पक्ष्यांची नेमकी व्याख्या तरी काय? कुणाला म्हणायचं पक्षी? ‘जो उडू शकतो तो पक्षी’, असे म्हटले तर फुलपाखरे उडू शकतात; पण ते कीटक आहेत आणि वटवाघळे उडू शकणारे सस्तन प्राणी आहेत. पेंग्विन आणि शहामृग हे पक्षी असूनही उडू शकत नाहीत! ‘अंडी देतात ते पक्षी’ असे म्हटले, तर साप-सरड्यांसारखे सर्व सरपटणारे प्राणी अंडी देतात, बदकाप्रमाणे चोच असणारा Duck cilled platypus हा सस्तन प्राणीसुद्धा अंडी देतो. पक्ष्यांची खरी शास्त्रीय व्याख्या आहे, ‘पिसे असणारे द्विपाद प्राणी (Featherd ciped)’!

पक्ष्यांमध्ये आणि सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये विशेष साम्य जाणवते. दोघेही अंडी देतात, पायांना नख्या व खवले असतात, हाडांच्या रचनेतही साम्य आढळते. पक्ष्यांची उत्क्रांतीच सरपटणार्‍या प्राण्यांपासून झालेली आहे. आर्किओपटेरिस (Archaeopteryx) हा अर्धा सरपटणारा प्राणी आणि अर्धा पक्षी असा दिसणारा जिवाश्म 1861 साली सापडला आहे. त्याचप्रमाणे आर्किओरनिस (Archaeornis)चे जिवाश्म (fossils) १८७७ मध्ये सापडले आहेत. हे सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांतील ‘दुवा’ (connecting link) आहेत. जे ‘सरीसृपांपासून पक्ष्यांची निर्मिती’ याला दुजोरा देतात.

पक्ष्यांची शरीर रचना ही हवेसारख्या विरळ माध्यमामध्ये तरंगण्यासाठी झाली आहे. त्यासाठी त्यांची हाडे पोकळ असतात. शरीरात हवेच्या पिशव्या (air sac) असतात. शरीराभोवती वजनाने अतिशय हलकी, पण रचनेने मजबूत अशा प्रकारची पिसे असतात. शरीराचा आकार निमुळता असतो. पंखांची उघडझाप करण्यासाठी ताकद असणारे स्नायू असतात. ‘उडणे’ या एका गोष्टीमुळे पक्ष्यांसाठी ‘अवघे विश्वची माझे घर’ असते. दर वर्षी लाखो पक्षी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये उत्तरेच्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी हजारो किलोमीटरचे अंतर पार करून भारतात येेतात. काही पक्षी विणीच्या हंगामामध्ये स्थलांतर करतात.

पक्षी अंडी देतात. त्यासाठी सुगरणीसारखे पक्षी सुबक घरटे बांधतात. तांबट, पोपट हे पक्षी वृक्षांच्या ढोलीत घरटे करतात. धनेश पक्ष्याची मादी तर झाडाच्या ढोलीत जाऊन बसल्यावर ढोलीचे दारच लिंपून बंद करून घेते. पुढे नर छोट्याशा झरोक्यातून मादी व पिल्लांसाठी फळे आणतो. माळरानावरचे पक्षी जमिनीवरच अंडी देतात. त्यांची अंडी हुबेहूब मातीच्या रंगाची असतात. त्यामुळे जमिनीवर सुरक्षित राहातात. बुलबूल वाटीच्या आकाराचे घरटे करतो, तर कोकिळेच्या कुळातील पक्षी स्वतःचे घरटे न बांधता थेट कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात. अंडी उबवण्यापासून ते पिल्लांना खाऊ-पिऊ घालण्याचे काम पुढे कावळेच मन लावून करतात.

पक्ष्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये ही खूप विविधता आढळते. त्यासाठी त्यांच्या चोचींचे विशिष्ट आकार असतात. गरुड, बहिरी ससाणे मांसभक्षक आहेत. चिमणी धान्य खाते. कीटक अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. खंड्या मासे पकडण्यात इतका पटाईत आहे की, त्याचे इंग्रजी नाव Kingfisher आहे. कुदळ्या पक्ष्याची चोच मोठी वक्राकार आहे. तिच्या मदतीने तो दलदलीतले गांडूळ पकडतो. सुतार पक्षी कठीण अशा वृक्षांच्या खोडांच्या आत लपलेले कीटक आपल्या तीक्ष्ण चोचीने लाकूड फोडून मिळवतो. फुलचुसे फुलांमधील मकरंद गोळा करताना फुलांच्या परागीभवनाला मदत करतात. इवलेसे फुलचुसे पक्षी व अनेक फळे खाणारे पक्षी वनस्पतींच्या बिया सर्वत्र विखुरण्यासाठी फायद्याचे ठरतात. घार, गिधाड हे पक्षी कुजणारे मृत प्राणी खाऊन परिसर स्वच्छ ठेवतात.

पक्ष्यांचे रंग मोहक असतात. लाल मुनियाचा तांबडा, मिनीव्हेटचा नारंगी, हळद्याचा पिवळा, पोपटाचा हिरवा, खंड्याचा निळा, पारव्याचा पारवा, शिंजिराचा जांभळा हे इंद्रधनूचा एकएक रंग धारण करणारे असतील, तर नवरंग (Indian Pitta) हा पक्षी संपूर्ण इंद्रधनूच पिसांवर पांघरून असतो. आपला राष्ट्रीय पक्षी मोर तर आपल्या पिसांवरील मनमोहक रंगांचे प्रदर्शन मोठ्या डौलाने करतो. कावळे काळेकुट्ट, तर बगळे पांढरेशुभ्र असतात. पिसांचे रंग त्यांच्यातील रंगद्रव्यांमुळे किंवा पिसांवरून होणार्‍या  अपवर्तनामुळे दिसतात.

बहुतांश पक्षी दिवसाच वावरतात; पण घुबड, रातवा असे काही पक्षी निशाचर आहेत. घुबड रात्री उंदीर फस्त करतात आणि आपल्या मालमत्तेचे, अन्नधान्याचे संरक्षणही करतात. घुबड शेतकर्‍यांचे मित्र आहेत. घुबडांविषयी आपल्या मनात काही गैरसमज, अंधश्रद्धा असतील; तर त्या दूर करून आपण त्यांचे महत्त्व जाणले पाहिजे. त्यांचे संरक्षण केले पाहिजे. घुबडाला ज्ञानाचे, विद्वत्तेचे प्रतीक आणि काही ठिकाणी लक्ष्मीचे वाहन मानले जाते.

पक्ष्यांची दुनिया खरोखरच अद्भुत आहे. त्यांच्या दुनियेची सफर करायला आवडेल तुम्हाला! लहानात लहान पक्षी कोणता? मोठ्यात मोठ्ठा कोण? सर्वांत उंच कोण? अशा गंमतशीर प्रश्नांची उत्तरे शोधून मित्रांसोबत प्रश्नमंजूषा खेळा. एखादे लहानसे पक्ष्यांचे पुस्तक वाचा. दुर्बीण मिळाली तर भारीच मजा! तुम्हाला पक्ष्यांच्या मागे हिंडायची गरज नाही, तेच तुमच्या अंगणात येतील. या उन्हाळ्यात आपल्या अंगणात भिंतींवर पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवा. मूठभर धान्य ठेवा किंवा चपाती, भाकरीचे तुकडे ठेवा. येणार्‍या पक्ष्यांची निरीक्षणे करा. चित्रे काढा. मग बघा या आपल्या नव्या चिमुकल्या मित्रांसोबत सुटीत कशी धमाल येते ते!

- अमित पावशे