ही गोष्ट काही फार पूर्वीची नाही आणि काल्पनिकसुद्धा नाही. एक खरी खरी गोष्ट आहे. तुम्ही-आम्ही ज्यांच्या जीवावर जगतो, त्या शेतकर्‍यांशी संबंधित गोष्टीचा हिरो - एक शास्त्रज्ञ. तो प्रयोगशाळेतील नाही, तर झाडाझुडपांचा व शेतातील पिकांचा शास्त्रज्ञ.

एकदा काय झालं, एका देशात खूप पाऊस पडला. तेथील मुख्य पीक कपाशी. कापसाचे जोमदार पीक आले, पण थोड्याच दिवसांत पीक किडीने खाल्ले. शेतकरी हवालदिल झाले. त्यांचे जणू कंबरडेच मोडले. ही समस्या एकच व्यक्ती सोडवू शकते; म्हणून ते या शास्त्रज्ञाकडे आले. त्याने विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आले, दर वर्षी कापूसच पिकवला जातो, म्हणून कीड माजली. जमीन नापीक होऊ लागली; म्हणून त्याने शेतकर्‍यांना, जमिनीला समृद्ध करणारे भुईमुगाचे पीक घेण्याचे आवाहन केले. शेतकर्‍यांनीही त्याचे ऐकले. पण आता इतके अमाप भुईमुगाचे पीक आले की, त्याला बाजारात भाव मिळेना. ते शेतात पडून सडू लागले. ढिगारेच्या ढिगारे डुकरांपुढे पडू लागले. शेतकरी पुन्हा दारिद्य्राच्या गाळात फसला. आता त्याला पश्‍चाताप होऊ लागला. एवढ्या भुईमुगाचे करायचे काय? कशाला याचे ऐकले, असे वाटू लागले. त्या वेळी  जनावरांचे खाद्य नाहीतर उपाशीपोटी पोरांच्या ‘खारे दाणे’ म्हणून पुढ्यात टाकणे एवढाच काय तो भुईमुगाचा उपयोग होता.

आता मात्र शास्त्रज्ञाला गप्प बसून चालणार नव्हते. त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. जेवण-खाणे बंद. सोबत फक्त भुईमूग. जेवणाचे ताट रोज न खाताच दारातून बाहेर येई. कोणी दार वाजवलेच, तर ‘त्रास देऊ नका’ एवढेच उत्तर मिळे. सतत सहा दिवस एकच काम, भुईमुगावर संशोधन! सहाव्या दिवशी जेव्हा शास्त्रज्ञ बाहेर आला, तेव्हा चमत्कार घडला. याच भुईमुगापासून एक नाही; दोन नाही, तर तब्बल तीनशे पदार्थ तयार झाले होते. शेतकर्‍यांचा आनंद गगनात मावत नव्हता. बाजारपेठ उपलब्ध झाली. कष्टाचा पैसा वसूल झाला. त्यांची गरिबी दूर झाली आणि हे सर्व घडले होते, याच शास्त्राच्या अपयशाच्या पोतडीतील यशामुळे!

कोण होता हा शास्त्रज्ञ? कोण होते हे शेतकरी? कधी लागले हे शोध? कोणते आहेत हे पदार्थ? आणखी कोण कोणते शोध लावले?

ही सर्व माहिती जाणून घ्यायची आहे का? मग नक्की वाचा.

पुस्तकाचे नाव - एक होता कार्व्हर

लेखिका - वीणा गवाणकर (राजहंस प्रकाशन)

- सुनिता वांजळे

शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणा, पुणे