यशाची जादू...

दिंनाक: 16 Aug 2019 17:49:33


इंदू एका छोट्याशा झोपडीत आई आणि छोटा भाऊ दिनू यांच्याबरोबर राहात होती. इंदूची आई हार व गजरे करून विकायची आणि घर चालवायची. इंदू शाळा शिकून तिला मदत करायची. काही दिवसांनी इंदूची आई आजारी पडली. इंदूने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी सांगितले, “यांना महिनाभर विश्रांती घ्यावी लागेल. हार, गजरे केले तर डोळ्यांवर ताण येईल. घराच्या बाहेरही पडू नका.” आणि भरपूर गोळ्या लिहून दिल्या. आईला आणि इंदूला प्रश्‍न पडला, आधीच गरिबी त्यात महिनाभर विश्रांती? इंदूला रडूच कोसळलं, पण आईसमोर रडायला नको; तिला आणखीनच काळजी वाटेल म्हणून इंदू अंगणात एका दगडावर रडत बसली. इतक्यात डोंगरावरच्या देवळातली घंटा तिच्या कानावर पडली. ती पटकन उठली आणि पळत देवळात गेली.

देवाला हात जोडून सर्व हकिकत सांगितली. “देवा तूच आता मला मदत करू शकतोस.” असे म्हणून रडू लागली. इतक्यात तिच्या पाठीवर एक प्रेमळ हात फिरला. तिने चमकून मागे पाहिले, तर एक आजीबाई दिसल्या. आजीबाई तिला म्हणाल्या, “रडू नकोस. तुझी हकिकत मी ऐकली आहे. तूच काम करून, कष्ट करून पैसे का नाही मिळवत?” त्यावर इंदू म्हणाली, “मी इतकी लहान आहे, त्यात मी शाळा शिकते. मला कसं जमणार हे सगळं?” आजीबाईंनी इंदूला देवाच्या जवळच फिरणार्‍या मुंग्या दाखवल्या. “या मुंग्या बघितल्यास किती छोट्या आहेत, पण एवढा मोठा साखरफुटाणा कसा ओढत नेत आहेत! कारण त्यांच्याकडे आत्मविश्‍वास, जिद्द आणि मेहनत या तीन गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना हे शक्य होतंय.” “पण आजीबाई, माझ्यात हे गुण नाहीत हो! मग मी कसे करणार?” आजीबाई हसल्या व इंदूला म्हणाल्या, “हे पाहा, माझ्याकडे जादूचे खडे आहेत.” असे म्हणत त्यांनी मडक्यातून तीन खडे काढले. “यातला एक खडा तुला आत्मविश्‍वास देईल, दुसरा जिद्द आणि तिसरा मेहनत करण्याची शक्ती देईल. हे नेहमी तुझ्या जवळ ठेव.” “पण कोणापुढे कधी हात पसरायचे नाहीत, असं आईनं मला शिकवलं आहे”, इंदू म्हणाली. त्यावर आजीबाई तिला म्हणाल्या, “खरं आहे; पण हे तर पैसे, हिरे, सोनं, चांदी नाहीत. नुसते दगड आहेत मग काय हरकत आहे? तुझं काम झालं, आई बरी झाली की मला परत दे म्हणजे झालं.”

इंदूला ते पटलं तिने खडे घेतले. आजीबाईंना नमस्कार केला आणि घरी आली. तिने आईला काही सांगितलं नाही. आई रागवेल अशी तिला भीती वाटली. इंदू आता ते खडे सतत आपल्या जवळ ठेवू लागली. हळूहळू इंदू हार, गजरे रात्री करून ठेवू लागली. सकाळी लवकर उठून बाजारात नेऊन विकायला तिने सुरुवात केली. शाळेतून येताना फुले आणायची; रात्री गजरे, हार करायचे आणि शाळेत जाण्यापूर्वी ते विकायचे. हे सारं तिला छान जमायला लागलं. इंदूला आता चांगले पैसे मिळू लागले. तिने थोडे पैसे बाजूला ठेवून बिया विकत घेतल्या आणि अंगणात त्या पेरल्या. थोड्या दिवसांनी त्यांची झाडं तयार झाली आणि त्यांना फुलं येऊ लागली. त्यामुळे इंदूला बाजारात जाऊन फुलं आणावी लागत नव्हती. त्याच झाडांना बिया आल्या. त्याही तिने बाजूच्या जमिनीवर पेरल्या. आता इंदूला खूप पैसे मिळायला लागलेे. तिने त्या पैशांतून आईची औषधं आणली. इंदूची आई हळूहळू बरी व्हायला लागली.

पण एक दिवस इंदू खूप अस्वस्थ होती. सारखं काहीतरी शोधत होती. तिचे जादूचे खडे सापडत नव्हते. तिने सगळीकडे बघितलं. पण ते सापडले नाहीत. आईलापण विचारता येईना. मग तिला रडू यायला लागले. ती पळत डोंगरावरच्या देवळात गेली. आजीबाई दिसताच त्यांना मिठी मारून रडायला लागली. तिने सगळा प्रकार त्यांना सांगितला. आजीबाई खूप हसायला लागल्या. इंदूला राग आला. ती म्हणाली, “माझं सारं उद्ध्वस्त झालं आहे आणि तुम्ही हसताय?” आजीबाईंनी मडक्यातून आणखी बरेच खडे तिच्यापुढे ओतले आणि म्हणाल्या, “अगं हे तर साधे खडे आहेत. जादूचे वगैरे नाहीत. तुझ्यात हे तीनही गुण होते, त्यांची जाणीव तुला नव्हती. ती मी तुला फक्त या खड्यांकडून करून दिली. त्याचा उपयोग तुला करून दिला.”

इंदूच्या चेहर्‍यावर एकदम हसू फुटलं. ती म्हणाली,“म्हणजे मी हे स्वत:च्या हिमतीवर केलं आहे? मला जादूच्या खड्यांची काही गरज नाही?” आजीबाई म्हणाल्या,“अगं हे गुण तुझ्यात अजूनही आहेत, ते हरवले नाहीत.”

इंदूने आजीबाईंना परत घट्ट मिठी मारली आणि गोल गोल फिरायला लागली. फिरताना ती म्हणत होती, “मी कोणापुढे हात पसरले नाहीत. सारं स्वत: केलं. आता मला आई रागवणार नाही. थँक्यू आजीबाई... थँक्यू...”

- जयश्री एडगावकर