझ्या कल्पनेपेक्षा ते थोडे जास्तच मला कागदावर दाखवत होते.

वेगवेगळी उदाहरणे मोठमोठ्या प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे व त्याबरोबर जोडलेल्या गोष्टी त्यांना सांगताना त्यांच्याबरोबर माझाही कलाक्षेत्रामधील प्रवास चालू आहे.

 मुलांची कल्पनाशक्तीही त्यांच्या पेन्सिल आणि रंगांपेक्षा जास्त वेगाने धावत असते. त्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य दिशा देऊन त्याला रचनात्मक ज्ञान देणे आवश्यक आहे.

कलाक्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल मी त्यांच्याशी कायमच बोलत आहे. अभ्यासक्रमामध्ये ‘ज्वेलरी डिझाईन’ किंवा ‘डिझाईन अ ड्रेस फॉर द पार्टी’ अशा विषयातून मी त्यांना चित्रकलेचा उपयोग कशाकशासाठी करता येतो, हे सांगत असते. त्यामुळेच उत्सुकतेने सध्या ते इंटरनेटवर फोन्ट बोल्ट व ईलेस्ट्रेशनससारख्या डिझाईनच्या साईट्स पाहत असतात.

वीस वर्षे सातत्याने केलेले हे प्रयोग मला आणि माझ्या विद्यार्थ्यांना नवीन जगातील आधुनिक, तसेच वास्तववादी कलेशी निगडित ठेवतात. परवाच माझ्या एका विद्यार्थिनीचा ‘लंडन फॅशन वीक’मध्ये शो झाला. तिने मला त्याचे फोटो पाठवले व त्यावर लिहिले होते; “ Thank you teacher आम्हाला कलेतील नवीन दिशा नेहमीच दाखवल्या बद्दल...” त्या दिवशी खूपच अभिमान वाटला. मी कोणत्याही पारंपरिक पद्धती न वापरता माझ्या विद्यार्थ्यांना नवीन युगामध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी तयार केले आहे. यासाठी नवीन बदलांसाठी सतत जागरूक व तयार राहणे आवश्यक आहे. नवीन माध्यमे, नवीन शैली व कलाजगतातील नवीन शिक्षणक्रम यांची सतत नोंद ठेवणे आवश्यक आहे.

मी स्वत: जर नवीन कलेशी निगडित असेन तर मी माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेन! हा माझा कलेतील शोधांचा, प्रयोगांचा प्रवास असाच चालू आहे व न थांबता सतत चालू ठेवणार आहे.

- कल्पना भोसले (कलाशिक्षिका) एस.पी.एम. प्रायमरी, पुणे