पाऊस पडताना...

दिंनाक: 03 Jul 2019 16:10:19


 

पाणी माणसाचं जीवन आहे. त्यामुळे एकवेळ जेवण नाही मिळालं तर चालतं, पण पाणी मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणून वर्षातून 4 महिने पडणारा पाऊस आपल्याला १२ ही महिने पुरेल असा साठवावा लागतो. पावसाचं पाणी साठवता साठवता त्याच्या अनेक आठवणी तयार होत असतात. या आठवणीतूनच पावसाचं आणि माणसाचं नातं किती घट्ट आणि जवळच आहे हे लक्षात येतं. हो या नात्याला आपण ठराविक एक लेबल नाही लावू शकत. कारण माणसाप्रमाणेच पावसाचीदेखील रूप बदलत असतात. कधी तो विजांच्या कडकडाटासह रौद्र रूप घेऊन येतो, कधी निष्प्रभ आभाळ असताना फक्त रिमझिम पडतो, तर कधी संततधार पडत असतो.

पावसाच्या आगमनाने निसर्गाच्या हिरव्या, निळ्या, काळ्या रंगाला आणखी गडदपण निर्माण होतं. पाण्याने न्हाऊन निघालेला डोंगरदादा टवटवीत हिरवा दिसू लागतो. झाडांचा हिरवा रंग, गडद हिरवा तर नवीन पालवीचा पोपटी रंग आणखी आकर्षक होतो. झाडांच्या पानांवर स्थिरावलेले पाण्याचे थेंब अगदी मोत्यांसारखे भासू लागतात. फुलांचा सुंदर वास सर्वत्र दरवळू लागतो. पक्षांच्या किलबिलण्यात उत्साह असतो. अशा वातावरणात कोकिळा-पावश्या या पक्षांचे आवाज आणखी मधुर वाटू लागतात. आठ महिने जमिनीत दडी मारून बसलेले मोठे मोठे बेडूक अचानक डबक्यात दिसायला लागतात. सुरुवातीला तर फक्त त्यांचा तो मोठा आवाज ऐकू येतो. साचलेलं डबकं ओसारता ते पुन्हा गायब होतात.

उन्हाळ्यात ओस पडलेली माळरानं, गवतरूपी हिरवी चादर पांघरू लागतात. इथं चरणार्‍या शेळ्या, मेंढ्या, गुरे आणि त्यांच्यासोबत असलेला त्यांच्या गुराख्या यांच्या चेहर्‍यावर समाधान ओसंडून वाहत असतं. त्या शेळ्या मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज आणि त्यांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांचा आवाज त्या पावसात एक नवं संगीतच तयार होत असतं.

आभाळाकडे टक लावून बसलेला बळीराजा पाऊस पडताच पेरणीच्या लगबगीत दिसतो. भातलावणी करणार्‍या बायका भर पावसात भिजण्याचा आनंद घेत घेत भात लावत असतात; तर कधी पावसापासून बचाव करण्यासाठी  पोत्याचं घोंगडं बनवून डोक्यावर घेतलेलं असतं. हे प्रत्येक पावसाळ्यात दिसणारं मनमोहक आणि समाधान देणारं वास्तव चित्र आहे. दिवसभर बरसणार्‍या पावसाला काही वेळ विसावा मिळावा म्हणून आडवा येणारा इंद्रधनुष्य आणि त्यात असणारे सातही रंग डोळे दिपवून टाकतात.

पाऊस म्हणजे शाळकरी मुलांसाठी आणि वारकरी लोकांसाठी आनंदच आनंद असतो. एक म्हणजे  वारकर्‍यांना वारीचे वेध लागतात आणि शाळकरी मुलांना पुन्हा सुटीचे वेध लागतात. नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या संपलेल्या असतात. मग आता पुन्हा सुटी मिळायला कारण काय तर पूर येईल एवढा पाऊस पडणे. गंमतच असते या छोट्या मुलांची पण, त्यांना कळतच नाही की पूर आला तर तो सर्वत्रच येईल म्हणून... आणि निरागस मनाने ते देवाकडे प्रार्थना करत असतात की, खूप पाऊस पडू दे. इथं मंगेश पाडगावकारांच्या बालगीताच्या ओळी आठवतात...

सांग सांग भोला नाथ पाऊस पडेल काय

शाळे भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय

किंवा

ये रे ये रे पावसा...

तुला देतो पैसा...

किती निरागस असतात मुलं, अगदी रिमझिम पडणार्‍या पावसासारखी. रस्त्यावरून चालताना सोबत वाहणार्‍या पावसाच्या पाण्यात या छोट्या मुलांनी सोडलेल्या होड्या पहिल्या की प्रत्येकाला आपलं बालपण आठवतं. त्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहाबरोबर दूरदूरपर्यंत पळत जायचं. त्याच पाण्यात मनसोक्त उड्या मारायच्या. हा पाण्यात होडी करून सोडण्याचा खेळ चिरतरुण आहे. तसंच पावसाची सर हातात साठवून एकमेकांच्या अंगावर उडवायची...आणि आपण भिजायचं, पण आपल्या दप्तराला अजिबात भिजू न देण्यासाठीचा अट्टाहास म्हणजे एका छत्रीत चार जण असा तो प्रपंच...

पावसाळ्यात तरुण, ज्येष्ठ लोकं आपल्या शाळेतील आठवणीत रमत असतात, तर लहान मुलं आपल्या भविष्यात असणार्‍या आठवणी आज प्रत्यक्ष जगत असतात. प्रत्येक रूपात पाऊस आपल्याला हवाहवासाच वाटत असतो. कारण माणसाला जवळ करण्याची ताकद त्याच्या बरसण्यात असते.

- ज्योती बागल