आरोग्यदूत

दिंनाक: 27 Jul 2019 18:19:28


इयत्ता आठवीच्या वर्गातली ए-वन गँग खूप उत्साही होती. या गँगमध्ये आदित्य, अथर्व, अमेय, आर्या, आभा असे सगळे हिरे होते. सगळ्यांची नावं ‘अ’पासून सुरू होणारी म्हणून त्यांनी आपल्या गु्रपला नाव दिलं होतं ‘ए-वन गँग’.

त्यांच्या वर्गशिक्षिका होत्या अनघाताई. मुलं म्हणायची, ‘‘ताई, तुम्हीपण आमच्या गँगमध्येच. कारण तुमचंही नाव ‘अ’पासूनच सुरू होतं. अनघाताईसुद्धा त्यांच्या वर्गासाठी खूप वेगवेगळे उपक्रम करायच्या.

वर्गात 40 मुलं होती आणि एकमेकांशी खेळीमेळीने वागायची. ए-वन गँगमधील मुलं एकाच व्हॅनमधून यायची आणि राहायलाही एकाच सोसायटीत; म्हणून त्यांचा एक ग्रुप बनला होता. वर्गातली सर्वच मुलं अभ्यासू, उत्साही होती.

आठवीच्या या वर्गातील मुलांनी हस्तलिखिते बनवली होती. इतिहासाचा प्रकल्प म्हणून शाळेच्या व घराच्या परिसरातील मंदिराचा अभ्यास केला. फोटो, माहिती जमवली होती. खूप दिवस काही उपक्रम केला नाही की, आठवीतील हे सगळे विद्यार्थी बेचैन असायचे. त्यातला एक ग्रुप रोज भित्तिपत्रक बदलायचा, दिनविशेषानुसार त्यात माहिती लावायचा.

आज अनघाताईंकडे एक सरकारी परिपत्रक आले होते की, शाळेत आरोग्य व स्वच्छता सप्ताह साजरा करावा!

अनघाताईंनी वर्गात नुसते वाचून दाखवताच सगळे उत्साहात ओरडू लागले. बाईंनी ए-वन ग्रुपला जबाबदारी दिली आणि वर्गातील इतर सर्व मुलांच्या मदतीने काय करता येईल, हे ठरवायला सांगितले. कोण म्हणाले, ‘‘झाडू घेऊन स्वच्छता करू,’’ कोण म्हणाले, ‘‘आरोग्य तपासणी शिबिर ठेवू’, कोण म्हणे, ‘वजन, उंची मोजू’, कोणी म्हणाले, ‘आरोग्य याविषयी निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेऊ!’ पण एकेक करून सगळ्या योजना बाद ठरल्या.

ए-वन ग्रुपमधील अमेय थोडा वेगळा विचार करायचा. तो म्हणाला, ‘‘ताई, आपण आपल्या शाळेतील नळांची पाण्याची जी व्यवस्था आहे तिथे हँडवॉश, साबण, नॅपकिन्स ठेवू या. तसेच, टॉयलेटमध्येही या सर्व सुविधा पुरवू या. काही मुलं स्वत:चे पेपर नॅपकिन्स, सॅनिटायझर्स, पेपर सोप आणतात दप्तरातून, पण आपण या सप्ताहाच्या निमित्ताने या सर्व सुविधा देऊ या का?’

 अमेयच्या या कल्पनेला सगळ्यांनी उचलून धरलं, पण एवढ्या महाग गोष्टी कशा परवडणार? मग बाकी सगळी मुलं काही सुचवू लागली. वर्गणी काढू, मदत मागू, पालकांना सांगू इत्यादी सूचना झाल्या.

ए-वन गँगमधील आदित्य, अथर्व, आर्या यांनी एक माहिती पत्रक तयार केले. कंम्प्युटरवर या पत्रकाचे डिझाईन, मजकूर सगळं तयार झालं. आणि ही पत्रकं इ.8वीतल्या मुलांना वाटली. मुलांनी ही पत्रक आपल्या सोसायटीच्या सूचना फलकावर लावली. भराभर अनेक ठिकाणी प्रसार झाला. त्या पत्रकावर लिहिले होते -

‘आरोग्य आणि स्वच्छता

एकमेकांना पूरक!

विद्यानिकेतन शाळेतील इयत्ता आठवीचे विद्यार्थी बनणार आरोग्यदूत!

स्वच्छता-सुविधा पुरवण्यासाठी निधीची गरज!

सढळ हस्ते मदत करा! आरोग्य येईल आपल्या घरा!’

अशा प्रकारची पत्रकं स्वत: तयार करून वाटली गेली.

मग मुलांचा उपक्रम म्हणून अनेकांनी मदत केली. अनघाताईंच्या ओळखीच्या एका डॉक्टरांनी त्यांच्या एका सेवासंस्थेमार्फत काही वस्तू पुरवल्या. मग मुलांनी काय-काय स्वच्छतापूरक साहित्य लागणार आहे. किती वस्तू आणाव्या लागतील, कुठे खरेदी करायची, वस्तू कोण आणणार असं सगळं नियोजन केलं.

आरोग्य सप्ताहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. मुलांमध्ये उत्साह संचारला होता. शाळेतील मुलांचे काही पालक जे डॉक्टरी व्यवसाय करत होते, त्यातल्या पाच जणांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं.

अनघाताईंनी सुरुवातीला, आठवीच्या वर्गाची ही आरोग्यदूत संकल्पना स्वच्छता-सुविधा वस्तूंचा वापर, त्यांचा पुरवठा, त्या कशा वारायच्या याविषयी सांगितले. ए-वन गँगने सुचवलेल्या आणि पार पाडलेल्या या योनजेचे पाहुण्यांनी कौतुक केले. अनघाताई म्हणाल्या, ‘‘आता उद्यापासून शाळेतील सर्व नळांजवळ, टॉयलेट्समध्ये या सुविधा असतील, त्याचा योग्य तो वापर करा. हँडवॉश, टांगते साबण यांचा अपव्यय करू नका. डेटॉल, पेपरनॅपकीन सॅनिटायझर्स लावा. टॉयलेटमधून बाहेर येताना हँडवॉश व सोपचा वापर करा. हात पुसायला स्वच्छ नॅपकीन्स ठेवले जाणार आहेत ते वापरा. खरचटले, जखम झाली; तर डेटॉलचा वापर करा, मग मलम लावा’’, अशा सर्व सूचना ए-वन गँगने माईकवरून सांगितल्या. त्याची पत्रकेपण वर्गावर्गात लावली होती. अनघाताई, ए-वन गँग आणि 8वीतले इतर विद्यार्थी आरोग्यदूत बनले होते. शाळेच्या या विशेष उपक्रमाची फोटोसह मोठी बातमी छापून आली. आरोग्य सप्ताह आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. ए-वन गँग आणि त्यांचे मित्र खूप खूश होते.

- चारुता प्रभुदेसाई

शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग.