मी ऑगस्ट बोलतोय...

दिंनाक: 02 Aug 2019 15:02:43


 

मित्रमैत्रिणींनो, गेले दोन महिने, सुरुवातीला दुष्काळ आणि नंतर पावसाचं दमदार आगमन या दोन्हींचा अनुभव तुम्ही घेतलात. आता मी आलोय ऑगस्ट!

मी खूप सुट्ट्यांचा, सणांचा महिना. कारण माझ्याबरोबर असतो मराठी महिना श्रावण. हा श्रावण सणांचा राजा असतो.

सगळ्यात आधी १ तारखेला लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करता तुम्ही. हे दोन्ही समाजसेवक नेते. यांचं पुण्यस्मरण आपण या दिवशी करतो. त्यांचे पोवाडे गातो, वक्तृत्व स्पर्धा घेतो. या दोन्ही राष्ट्रपुरुषांचे गुण तुम्ही जरूर अंगिकारा बरं का!

त्यानंतर नागपंचमी. आपल्या संस्कृतीतील प्राणी आणि पर्यावरण प्रेमाचे जे सण आहेत ना, त्यातला हा नागपंचमी. कृषिप्रधान अशा आपल्या देशात साप हा शेतकर्‍याचा मित्र आहे. त्याचे पूजन, रक्षण करणे हा पर्यावरणाचा मंत्र आहे. यादिवशी स्त्रिया मेंदी लावतात, सूर-पारंब्या खेळतात, गोड पक्वान्नं करतात आणि सापाच्या प्रतिमेचे पूजन करतात.

या महिन्यात स्त्रियांचे सण जास्त प्रमाणात असतात. शंकरासाठी शिवामूठ, गौरीची मंगळागौर, आपल्या मुलांना आयुरारोग्य लाभण्यासाठी दर शुक्रवारी जिवंतिका पूजन, हळदीकुंकू, फुटाणे वाटणे, आदित्यपूजन म्हणजेच सूर्याची पूजा करणे (ही पूजा दर रविवारी केली जाते.) इत्यादी.

हे सण होता होता येऊन ठेपतो तमाम भारतीयांचा अभिमान बिंदू असलेला राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन! अनेक क्रांतिकारकांनी जिवाची बाजी लावून केलेल्या क्रांतीचे स्मरण आपण ९ ऑगस्टला करतो आणि नंतर भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी १५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी झेंडावंदन, देशभक्तीपर गीतगायन यांनी संपूर्ण भारत भारून जातो. धन्य ते स्वातंत्र्यसैनिक!

या महिन्याच्या पौर्णिमेला नारळीपौर्णिमा म्हणतात. समुद्राला शांत होण्यासाठी नारळ अर्पण करून, मासे पकडण्यासाठी कोळी लोक समुद्राकडे प्रस्थान करतात. या पौर्णिमेलाच भाऊ-बहिणीच्या नात्याचे बंधन दृढ करणारा रक्षाबंधन हा सण येतो. रेशमी राख्या आणि भेटवस्तूंचा सोहळाच तो!

यानंतर कृष्णाष्टमी, गोपाळकाला असतो. ‘कृष्णं वंदे जगत्गुरू’ अशा कृष्णाचा जन्म या अष्टमीचा! दहिहंड्या उभारून, कृष्णजन्म सोहळा करून हे सण साजरे होतात. तुम्हा मुलांना सुट्टी असते आणि काही शाळांमध्ये दहिहंड्या साजर्‍या केल्या जातात. काला खायची मजा औरच नाही का!

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी या वर्षी २९ ऑगस्ट रोजी आहे. समाजासाठी भरीव कार्य करणार्‍या या असामान्य स्त्रीने त्या काळात केवढे प्रयत्न केले!

बघा, माझ्या साक्षीने तुमची घटक चाचणीही येते. अभ्यास झाला का? सर्व शिकून झाले का परीक्षेसाठीचे?

तुम्हाला घरी, शाळेत खूप खूप मौजमज्जा करायला देणारा मी ३१ तारखेला रजा घेतो आणि पुढच्या माझ्या भावाला आमंत्रण देतो. बाप्पा येतोय, तयार राहा स्वागताला!

- चारुता शरद प्रभुदेसाई