सुर्यफुल

दिंनाक: 19 Aug 2019 17:37:52


 

सुर्यफुल याचे शास्त्रीय नाव – हेलिअथस अन्युस असे आहे. याचे मूळ स्थान अमेरिका. ही बारमाही वनस्पती आहे. सूर्यासारखा गडद केशरी रंग असून गोलाकार ते आहे. त्यामुळेच त्याला सुर्यफुल हे नाव मिळाले आहे आणि सूर्य जसाजसा जातो त्यानुसार झाडावरचे फूल त्या दिशेने वळते. या फुलाचा वापर तेल काढण्यासाठीच केला जातो. हे तेल गोडं तेलाप्रमाणे अनेक घरगुती पदार्थांसाठी वापरले जाते. हे इतर तेलांपेक्षा किमतीने स्वस्त असते. हे तेल आहाराच्या दृष्टीने फारच चांगले आहे.

सुर्याफुलाला हिंदी, गुजरातीत सुरजमुखी, तर इंग्रजीत सनफ्लॉवर म्हटले जाते. याचे कुल कंपॉझिटी असे असून आता सर्व जगात पसरली आहे. हे रानटी अवस्थेत आढळत नाही. ते मुळचे मेक्सिकोतील हेलिअॅथस लेंटीक्युलॅरीस या वन्य जातीपासून उत्पन्न झाले असावे, असे मानतात. हे पूर्वीपासून शोभेकरिता लावले जायचे आणि त्याचे वर्षायु व बहुवर्षायू अशा दोन प्रकारात बागेत आढळते. हे. अॅन्युस, हे. अर्गोफिलस व हे. डेबिलस या जाती पेरू, टेक्सास, उत्तर अमेरिका या ठिकाणी शोभेकरिता लावलेल्या आढळतात. तसेच संकरितचे याचे प्रकार अनेकच तयार करण्यात आले आहेत.

गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून याचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया, ईजिप्त येथे तेलबियांसाठी याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, चीन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया येथे याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. याच्यापासून ओला चारा तयार करतात.

सूर्यफुलाच्या रोपामध्ये ऑक्सिन्स हे हार्मोन्स असते. जे सूर्यप्रकाशाच्या बाबतीत संवेदनशील असते. त्याच्यापासून दूर सावलीत असलेल्या रोपांकडे ते जाते. त्यामुळे तेथील दूर सावलीत असलेल्या रोपांकडे ते जाते. त्यामुळे तेथील वाढीसाठी पाहिजे असलेल्या रोपांकडे ते जाते त्यामुळे त्या फुलांची दांडी वजनदार होऊन सूर्याच्या दिशेने झुकते. ही क्रिया नेहमीच चालते. म्हणून ह्या फुलांचे तोंड सूर्याच्या दिशेने दिसते. या फुलांवर खूप किडे, मधमाशा आकर्षित होतात. मग परांगण चांगले होते.

ह्या वनस्पतीची पेरणी पावसाळ्याच्या आरंभी करतात. मात्र फुलोरे पावसाळ्याच्या शेवटी व हिवाळ्यात येतात. याचे पीक खरीप व रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेता येते. कारण त्यावेळच्या तापमान, सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही. मात्र कमी पाणी ह्या झाडांना असेल तर झाडं मारतात.

ही १-३ मीटर उंच वाढते. खोड बळकट, जाड व खरबरीत असते. पाने खालीसमोरासमोर आणि वर एकाआड एक लांब देठाची, केसाळ, मोठी १०-१२ सें.मी. असतात. तसेच हृदयाकृती, करवती असतात. जुलै-सप्टेंबर शेंड्यांकडे पिवळे छान तबकासारखे फुलोरे येतात. त्यांचा व्यास १०-१५ सें.मी. तर कधी जास्तही असतो. फुले पिवळी जिव्हाकृती आणि बिंबपुष्पे गर्द पिवळी द्विलिंगी व नालिकाकृती असतात. छदे हिरवी व अनेक फळे व बीजे शंखाकृती बी चपटी व काळी. बिया लांबट. त्या भाजून खाल्ल्या जातात. बिया विकून खूप पैसा मिळतो. रिजिडस या लहान सूर्यफुलाचे फुलोरे गर्द सोनेरी रंगाचे व लहान असून बिंबाचा भाग पिंगट असतो.

सुर्यफुलात तेलाचे प्रमाण ४५-५० % असल्याने थोड्या क्षेत्रात व कमी वेळात या पिकापासून अधिक तेल मिळू शकते. हे पीक कमी मुदतीचे ७० ते ८० दिवसाचे आहे. या पिकाची लागवड सुधारित तंत्राने केल्यास खूप फायदा मिळेल. जिरायती पिकापासून हेक्टरी ८-१२ क्विंटल आणि बागायती पिकापासून हेक्टरी १५-२० क्विंटल उत्पादन मिळते. भारतातील सुर्यफुल लागवडीखालील क्षेत्रापैकी साधारण ७० % क्षेत्र महाराष्ट्रात आहे. मिश्र पीक म्हणून सुर्यफुल घेताना भुईमुगाच्या पिकाबरोबर ६:२ या प्रमाणात तसेच तूर व सुर्यफुल २:१ या प्रमाणात पेरतात. पेराण्यापुर्वी बियाणे १२ तास पाण्यात भिजवून सावलीत वाळवून पेरणी केली तर उगवण जोरदार व एकसारखी होते. सूर्यफुलाचे बी पक्व झाल्यावर ४०-५० दिवस सुप्तावस्थेत असते. म्हणून पेरणीसाठी शक्यतो मागील हंगामाचे बी वापरतात.

- मीनल पटवर्धन