पावसाळ्याचे आल्हाददायी वातावरण असणारा आणि निरनिराळ्या सणांना घेऊन येणारा हा महिना, ऑगस्ट महिना. आनंद देणारा, मनाला चेतना देणारा, आपल्या सगळ्यांना भारावून टाकणारा, मंत्रमुग्ध करणारा, तजेला देणारा हा महिना. या सगळ्या गोष्टींचे सांस्कृतिक महत्त्व जाणत-जपतच आपण या महिन्याचे आनंदाने स्वागत करत असतो. पण या आनंदाला, या मंत्रमुग्धपणाला, या तजेल्याला खरी झळाली मिळते, ती 15 ऑगस्ट या आपल्या राष्ट्रीय सणामुळे. आपल्यातल्या चैतन्याला, आपल्यातल्या प्रेरणेला, आपल्यातल्या देशभक्तीला, त्या अनुषंगाने निर्माण होणार्‍या आपल्यातल्या अभिमानाला आणि स्वाभिमानाला खतपाणी घालणारा आपला हा राष्ट्रीय सण, त्याचबरोबरीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या आपल्या वीरांचे स्मरण आपसूकपणे करून देणारा, स्वातंत्र्याचा इतिहास पुनर्जिवित करणारा सण. स्वांतत्र सण, आपण स्वतंत्र आहोत याची जाणीव जनाजनात, मनामनात ठसवणारा हा सण.

1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचे स्मरण शाळाशाळांमधून भाषणांच्या निमित्ताने झाले, की मनात नगारे वाजू लागतात ते 15 ऑगस्टचे. त्यानिमित्ताने शाळांमध्ये सुरू होणारा 15 ऑगस्टला म्हणावयाच्या गाण्याचा सराव आपल्याला घेऊन जातो देशभक्तीपर गाण्यांच्या अनोख्या, प्रेरणादायी आणि प्रभावी दुनियेत. आणि आपण शोध घेऊ लागतो निरनिराळ्या देशभक्तीपर गाण्यांचा. झाडून सगळ्या देशभक्तीपर गाण्यांची उजळणी आपल्या मनात होऊ लागते आणि पहिले आठवते ते -

‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे,

आ-चंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे..’

हे गदिमांचे गीत.  शाळेत असताना कधीतरी प्रार्थना म्हणून म्हटलेले, हे गीत आपण येताजाता सहज गुणगुणू लागतो. त्यातली प्रेरणा आपल्याला देत राहतेे आपल्या या स्वातंत्र्य देवतेचे स्मरण आणि आपल्या कर्तव्याची, जबाबदारीची जाणीवही. ‘घरकूल’ चित्रपटासाठी कवी ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेल्या या गीताने आपण भारावून जातो. त्यातील तळमळ, त्यातील आत्मीयता आपल्या काळजात रुतून बसते आणि आपण अधिकाधिक आपल्या मनातल्या देशभक्तीला, देशप्रेमाला फुलवत जातो. यातूनच मग अधिकाधिक प्रेरणा देणारी गाणी आपल्याला आठवत जातात. त्या वेळी सानेगुरुजींच्या लेखणीतून उतरलेले -

‘बलसागर भारत होओ, विश्‍वात शोभूनि राहो’

हे गाणे आठवल्याशिवाय राहतच नाही. विश्‍वात शोभून दिसणारा बलशाली भारत आपल्या दिवास्वप्नांचा एक भाग कधी होऊन जातो आपले आपल्यालाही आकळत नाही. त्या दुनियेतून बाहेर पडण्याचा मोहच आपल्याला होत नाही. पण त्याच वेळी सावरकरांचे ‘जयोस्तुते....’ आपल्या डोळ्यांत आसवे उभे करण्याची किमयाही सहज साध्य करते. आपल्या जीवन-मरणाचा प्रश्‍न उभा करण्याची ताकद असणारे हे गीत आपला प्राण क्षणात कंठाशी आणते आणि देशभक्तीचे, देशप्रेमाचे आपल्या मनातील स्थान अधिक निश्‍चित, अधिक शाश्‍वत करत जाते. आपल्या तळमळीला, आपल्या मनातील   देशभक्तीच्या धुमार्‍याला अधिक प्रखर करत जाते.

या देशभक्तीपर गीतांना अजून एक वैशिष्ट्यपूर्ण किनार लाभलेली आहे, ती नवचैतन्याची. या गीतांच्या शब्दांमध्ये जेवढे आणि जितके नवचैतन्यदायी अर्थसामर्थ्य दडलेले आहे, तितके आणि तेवढेच त्यांच्या संगीतातही दडलेले आहे. देशभक्तीपर गीतांना लाभलेले संगीतही जोरकसपणे आशा, अभिमान आणि आत्मविश्‍वास यांनी ओतप्रोत भरलेले असते. त्या संगीतानेही आपल्यात एकप्रकारचा जोश, चैतन्य निर्माण होते. मग ते गाणे कोणतेही असेल, ‘उठा राष्ट्रवीर हो...’, असेल, ‘माणुसकीच्या शत्रूसंगे’ असेल किंवा ‘शूर आम्ही सरदार..’ यासारखे राष्ट्राची प्रतिष्ठा जपणार्‍या सैनिकाचे वर्णन करणारे गाणे असेल; त्यातली लय आपल्याला त्या प्रसंगात, त्या युद्धात ओढून घेत असते. ही गाणी ऐकताना आपण त्या गाण्याचा भाग कधी होतो ते आपल्यालाच कळत नाही. आपण या गाण्यांमध्ये नुसते सहभागी होत नाही; तर त्या गाण्यांचा, त्यांतून मिळणार्‍या आवेशाचा एक भाग होतो. आणि आपल्या तनामनात केवळ आणि केवळ ‘वीर रसाचाच’ आविष्कार होतो. रक्त सळसळायला लावणारा आवेश माणसाच्या मनात निर्माण करण्याची किमया या गाण्यांना लाभलेली आहे. ‘स्फुरण’ या गुणाची निर्मिती आणि त्याचा परिपोष यांना साध्य करण्याची हातोटी या विलक्षण गाण्यांमधलीच.

‘सागरा प्राण तळमळला’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, ‘या कणाकणातून दिव्य तेज प्रकटले’, ‘युद्धभेरी गर्जती दुंदभी निनादती’, ‘सोनेरी किरणात अमुचा ध्वज’, ‘पूर्वदिशा निर्भयतेने चालत राहू मार्ग’ ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम’, यांसारखी मराठीच काय तर, ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा’, ‘जहाँ डाल डाल पर’, ‘हम होंगे कामयाब’, ‘ऐ मेरे प्यारे वतन’, ‘वन्दे मातरम्’, ‘आओ बच्चो तुम्हे दिखाये’, ‘चंदन है इस देश की माटी’, ‘कदम कदम बढ़ाये जा’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’, यांसारख्या हिंदी गाण्यांतून निर्माण होणारा भावार्थ आपल्या मनाच्या कोपर्‍यात वर्षोनुवर्षे घर करून राहतो. या गाण्यांचे आपल्या मनातील स्थान नेहमीच वरच्या पातळीवर राहते. किंबहुना या गाण्यांना नावीन्याचा एक सकारात्मक पदरही आहे. जुनेच परत परत ऐकताना त्यातून उलगडत जाणारा नवा अर्थ आपल्या मनातल्या देशभक्तीच्या उर्मींना अधिक सबळ करत जातो.

स्व-अस्मिता जपणारी आणि त्यातूनच समूहाची ओळख सांगणारी ही गाणी आपल्या संस्कृतीची, आपल्या मूल्यांची, आपल्या इतिहासाची, आपल्या नीतिमत्तेची उजळणी करणारी आहेत, यात वादच नाही.

‘जनगणमन’ या आपल्या राष्ट्रगीताने आणि ‘वंदे मातरम्’ या आपल्या राष्ट्रीय गीताने तर आपल्या सगळ्यांना एका छताखाली एकत्र बांधून ठेवले आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या मनात एकतेची, समतेची आणि बंधुतेची परिभाषा निर्माण करून, बंधमुक्त असे मानवतेकडे जाणारे, माणुसकी जपणारे भाव प्रत्येकाच्या मनात निर्माण केलेले आहेत. हा अनेक बलिदानांमधून निर्माण झालेला आणि अनेक कवी-गीतकारांच्या लेखणीतून, संगीतकारांच्या संगीतातून आणि गायकांच्या स्वरातून साकारलेला एकतेचा, समतेचा, बंधुतेचा, माणुसकीचा वारसा आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्यासारखा आहे आणि म्हणूनच साहित्य, संस्कृती, इतिहास आणि देशभक्तीचे हे पोवाडे आपल्यासाठी एक अमूल्य असा ठेवा आहेत. या ठेव्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे, या गाण्यांचा होणारा संसर्ग. एकाने म्हटलेले हे गाणे दुसर्‍याला म्हणावेसे वाटणे, गुणगुणावेसे वाटणे यातच या गाण्यांच्या शब्दांचे, संगीताचे आणि त्यातून निर्माण होणार्‍या भक्तीचे, प्रेमाचे, आत्मीयतेचे दर्शन घडवत असते, आणि त्यातच या गाण्यांतून निर्माण होणार्‍या भावाशयाचे यश सामावलेले आहे.

- डॉ. अर्चना कुडतरकर