‘श्रीमान’ सोसायटीच्या बागेत तन्मयच्या वाढदिवसाची पार्टी चांगलीच रंगात आली होती. जानेवारी महिन्यापासून प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला सोसायटीच्या आवारात एक तरी झाड लावायचं आणि त्याला आपलं नाव द्यायचं. मग त्या झाडाला त्याच बर्थडे बॉय/गर्लच्या नावाने ओळखायचं. नियम असा नव्हता; पण बच्चेकंपनीला ही कल्पना पसंत होती. रोज शाळेतून येताना वॉटर बॅगमधील पाणी घालून, त्या झाडाची काळजीसुद्धा घेतली जायची.

 तर आज पेरूचं झाड तन्मयने लावले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एवढ्यात ध्रुव धावत आला आणि म्हणाला, ‘‘मला ना, सोसायटीचं सिक्रेट सांगायचंय’’ सगळे आ वासून ध्रुवकडे बघू लागले, तसा तो म्हणाला, ‘‘मी बाबाला बोलताना ऐकलंय, आपली बाग काढून तिथे पार्किंग करणार आहेत.’’ सगळे विचारात पडले. पार्टी मस्त झाली, पण ध्रुवच्या गुगलीने सगळ्या बच्चेकंपनीची झोपच उडाली.

श्रेयाही घरी आली, हातपाय धुऊन टेबलापाशी बसली. तिच्या मनात बागेतली झाडं, बसायची बाकं, लॉन, फुलांची झाडं, चाफ्याचा वृक्ष, त्याच्या खाली असलेला झोपाळा सगळे घोळत होते. कित्ती मजा करतो आपण सगळे मिळून खाली बागेत. या संपूर्ण भागात आपलीच बाग मस्त आहे. कधी लॉनवर पकडापकडी, कधी झाडांच्या आड लपाछपी खेळायला खूप मजा यायची. पहिला पाऊस आला तेव्हा तर सगळ्यांनी कागदी होड्या तयार केल्या आणि प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी या जमा झालेल्या पाण्यात नाव लिहून सोडल्या. अगदी शेजारच्या बिल्डिंगमधले, तेजस, सुहानीपण आले होते तेव्हा खेळायला! त्यांच्या बिल्डिंगमधली बाग अशीच पूर्वी काढून टाकली म्हणून...म्हणजे आता आपल्या इथे पण असंच होणार?? ...हल्ली संध्याकाळी गाड्यांची खूप गर्दी होते बागेत. मग आई आणि आजी ‘वाहने नीट बघून पळा’ असं सारखं सारखं सांगत असतात. श्रेयाला तर काही सुचेचना. म्हणजे आपली बाग गेली, तर आपण आणि आपली गँग खेळणार कुठे, छे काही समजेचना...

एवढ्यात हळूहळू चालत टेबलाजवळ आजी आली, ‘‘काय आज कोणतं झाड लावलं वाढदिवसाला?’’ आज्जी गं, तू सांगणार नाहीस ना कोणाला?’’ श्रेया म्हणाली. ‘‘काय गं श्रेयाबेटा?’’ ’’आजीऽऽ बाग काढून टाकणार आहेत म्हणेऽऽ’’ वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच श्रेयाने रडायला सुरुवात केली. आजीला काही कळेचना. हे कधी ठरलं आणि तेही श्रेयाला कोणी सांगितलं, सोसायटीतल्या सगळ्यांना पटलं आहे का? वगैरे प्रश्न आता आजीच्या मनात उभे राहिले. मात्र आता आधी श्रेयाला शांत करायला हवं, मग बाकीचे!’’ उगी उगी पिल्लू, अशी कशी बाग काढून टाकणार? आमची श्रेया खेळणार कुठे मग? मी रागवेन हं वॉचमनकाकाला उगाचच काहीतरी म्हणतो.’’ असं काहीसं म्हणत श्रेयाला शांत करत, जेवण भरवायला आजीने सुरुवात केली. पण, श्रेयाची गाडी चांगलीच बिनसली आहे, हे आजीच्या लक्षात आलं.

रात्री श्रेया झोपल्यावर आजीने मंगेशकडे, म्हणजे श्रेयाच्या बाबाकडे हा विषय काढला. तेव्हा लक्षात आलं की, गाडी एकावर एक चढवायच्या यंत्राचा खर्च जास्त आहे. त्यापेक्षा, सध्यापुरतं बागेला सपाट करून तिथे पार्किंग तयार करणं थोडं स्वस्त आहे. त्यामुळे सोसायटीतले सदस्य बाग काढून टाकायचा विचार करत आहेत. मुलांची काय काढता येईल समजूत! असा त्यांचा विचार होता. रविवारी अमंलबजावणीसुद्धा होणार आहे. म्हणजे फारसा वेळही नाही, हे आजीच्या लक्षात आले.

शुक्रवारी संध्याकाळी काही विचार करून, खाली बच्चेकंपनी खेळत होती तिथल्या बाकावर येऊन आजी बसली. आजीला बघून श्रेया आली पाठोपाठ ओवी, शची, प्रथमेश, अल्पा, ध्रुव, तेजस हेपण आले. ‘आजी गोष्ट सांग ना’चा गलका सुरू झाला. आजी म्हणाली, ‘‘ही झाडं, फुलं, पानं, फुलपाखरं आपलं आयुष्य प्रसन्न करतात. हवा शुद्ध करतात, परिसराचं सौंदर्य खुलवतात. हे उंचच्या उंच नारळाचं झाड एवढं उपयोगाचं आहे की, त्याला आपण कल्पवृक्ष असं म्हणतो. हे कडुनिंबाचं झाड बागेत आहे म्हणून किडे, डास यांच्यावर नियंत्रण राखलं जातं. या आंब्याच्या झाडाच्या कैर्‍या, आंबे आपण सगळे वाटून खातो. सणावाराला त्याची डहाळी दारावर शुभ म्हणून लावतो. या मऊ मऊ दुर्वा देव्हार्‍यात गणपतीला वाहतो. ही बाग आपल्या सगळ्यांच्या आवडीची आहे, खरं ना?’’  सगळ्या मुलांनी, ‘‘हो हो हो आजी!’’ असा दुजोरा दिला.

म्हणजे पर्यावरण, निसर्ग आपल्या आवडीचा भाग आणि जीवनातला महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याचं संरक्षण हे आपलं कर्तव्य आहे, नाही का?’’ आजी सांगत होती आणि मुलंही लक्षपूर्वक ऐकत होती.

 ‘‘फार फार वर्षांपूर्वी जोधपूरच्या अभयसिंह राजाला एक राजवाडा बांधायचा होता. त्याने राजवाड्यासाठी जी जागा ठरवली होती, तिथे होती भरपूर वनराई. मग काय, राजाने शिपायांना केली आज्ञा, तोडून टाका वनराई आणि सपाट बनवा जमीन, तिथे उभा राहील महाल राजाच्या आज्ञेची झाली लगोलग अमंलबजावणी! शिपाई पोहोचले वनराईत. त्या वनराईत राहात होते. आदिवासी त्यांना म्हणत, ‘बिष्णोर्ई’ ही बिष्णोई जनता साधी-भोळी झाडांना देव मानणारी! राजाच्या शिपायांना बघून गांगरून गेली, पण त्यांनी हिंमत नाही सोडली. एकजूट केली, झाडांना घट्ट मिठी मारली. वनसंपदा आहे म्हणून आपण मनुष्यप्राणी आहोत. या वनदेवतेचा, पर्यावरणाचा आम्ही र्‍हास होऊ देणार नाही, असं सांगत झाडाभोवती हात गुंफले. आता राजाचे शिपाई गोंधळून गेले.’ ‘आधी आम्हाला मारा मग आमच्या झाडांवर कुर्‍हाडी फिरवा’ असं बिष्णोई म्हणू लागले. घरातले लहान-थोर, स्त्री-पुरुष सारेच झाडाला कवटाळून उभे राहिले.’’ आजी सांगत होती. मुलं जिवाचे कान करून ऐकत होती. ‘‘घनघोर लढाई झाली. पण ही होती वृक्षसंवर्धनाची युद्धभूमी! राजाला ही गोष्ट समजली. तो धावत वनराईत पोहोचला. बिष्णोइशी बोलताना त्याला आपली चूक उमजली. ही अशिक्षित बिष्णोई जनता पर्यावरणाचे महत्त्व जाणते, मात्र आपण समजून घेण्यात कमी पडलो, हे त्याला उमगले. बिष्णोर्ईंची त्याने माफी मागितली त्यांच्या आसपासचे एकही हिरवे झाड यापुढे तुटणार नाही अशी त्याने ग्वाही दिली. एकही शस्त्र हाती न घेता राजाच्या शिपायांना भाबड्या बिश्नोईंनी प्रेमाने चितपट केलं. त्यांचा विजय हा वृक्षप्रेमाचा विजय होता. वृक्षवल्लींचा जयजयकार आसमंतात दुमदुमला. झाडांना चिकटून बसले, म्हणून हे ‘चिपको’ आंदोलन म्हणून इतिहासात अजरामर झाले. अनेकांनी या आंदोलनापासून प्रेरणा घेत वृक्षसंपदा वाचवली. आजीची गोष्ट सांगून झाली.

श्रेया चटकन उभी राहिली म्हणाली, ‘‘आजी, आम्ही सगळे जण रविवारी अशीच बागेभोवती साखळी करून उभे राहू तू भजनी मंडळातल्या सगळ्या आजींनापण घेऊन ये, आपणसुद्धा आपली बाग वाचवू या, पर्यावरणाचं रक्षण करू या. हो ना?’’ सगळी बच्चेकंपनी प्रश्नाला उत्तर सापडल्यामुळे उड्या मारू लागली. मग काय, रविवारी जोरदार तयारी करून सगळी गँग बागेभोवती साखळी करून सज्ज झाली.

मग पुढे काय झाले ते तुम्ही चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच, ‘श्रीमान’ सोसायटीतलं, ‘चिपको आंदोलन’ शंभर टक्के यशस्वी झालं.