फार फार वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. पृथ्वीवरची. एक होता पाऊस. त्याला येण्याची भारी हौस. येताना कसा वाजत-गाजत यायचा. रिकामा तर कधीच नसायचा. आषाढात कसा धो-धो कोसळायचा. श्रावणात इंद्रधनुष्याच्या झोपाळ्यावर बसून यायचा. कुबेराचा खजिना सोबत आणायचा. पाचूच्या बेटावर मुक्काम ठोकायचा. ढगातून डोकावयाचा आणि खुदकन हसायचा. एवढा सुंदर आणि देखणा पाऊस. पण गर्व मात्र बिलकूल नाही. सर्वांसाठी काही न काही सोबत ठेवायचा. वृक्षांसाठी नवी पालवी देऊन जायचा. धरतीसाठी मखमली दुलई अंथरायचा. वेलींसाठी इटुकली-पिटुकली वेलबुट्टी विणायचा. झुडुपांसाठी गोड-गोजिरे, सुगंधी हार-तुरे पेरायचा.

हिरवा रंग त्याचा फारच आवडीचा. त्याच्या अनंत छटा वाटत सुटायचा. कधी हिरवा गर्द, तर कधी पोपटी रंग उधळत यायचा. सर्वांना सुख वाटत फिरायचा. सर्वांना फक्त देतच राहिला. उतला नाही. मातला नाही. घेतला वसा टाकला नाही. हाच वसा त्याने दिला माणसाला, समुद्राला, नदीला, डोंगराला आणि झाडांना.

नदीने घेतला वसा. सर्वांना जीवन दिले खास! समुद्राने खुला केला खजिना. सर्वांनी लुटला त्याच्या मर्जीविना! डोंगराने दिली मायेची ऊब. माणसाने घेतला फायदा खूप! झाडांनी घातले सर्वांना खाऊ. वाटले त्याला सगळेच आपले भाऊ! माणूस मात्र घेतच राहिला. द्यायचे पूर्ण विसरूनच गेला! उतला, मातला. घेतला वसा टाकून दिला.

आता मात्र पाऊस रूसला. लांब कुठेतरी लपून बसला. झाडांना खूप वाईट वाटले. नदी-नाले सारेच आटले. समुद्राने धारण केला उग्र अवतार. डोंगरांनी ठरविले संपच करणार. आता खरोखरच माणूस कोंडीत सापडला. सर्वांनी त्याला खिंडीत गाठले. पावसाची गाणी आठवू लागला. क्षमायाचना करू लागला. ‘का रे केली पातळ माया!’ पावसाला सारखाच विचारू लागला.

पावसाला आली माणसाची कीव. वाचवीन म्हणाला माणसाचा जीव! पण आता मात्र काही फुकट नाही. माणसाला उपसावे लागतील कष्ट. पावसाने केले सारे स्पष्ट. पाऊस म्हणाला माणसाला, ‘‘माझे तर व्रत होते चारच महिने. पण तुला घ्यावा लागेल जन्मभर वसा.’’ माणूस म्हणाला, ‘‘सांग सांग पावसा, उपाय करू कसा?’’ पाऊस म्हणाला, ‘‘आयुष्यभर आता झाडे लाव. त्यांना प्रेमाने खाऊ घाल. कचरा-कुचरा साफ कर. स्वच्छ नद्यांचे पूजन कर. जेवढे घेशील निसर्गातून, तेवढे त्याला परत कर.’’ माणसाने पावसाला वचन दिले. ‘‘उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.’’

आता माणूस सर्वांबरोबर आनंदाने राहू लागला. सर्वांशी गुण्या-गोविंदाने वागू लागला. अशी ही पावसाची साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सुफळ संपूर्ण!

- सुनिता वांजळे (शिक्षिका)

शिशुविहार विद्यापीठ शाळा.