रोजच्याप्रमाणे साक्षीची स्कूल बस सावली सोसायटीच्या गेटसमोर थांबली. साक्षी बसमधून उतरली आणि सगळ्या दोस्त कंपनीला बाय करून तिने त्यांचा निरोप घेतला. बस गेल्याबरोबर तिने सोसायटीच्या दिशेने धूम ठोकली. लिफ्टची वाट न बघता धडाधड जिने चढायला तिने सुरुवात केली. तिच्याजवळ अर्धाच तास होता. अर्ध्या तासात तिला कपडे बदलून, आईच्या आणि आजी-आजोबांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन, नाश्ता करून पुन्हा खाली उतरायचे होते. बाप रे! खूपच कमी वेळ होता! साक्षीने जोरजोरात दरवाजाची बेल वाजवायला सुरुवात केली. आईने लगेचच दरवाजा उघडला, तरीही तोपर्यंत साक्षीने पाच-सहा वेळा बेल वाजवलीच.

‘आलीस? पेपर.....’

‘खूप सोपा होता, असं मी म्हणणार नाही; पण चांगले मार्कस् मिळतील.’ आईला वाक्य पूर्ण करू न देता साक्षीने उत्तर दिलं आणि ती कपडे बदलायला पळाली.

‘आता हिच्या पायाला भिंगरी लागेल.’, इति आजी.

‘हे बघ सशा, आता घरात अजिबात दंगा चालणार नाही. माझा अभ्यास जास्त...’

‘महत्त्वाचा आहे मला माहितेय दादड्या. तुझं दहावी पुराण मला एव्हाना पाठ झालंय.’

यावर दादाने डोक्यात मारलेल्या टपलीला उत्तर द्यायचं तिच्या मनात होतं, पण तेवढा वेळ नव्हता म्हणून दादाची टपली उधार ठेवून तिने भराभर नाश्ता संपवला. एका घोटात पाण्याचा अर्धा ग्लास रिकामा केला आणि टेबलवर ठेवला. ही तिची नेहमीची सवय होती आणि यानंतर आजोबा काय म्हणणार हेही तिला पाठ होतं. ते म्हणालेच, ‘साक्षी थेंबाथेंबाने तळे साचे बरे का! जेवढी तहान आहे, तेवढंच पाणी घ्यावं ग्लासात. पुन्हा पुन्हा घ्यावं लागलं तरी चालेल, पण असं फुकट घालवू नये बाळा.’

त्यावर तिने, ‘मी आल्यावर संपवेन’, असं नेहमीचंच उत्तर दिलं आणि दरवाजा उघडून ती पळालीसुद्धा. तिच्या या घाईगडबडीला कारणही तसंच होतं. तिचा दादा सुलय यंदा दहावीला होता. त्याची नववीची परीक्षा संपल्यावर तीनच दिवसांत दहावीची शाळासुद्धा सुरू झाली होती. शिवाय क्लासेस होतेच, त्यामुळे यंदाची उन्हाळी सुट्टी घरातच जाणार होती. आई आणि आजी तर घरातून हलणारही नव्हत्या. आईने तर त्याच्या परीक्षेसाठीच या वर्षीच्या तिच्या ऑफिसच्या सगळ्या रजा वापरायचं घोषित केलं होतं, त्यामुळे यंदाचा उन्हाळी सुट्टीचा दीड महिना घालवायचा कसा? या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर तिला आपल्या कंपूबरोबर चर्चा करायची होती.

खाली मैदानात झालेल्या चर्चेतून असं लक्षात आलं की, कैरवच्या बाबांचं महिनाभर ट्रेनिंग असल्याने त्यांना कुठेही जाता येणार नाहीये. साकेतची आजी आत्ताच हॉस्पिटलमधून बरी होऊन आलीय, त्यामुळे त्यांचंही जाणं रद्द झालंय. शची आणि तिची आई दर वर्षी गावाला मुक्काम करायच्या, पण ‘यंदा तिथल्या स्थानिक राहणार्‍यांना प्यायलाही पाणी नाहीये आणि आपण पाहुणे म्हणून जाऊन त्यांच्या अडचणीत भर घालायची नाही, असं बाबांचं म्हणणं आहे,’  इति शची.

‘मग तुम्ही इथून का नाही पाणी घेऊन जात?’, साकेतने असं विचारल्यावर उरलेल्या तिघांनी कपाळावर हात मारला. शाळेची सुट्टी, दादाची दहावी, आजीचा आजार, बाबांचं ट्रेनिंग, साकेतचा मूर्खपणा, पाणी कपात, ग्लोबल वॉर्मिंग असं काहीबाही मुलं बोलत राहिली, अगदी अंधार पडेपर्यंत. खरं तर जास्त साक्षीच बोलत होती; बाकीचे फक्त माना हलवत होते. पाचवीला असणार्‍या या बालचमूची ती कप्तानच होती जणू.

दुसर्‍या दिवसापासून सावलीच्या अंगणात सुट्टीचं तुफान हैदोस घालू लागलं. जलदगतीने धावणार्‍या गाडीसारखी मुलं नुसती हुंदडत होती. या गाडीला ना सिग्नल होता, ना ब्रेक. दिवसभर मुलांचा धिंगाणा चालूच असायचा. कधी मैदानावर, कधी पार्किंग स्पेसमध्ये, कधी गच्चीवर; तर कधी गार्डनमध्ये. सुट्टीच्या या गाडीला ना थकवा होता, ना विश्रांती. मात्र या सगळ्या गदारोळात सुलयला साक्षीवर ओरडायची संधी एकदाही मिळाली नाही. अभ्यासात त्रास द्यायला साक्षी घरात तर असायला हवी ना. तिची या वेळची गडबड काहीतरी निराळी आहे, हे त्याला जाणवलं होतं. त्याने तिला छेडलं, पण ताकास तूर लागू देईल, तर ती साक्षी कसली? तिचा नक्की काय उद्योग चालू आहे, हे शोधून काढायला इच्छा असूनही सुलयला वेळ मिळत नव्हता. एक दिवस आपोआपच त्याला याचं उत्तर मिळालं.

शनिवारच्या संध्याकाळी सावली सोसायटीच्या 52 घरांमध्ये हाताने लिहिलेलं एक पत्रक वाटण्यात आलं. त्यावर लिहिलेलं होतं,

‘आम्ही घेतलाय निर्णय आमचा.

त्यात सहभाग हवाय तुमचा.

तुमचं येणं होईल सत्कारण.

स्वीकारा हे आग्रहाचं निमंत्रण.’

स्थान : आपल्याच सोसायटीचे सभागृह

वेळ : रात्री 8 वाजता

या सगळ्यामागे साक्षीचा हात असलाच पाहिजे, असा सुलयला दाट संशय होता, त्यामुळे हातातला अभ्यास टाकून तो खाली उतरला. सोसायटीमधले 60% तरी लोक सभागृहात आले होते. याला दोन कारणं होती. एक तर शनिवारची संध्याकाळ होती. त्यामुळे पुरेसा वेळ होता आणि दुसरं म्हणजे प्रत्येक घरात जाऊन मुलांनी आमंत्रण दिलं होतं; पण कार्यक्रमाचं स्वरूप कळू दिलं नव्हतं. थोड्या वेळाने सगळे छोटे शिपाई समोर उभे राहिले. कैरवने बोलायला सुरुवात केली. त्याने सगळ्यांचं लक्ष सभागृहाच्या दरवाजाकडे वेधलं आणि म्हणाला, ‘आपल्या सोसायटीच्या गोडाऊनमध्ये पडलेली फुटकी टाकी आम्ही वॉचमन काकांच्या मदतीने दुरुस्त केली, स्वच्छ केली आणि भरून ठेवली. आता ही टाकी पिण्यायोग्य पाण्याने भरलेली आहे.’

‘वा! फारच छान! सगळंच तुम्ही केलं, मग आमची काय मदत पाहिजे?’, कैरवच्या बाबांनी विचारलं.

‘आम्ही तुम्हाला एक कोडं घालणार आहोत. त्याचं उत्तर द्या.’, इति साक्षी.

साक्षीचं कोडं म्हटल्यावर सुलयच्या पोटात गोळा उठला.

तो स्वतःही तिथून उठणारच होता, इतक्यात शचीने कोडं घातलंच. ‘ही संपूर्ण टाकी आम्ही नळ न उघडता किंवा त्याला हातही न लावता भरली आहे, कशी काय?’

हा प्रश्न ऐकल्यावर मात्र हळूहळू सभागृहात शांतता पसरली. मुलांचं हे प्रकरण वाटतं तितकं बालिश नाही, हे एव्हाना सार्‍यांच्या लक्षात आलं होतं. आता सभागृहाचा संपूर्ण ताबा साक्षीकडे होता. अतिशय खणखणीत आणि स्पष्ट आवाजात ती बोलत होती, ‘आपल्या सोसायटीच्या गेटवर वॉचमन काकांच्या केबिनच्या बाजूला असलेला नळ गळतो आहे. आपल्यापैकी कित्येक जण त्या नळाच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी करतात. मात्र त्यातून पाणी गळत आहे, याकडे कोणाचंही लक्ष नाही. ते गळणारं पाणी आठवडाभर साठवून आम्ही ही 300 लीटरची टाकी भरली. या हिशोबाने संपूर्ण वर्षभरात एकट्या आमच्या सोसायटीत आम्ही एका नळामागे 15 ते 20 हजार लीटर पाणी वाया घालवतो. याखेरीज मुंबई महानगरीत असणारी घरं गुणिले घराघरांत असणारे गळके नळ. करा हिशोब. लक्षात ठेवा, ‘जल है तो कल है।’ तावातावाने बोलून साक्षी थांबली आणि सभागृहात शांतता पसरली. शांततेचा भंग साक्षीच्या बाबांनीच केला. ते म्हणाले, ‘आपल्या मुलांनी आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातलं आहे. मला वाटतं सावलीच्या या परिवाराने मुलांची ही कल्पना उचलून धरायला हवी. प्रत्येकाने स्वतःपासून याची सुरुवात करायला हवी.’ बाबांच्या शब्दांतून आणि सुलयच्या चेहर्‍यावरून साक्षीबद्दलचा अभिमान जाणवत होता.

पुढचा संपूर्ण महिना सावलीने एकच ध्यास घेतला. सगळे गळके नळ दुरुस्त झाले. गाडी धुतलेलं पाणी सोसायटीच्या गार्डनमध्ये सोडायची व्यवस्था झाली. घराघरांत आया वॉशिंग मशीनमधलं कपडे धुतलेलं पाणी स्वच्छतेच्या कामाला वापरू लागल्या.

जेव्हा सोसायटीचे कमिटी मेंबर या मुलांच्या अभिनव कल्पनेचं कौतुक म्हणून त्यांना काय बक्षीस द्यावं, हा विचार करत होते...,

जेव्हा साक्षी, शची, साकेत आणि कैरव; सुलयदादाने त्याच्या पॉकेटमनीमधून घेऊन दिलेल्या सायकलवरून हुंदडत होते...,

जेव्हा साक्षी ग्लासात आवश्यक तेवढंच पाणी घ्यायची सवय लावून  घेत होती...,

जेव्हा आई आणि आजी साक्षीचं नाव बदलून ‘सुजला’ करावं का? याची चर्चा करत होत्या...,

तेव्हा एक संपूर्ण गाव पोटभर पाणी मिळाल्याने तृप्त झालं होतं... सुजलाम् सुफलाम् झालं होतं!

- निवेदिता मोहिते