आजकाल सर्वांना सतावणारा विषय म्हणजे आपल्या पाल्याचा अभ्यास. हा अभ्यास चांगल्या पद्धतीने करवून घेऊन त्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील, यावरच विचार केला जातो. अभ्यासामधील गमतीजमतीचा विचारच केला जात नाही. त्या अभ्यासामागचे खरे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न हा कोणाकडूनच केला जात नाही अथवा करवला जात नाही.

अभ्यासामध्ये सगळ्यात जास्त गमतीचा विषय म्हणजे ‘विज्ञान’. विज्ञान हा विषय शिकण्यापेक्षा अनुभवण्याचा प्रयत्न केला गेला, तर तो जास्त चांगल्या पद्धतीने कायमस्वरूपी लक्षात राहतो.

‘मुंगीला पाय किती असतात?’ असा साधा प्रश्‍न जरी आपल्यासमोर आला, तर तो एक यक्षप्रश्‍न असल्यासारखा वाटतो आणि बहुतांशी लोकांकडून या प्रश्‍नाचे उत्तर बरोबरच येईल असे नाही. कारण कीटकाला सहा पाय असतात, हे आपण रट्टा मारून शिकलेलो असतो, खेळलेलो कधीच नसतो. याच प्रश्‍नाचे उत्तर एकदम बरोबर दिल्यामुळे आपणास पैकीच्या पैकी गुणसुद्धा मिळालेले असतील. जर हेच आपण मुंगी अथवा एखादा कीटक पकडून सूक्ष्मदर्शकाखाली बघितले, तर आपल्याला गुण तर मिळाले असतेच व कायमस्वरूपी लक्षात राहिले असते.

विटी-दांडू, गोट्या, क्रिकेट, मोबाईलमधील गेम कोणीही शिकवत नाहीत; तरीही ते आपोआप येतातच. कारण ते खेळ असतात, अभ्यास नसतो. म्हणजेच, विज्ञान हा विषय जर खेळण्यांच्या माध्यमातून समजावला गेला, तर तो तितक्याच सोप्या पद्धतीने आत्मसात करता येईल.

पाण्यामध्ये भोवरा कसा येतो? का येतो? उजव्या अंगठयाचा नियम काय सांगतो? सूर्यकिरणांचा वापर कशा प्रकारे आणि कुठे करता येईल? न्यूटनचे सिद्धांत काय आहेत? ते कशावर अवलंबून आहेत? पाण्यापासून वीजनिर्मीती कशी होते? प्लास्टिकच्या खुर्चीमधून उठल्यावर आपल्याला झटका बसल्यासारखे का वाटते? सूर्यमालेतील तिसरा ग्रह कोणता? पाचवा ग्रह कोणता? लोलकामधून एका किरणाचे सात रंगांमधे परावर्तन कसे होते? अंतरवक्र आणि बहिरवक्र आरसा व भिंग यांचा उपयोग कुठे व कसा केला जातो? डिसी मोटार, एसी मोटार यांचा उपयोग काय? अंतराळात पहिले यान कोणते गेले? रोपटे नक्की कसे वाढते? पाणबुडी ही पाण्याखाली असते, तरी तिला पाण्याबाहेरचे कसे दिसते? चलचित्र का दिसते? जपानमध्ये बुलेटट्रेन कशी आणि कोणत्या नियमावर धावते? ब्रह्मा टॉवर म्हणजे नेमके काय? कधीही न संपणारा रस्ता कसा काय असू शकतो? दूरदर्शीमधून खरेच शनी ग्रहाची चकती, गुरू ग्रहाचे उपग्रह दिसू शकतात का? दुर्बिणीचा उपयोग कोठे आणि कशा प्रकारे होतो? हवेच्या दाबावर चालणारी घर्षणहीन चकती़, गुरुत्वीय केंद्रबिंदू, चुंबकीय तत्त्व, दृष्टिभ्रम, दृष्टिसातत्य, रसायनशास्त्राची उपकरणं या आणि अशा प्रकारच्या असंख्य ‘का’ आणि ‘कसे’ या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला खेळातून सोडवायला मिळतील.

भरती आणि ओहोटी कशी होते, हे आपणास लहानपणी शाळेमध्ये शिकवले जाते. हेसुद्धा शिकवण्यापेक्षा खेळण्यांतून समजावले, तर लवकर समजण्यास मदत होईल. त्यासाठी एका खोलगट आकाराच्या ताटामधे पाणी घेऊन ते थोडे पुढच्या आणि मागच्या बाजूने तिरके खाली-वर करून दाखवले, तर ते कायमस्वरूपी लक्षात राहील.

म्हणजेच ‘विज्ञान’ अथवा ‘अभ्यास’ हा रट्टा मारून करण्यापेक्षा गमतीजमतीच्या मदतीने खेळण्यातून दाखवता आला, तर त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल व त्यामधून एक नव्हे; तर असंख्य वैज्ञानिक उदयास येतील हे नक्की!

- विश्वनाथ कुलकर्णी