सृष्टी सोसायटीच्या गेटपाशी शाळेच्या व्हॅनची वाट बघत होती. तसं नेहमी चंदूकाका वेळेवरच येतात. आज कोण जाणे त्यांना उशीर झाला होता. पायाने फुटपाथवरील खडीशी खेळ करताकरता सृष्टीला अचानक मराठीच्या पुस्तकातील त्या ओळीची आठवण झाली, ‘नुकताच पाऊस पडून गेल्यानं सारी सृष्टी न्हाऊन निघाली होती... सगळं कसं स्वच्छ... धुतल्यासारखं दिसत होतं.’ अरेच्चा! तिनं आपल्या आजूबाजूला पाहिलं... फुटपाथच्या बांधकामातील निखळलेल्या दोन विटांच्या मधून एक इवलुसं हिरवंगार रोपटं उगवलं होतं... न राहवून सृष्टीनं त्या रोपट्याला हातानं हळुवारपणानं गोंजारले... रोपट्यानं हळूच डुलून तिला प्रतिसाद दिला... तिचे डोळे चमकले... आज सकाळी रूजू मावशीनं व्हॉटस्अपवर पाठवलेल्या ‘गुडमॉर्निंग’च्या इमेज मधल्यासारखं... अगदी तस्संच आहे ना हे रोपटं... हिरवंगार... सृष्टीला आज सुरू असलेल्या ‘या’ भोवतालच्या निसर्ग अनुभूतीची गंमत वाटू लागली. तेवढ्यात चंदूकाकांनी व्हॅनचा हॉर्न ठणाणा वाजवला... आणि सृष्टी शाळेत निघून गेली.

शाळेत वर्ग खोलीतील खिडकीजवळची जागा आज जणू काही तिच्यासाठीच रिकामी ठेवल्याप्रमाणे मोकळी होती. तिनं लगबगीनंच जाऊन त्या जागेचा ताबा घेतला. खिडकीतून थंडगार वार्‍याची झुळूक आली आणि तिच्या कानाला गुदगुल्या करून केली. सृष्टी शहारली. खिडकीबाहेरचं झाड हसून तिच्याकडं बघतंय असं उगाच तिला वाटून गेलं. प्रार्थनेची घंटा झाली. “या विश्‍वाची आम्ही लेकरे” सृष्टीनेही सुरात सूर मिसळला. आज प्रार्थनेचा नवा अर्थ तिला समजत होता.

वेळापत्रकाप्रमाणे तासिका सुरू झाल्या. पुस्तकाआडून चोरट्या नजरेनं सृष्टीनं पुन्हा खिडकीबाहेरील झाडाकडं पाहिलं. ते तिच्याचकडे बघून हसत होते. तेवढ्यात विज्ञानाच्या सरांनी पालवीचे विविध रंग दाखवण्यासाठी शाळेच्या परसबागेत नेलं. ‘ही कोवळी पानं म्हणजे पालवी... ही पहा पालवीची विविध रूपं.’ सारा वर्ग डोळे भरून पाहत होता. सृष्टीच्या पापण्या लवल्या आणि पालवी तिला तान्ह्या बाळाप्रमाणे हसताना दिसली. तिने डोळे चोळले. पण पुन्हा तेच. ती सावरली व सरांच्या शिकवण्याकडं लक्ष देऊ लागली. पण सारी परसबागच तिच्याकडे कुतुहलानं पाहतेय, असं तिला वाटलं.

घरी परत येताना, व्हॅनमध्ये बसण्यापूर्वी तिचं लक्ष रस्त्याच्या कडेनं वाहणार्‍या ओहोळाकडे गेलं. जणू तो ओहोळ तिच्याकडेच तुरुतुरू पळत येत होता. काय होतंय हे आपल्याबरोबर? सकाळी ते इवलं रोप, मग ती झुळूक, ते खिडकीबाहेरील झाड... परसबागेतील पालवी आणि तो... तो खळखळणारा ओहोळ...!! आजीला हे विचारलंच पाहिजे... असं काही तरी तीच वाचत असते.

‘आजीऽऽ ए आजीऽऽ’ घोंघावणार्‍या वादळासारखं घरभर सृष्टीनं आजीला शोधलं, पण आजी मात्र बंगल्यामागच्या बागेत गुलाबाच्या रोपट्याला आळं करत होती. सृष्टीनं आजीला सकाळपासूनची सारी हकिकत सांगितली. आजी हसली आणि म्हणाली, “वेडं गं माझं कोकरू... अगं सारी सृष्टी... आमच्या सृष्टीशी बोलायला बघतेय आणि तू का गं चिंतातूर?” सृष्टीच्या चेहर्‍यावरचे प्रश्‍नार्थक भाव अधिक गडद झाले.

आजीनं स्पष्ट केलं, “सृष्टी, तू गेल्या आठवड्यात अनेक रोपं लावलीस... ती वाढवलीस... हे सारे जण तुला धन्यवाद देतायंत... अगं यांची स्वतःची भाषा असते... त्यांना भावभावना असतात... तुला रोज व्हॅनमधून जाताना पाहणार्‍या रोपानं तुझ्याशी संवाद साधला, खिडकीतल्या झाडानं तुला हसून अभिवादन केलं... त्या इवलुशा पालवीनं आनंद व्यक्त केला... आता तुझी पाळी हं.” “म्हणजे गं आजी?” सृष्टी गोंधळून गेली.

आजी तिच्या कानात काही पुटपुटली आणि तिच्या चेहरा फुलला... सृष्टी तिच्या नावाचा खरा अर्थ आजपासून जगणार होती!

- प्रीती धोपाटे