वाचन नेहमीच आपली सोबत करते. वाचनासारखा दुसरा मित्र आणि गुरू नाही. ते वार्धक्यात, संकटात आपली सोबत करते. ज्यांना पुस्तकांची सोबत असते ते कधीच एकले नसतात. वाचन मानवाच्या शिक्षणावर फार मोठा परिणाम करते. शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे वाचन जीवनातील विविध कौशल्ये वाचनानेच प्राप्त होतात. उत्तम वक्तृत्वासाठी, लेखनासाठी आणि व्यक्तिमत्त्वासाठीही उत्तम वाचन आवश्यक आहे. वाचताना मन-बुद्धीची एकाग्रता वाचकाला आत्मिक समाधान देते. विचारांची प्रगल्भता, संस्कृतीचे संवर्धन आणि मूल्यांची रूजवणूक वाचनातून होते. चरित्रग्रंथ वाचनाने प्रेरणा मिळते. चरित्रग्रंथातून पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. ऐतिहासिक ग्रंथ भूतकाळात फिरवून आणतात. भूगोलातून विश्‍व समजते. आध्यात्मिक वाचनाने मनाला उभारी येते, तर काव्य वाचनाने रसिकता जागी राहते. स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथ वाचनाने ऊर्जा मिळते, तर ज्ञानदेवांच्या ग्रंथातून सृजणत्व जागे होते. वाचनाचे महत्त्व ज्ञानोबा सांगतात -

‘वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे, रसिकत्व’ वाचन म्हणजे फक्त मनाचा विरंगुळा नव्हे, तर ते आत्मशोधाचे आणि बोधाचे प्रभावी साधन आहे. वैज्ञानिक युगात तंत्रज्ञानाच्या विविध करामती अधिक प्रभावीपणे समोर येणार आहेत, अशा वेळेस मानवाला चतुरस्र होण्यासाठी मनाची मशागत करण्यासाठी बुद्धीला अधिक खाद्य पुरवण्यासाठी ‘वाचनाची’ आवश्यकता आहे. ताणतणावाच्या, धकाधकीच्या या युगात मानसिक आजारांनी माणसे ग्रस्त होत आहेत. अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळेस मनाला प्रसन्न करणारे, उभारी देणारे आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारे औषध  म्हणजे ‘वाचन’ होय. तंत्रज्ञानाचे आविष्कार, कल्पकता समजावून घ्यावयाची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. ‘वाचन संस्कृती’ हिच आधुनिक युगाच्या सुखाची गुरुकिल्ली आहे. वाचनाच्या विविध फायद्यांचा विचार करूनच अमेरिकासारख्या प्रगत देशांनी शालेय अभ्यासक्रमात युद्धपातळीवर वाचन चळवळ सुरू केली आहे.

मानवाला भूत-वर्तमान आणि भविष्याशी जोडणारा दुवा म्हणजे वाचन, म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात- ‘अखंडित वाचीत जावे’. चालू शतकातील अमर्यादित मनोरंजनाच्या उपलब्धतेमुळे लहान थोरांचे वाचनाकडे होणारे दुर्लक्ष पाहता साधुसंतांची शिकवण आपण आचारणात आणण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. आपले आयुर्वेदशास्त्र, विज्ञानशास्त्र जगाच्या कल्याणासाठी वाचावयास हवेत. ‘गाव तेथे देवालय तसे वाचनालय व्हावयास हवे’ वाचनाची चळवळ सुरू झाली की, गावाच्या आणि देशाच्या अनेक समस्या आपोआप सुुटतील. आपल्या इतिहास, वारसा,आपल्या श्रद्धा समजावून घेतल्यास मानवी कल्याणाच्या प्रगतीची बिजे वाचनातूनच निर्माण होणार आहेत. म्हणूनच वाचन संस्कृती काळाची गरज आहे. त्यासाठीच म्हणू या-

उचल पुस्तक, तिथे झुकव मस्तक

जुन्या ग्रंथामधून, नव्या ग्रंथामधून

उद्या पिकल ज्ञानाचं रान

उचल पुस्तक तिथे झुकव मस्तक

तुला ज्ञानेश्‍वरांची आण...

- अजित मारुती शेडगे

माध्यमिक विद्यामंदिर रातवड