भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी स्वतः भारतमातेने एका सूर्यपुत्राला जन्म दिला. त्याच्या अंगी लहानपणापासूनच चौकसपणा, कुशाग्रबुद्धी, निर्भयपणा, देशप्रेम, सत्यवादी जहालपणा असे अनेक गुण होते, पण तो तितकाच प्रेमळही होता. त्याचे गुण अथांग सागराप्रमाणे होते. असे हे गुण ज्या सूर्यपुत्रात होते, तो पूत्र म्हणजे बाळ गंगाधर टिळक, म्हणजेच लोकमान्य टिळक.

लो. टिळकांना संस्कृत व गणित या विषयांची जास्त आवड होती. अवघड गणितेसुद्धा त्यांना तोंडपाठ होती. त्यातूनच त्यांची स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता दिसून येते. म्हणून तर त्यांच्याबद्दल लिहून ठेवले आहे, ‘हिर्‍यासारखी बुद्धी त्यांची चमकत होती विद्येत’.

एकदा त्यांनी शुद्धलेखनाच्या वेळी संत हा शब्द तीन प्रकारांनी लिहिला. गुरूजींनी त्यातील एकच शब्द बरोबर दिला व इतर दोन शब्द चूक दिले, पण हे टिळकांना पटले नाही. ते वही घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले. त्या वेळी मुख्याध्यापकांनी तीनही शब्द बरोबर दिले. या प्रसंगावरून त्यांच्यातील चिकाटी व आत्मविश्‍वास हे गुण दिसून येतात.

लो. टिळक बुद्धिमान होते, पण ते अशक्त होते. ते एकदा मित्रांबरोबर सिंहगड चढण्यास गेले होते. अर्धा गड चढल्यावर त्यांना दम लागला. तेव्हा मित्र त्यांना म्हणाले, ‘इंग्रजांशी लढून म्हणे भारत स्वतंत्र करणार, पण साधा गड तरी चढता येतो का तुला?’ हे बोलणे टिळकांच्या जिव्हारी लागले. तेव्हा टिळकांनी ठरवले, ‘आधी उपासना शक्तीची.’ त्या वेळी त्यांनी व्यायाम करून शरीरसंपदा मिळवली. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. एकदा मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘गीतारहस्य’ हा महाग्रंथ लिहिला.

त्यांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे काढली. या वृत्तपत्रांमधून त्यांनी निर्भयपणे अग्रलेख लिहिले. त्यातूनच त्यांनी सरकारला खडा सवाल केला, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ यातूनच त्यांची लेखनकला दिसून येते. लोकशिक्षणासाठी त्यांनी न्यू इंग्लिश शाळा सुरू केली. त्या शाळेत ते गणित हा विषय शिकवत असत.

लो. टिळकांनी ‘शिवजयंती’ व ‘गणेशोत्सव’ हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. या उत्सवांच्या माध्यमातूनच त्यांनी लोकांच्या मनामध्ये देशप्रेम जागृत केले.

लो. टिळकांचे एकच ध्येय होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’

त्यांना लोकांनी ‘लोकमान्य’ ही पदवी दिली; पण दुर्दैव असे की, लो. टिळकांचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

अशा या सूर्यपुत्राला, म्हणजेच गुणसागर टिळकांना शतशः प्रणाम!

- स्वानंद देशपांडे

विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग