जाणीव

दिंनाक: 08 Jul 2019 17:36:47


 

आठ दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत होता. सगळ्या शेताभातात-मळ्यांमध्ये पाणीच पाणी. सगळे वहाळ तुडुंब भरून वाहत होतं. नदीचं पाणी लालभडक झालं होतं. लाईटचे निम्मे खांब पाण्यात गेले होते. वहाळांवरचे साकव वाहून गेले होते. अलीकडची माणसं अलीकडे, पलीकडची माणसे पलीकडे. साकव वाहून गेल्यावर जाणारच कसं इकडून तिकडे?

मंजू आणि महेशच्या घरीही सगळे पाऊस ओसरण्याची वाट पाहत होते. मंजू आठवीत होती आणि महेश सहावीत होता. दोघंही शाळेत हुशार होती. कोकणातल्या एका छोट्या तालुक्यातलं आंबेवाडी हे डोंगरपायथ्याचं गाव. गाव अगदी निसर्गसंपन्न! पण पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत व्हायची, फोनला रेंज नसायची, वीज लुप्त झाली की दोन दोन दिवस गाव अंधारात!

गावची शाळा छान होती. शाळेतले शिक्षक वेगवेगळे उपक्रम करायचे. मंजू आणि महेश अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये यशस्वी होत होते. दोघांनीही ‘चित्रकलेच्या’ पहिल्या परीक्षा दिल्या होत्या. तालुक्याच्या गावी होणार्‍या तबलावादन स्पर्धेत महेश पहिला आला होता. मंजूही चौकस आणि हुशार होती. घरात मंजू, महेश, त्यांचे आई-बाबा आणि आजी-आजोबा, गोठ्यात त्यांची तांबू गाय आणि तिचा चांद्या नावाचा खूप देखणा पाडा होता.

मंजूचे बाबा गावातल्या दुकानात हिशोब लिहिण्याचे काम करायचे. आजोबांची शेती होती. दुसर्‍याची बैलजोडी घेऊन ते शेती करायचे. घरच्यापुरतं भात पिकवायचे. जोडीला कुळीथ, वरणे अशी कडधान्यं घ्यायचे. उन्हाळ्यात पालेभाज्या, कोथिंबीर, मिरच्या, टोमॅटो, वांगी असं माळवं करायचे. मंजूचे आजोबा वेगवेगळी पिकं घेऊन बघत. त्यांनी लावलेली कलिंगडं एका वर्षी इतकी लागली की, सर्व वाडीत वाटून टाकली.

घरी सतत कुणानाकुणाची ये-जा चालू असायची. गडी, बाया मंजूच्या आईला, आजीला, आजोबांना हाक मारल्याशिवाय पुढे जायचे नाहीत. त्यांच्याकडे होणार्‍या गोकुळाष्टमीच्या उत्सवाला वाडीतले सगळे उत्साहाने यायचे. खेडेगावात असा एकोपा असतो. त्यामुळे जिवाला जीव देणारी माणसंही असतात.

या वर्षीचा पाऊस मात्र नुकसान करणारा ठरणार असं वाटत होतं. ओला दुष्काळ पडण्याची चिन्हं दिसत होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिने असे भरपूर पावसाचे गेले. त्यामुळे पिकं वर येईनात. मंजूचे आजोबा काळजीत पडले. मंजूचे बाबा नोकरी करत म्हणून त्याचं थोड-फार चालत होतं. मंजू आणि महेशने या वर्षी शाळेसाठी कुठल्याही नव्या गोष्टीचा हट्ट केला नाही. खूप समंजस होती दोघं!

मंजू रोज वर्तमानपत्र वाचायची. बाबा आणि शाळेतल्या शिक्षकांकडून काही काही घडामोडी कानावर यायच्या. या वर्षी सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला होता म्हणे. आणि सरकार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देणार अशा बातम्या येत होत्या.

मंजूची विचारचक्र भरभर फिरली. दुसर्‍याच दिवशी शाळेतून येताना महेशला बरोबर घेऊन मंजू शाळेजवळ असणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेली. तिथे गेल्यावर मंजूला काय करावं ते सुचेना. बँकेत तीन-चार लेखनिक आपापली कामं करत होते. एका काचेच्या केबिनमध्ये कॅशियर बसले होते आणि दुसर्‍या मोठ्या केबिनमध्ये बँक मॅनेजर बसले होते. मंजू महेशचा हात धरून वॉचमन काकांना सांगून मॅनेजर काकांसमोर उभी राहिली. त्यांनी विचारले, “काय हवंय बाळा?, बँकेत खातं उघडायचंय का?” ती घाबरली. काय बोलायचे ते सुचेना. पण धीर एकवटून ती म्हणाली, “साहेब, मी ना श्रीपती तात्यांची नात. तुम्ही ओळखता ना माझ्या आजोबांना?” ते म्हणाले, “हो तर, तुझे बाबा, आजोबा येतात बँकेत, पण तू काय काम काढलंस?” तिने वर्तमानपत्राचं एक कात्रण बरोबर आणलं होतं. त्यात पीक कर्ज, कर्जमाफी, नुकसान भरपाई यांबद्दलच्या बातम्या होत्या. ती म्हणाली, “मला ना माझ्या आजोबांना ही सरकारी मदत मिळवून द्यायची आहे. तुमची बँक यासाठी काही मदत देते का? म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही, पण माझे बाबा आणि आजोबा काळजीत आहेत, म्हणून काही मदत तुम्हाला बँकेकडून करता येईल का?”

बँक मॅनेजर आश्‍चर्यचकित झाले. एवढ्याशा मुलीला केवढी समज! मंजू म्हणाली, “मला ना आजोबांना सरप्राईज द्यायचंय. त्यांना अशी मदत मिळाल्याचं पाहायचंय.” मॅनेजर काका म्हणाले, “हे बघ आम्ही ही जी मदत देतो, ती कर्जाऊ असते; म्हणजे तुमचं पीकपाणी चांगलं झालं की त्यातली काही रक्कम परत बँकेत भरायची. काही रकमेवर सूट मिळते. पण सरकारने शेतकर्‍यांसाठी ही खास मदत देऊ केली आहे. मी बघतो काय करायचं ते. आजोबांना बोलवून सांगतो त्यांना या सवलतीचा लाभ घ्यायला.” महेश घाईघाईने म्हणाला, “पण काका, आम्ही सांगितलं तुम्हाला, हे नका बरं सांगू! आम्ही नंतर सांगू त्यांना.” मॅनेजर काकांनी मुलांना चॉकलेट्स दिली आणि त्यांच्या पाठीवर शाबसकी दिली.

पुढची सगळी चक्र भरभर फिरली. मंजू आणि महेश काही न बोलता नुसतं पाहात व ऐकत होते. एके दिवशी गावात अल्पभूधारक शेतकर्‍यांना मदतीचे चेक देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंजूच्या घरातील सर्वांना निमंत्रण आले. गावच्या बँकेसमोर मंडप घालून बसायची व्यवस्था केली होती. तालुक्याचे तहसिलदार पाहुणे होते. कार्यक्रम सुरू झाला. श्रीपती तात्यांचे नाव पुकारण्यात आले. त्यांना चेक देताना महेशने मोबाईमध्ये मस्त फोटो काढला. गावातल्या इतरही शेतकर्‍यांंना ही आर्थिक मदत मिळाली. तहसिलदारांनी बँक मॅनेजरांचं कौतुक केलं. शेवटी बँक मॅनेजर बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, “आज मी आणखी एक सत्कार करणार आहे.” सर्व जण कोड्यात पडले. ते पुढे म्हणाले, “आपल्या श्रीपती तात्यांची नातवंडं मंजू आणि महेश यांनी पुढे यावं, त्यांना शाळेची दप्तरं भेट म्हणून देण्यात येत आहेत. कारण या सर्व समारंभाचे श्रेय त्यांनाच आहे, त्यांनी त्यांच्या आजोबांची समस्या माझ्यापुढे मांडली; म्हणून इतरही शेतकर्‍यांना ही मदत मिळवून देता आली. आता पीकपाणी चांगलं होऊन यातील काही टक्के भागाची परतफेड करायची आहे, तुम्हाला या वर्षी चांगला फायदा होऊ दे, ओल्या दुष्काळाचे सावट दूर व्हावे. तुम्हाला जमेल तेव्हा ही परतफेड करता येईल. मंजू आणि महेशसारखी जागरूक, संवेदनशील, परिस्थितीची जाणीव असणारी मुलं हे या देशाचे खरे आधारस्तंभ आहेत.” श्रीपती तात्या मंजूचे आई-बाबा, आजी, मंजू आणि महेश या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता!

     - चारुता शरद प्रभूदेसाई

          सहशिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग