आपण नेहमी एखाद्या व्यक्तीसाठी दीर्घ आयुरारोग्य मागतो आणि बहुतांश वेळा ते शारीरिक आरोग्य या अर्थाने असते. नक्कीच... आपलं शरीर जोपर्यंत आपल्याला संपूर्ण साथ देतं, म्हणजेच आपल्या सर्व तर्‍हेच्या हालचाली आणि शरीराची नैसर्गिक कार्य उत्तम रितीने पार पडत असतात, तोवर आपण आपल्या मनाप्रमाणे जगू शकतो. म्हणजेच आपले शरीर सुदृढ असते. पण आपण आता आपल्या मानसिक सुदृढतेविषयी थोडा विचार करू या....

का बरं? आजकाल सगळीकडे हास्यक्लब, स्ट्रेस management कोर्स असे काही (मदत करणारे परंतु ) अनैसर्गिक मार्ग आपल्याला आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शोधावे लागतात!

 माझ्या शाळेतील मित्रांनो, हल्ली तुमच्याही शाळेतून खासकरून १० वीच्या मुलांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी वेगळा वेळ राखून ठेवलेला असतो. हो ना!! आपण खरंच जरा खोलवर विचार केला तर असं होऊ शकत का की, थोडं आधीपासून आपल्या अभ्यासाचं, आपल्या आवडत्या खेळाचं, आपल्या आवडत्या छंदाचं मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारण्याचं, असं सगळ्या वेळेचं मिळून एक नियोजन केलं, आणि ते प्रामाणिकपणे पाळत गेलो तर १०वीच्या वर्षातसुद्धा काही आवडीचं सोडावं लागेल का, थांबवावं लागेल का? एकदा खरंच बघा... जेव्हा तुम्हाला खूप ताण असेल अभ्यासाचा, मार्क मिळवण्याचा तेव्हा अर्धा तास अभ्यास बाजूला ठेवून मित्र-मैत्रिणींशी एकदम ढिंच्याक गप्पा मारा,  वेळ मनमुक्त खेळा, आवडीचं संगीत ऐका आणि जो हा ठरवलेला वेळ आहे तो आनंदात घालवा...  मग बघा बरं असं एक मोठ्ठा श्वास घेऊन अभ्यासाला बसलात की कसं भराभर सगळं डोक्यात शिरेल ते.

जे या मुलांबद्दल तेच प्रत्येक वयात प्रत्येक व्यक्तीला त्या त्या वयोगटाप्रमाणे ताण येत असतात. ताण घेणा, अतिताणामुळे (आत्महत्येसारखे) विकृत विचार करणं, डिप्रेशन किंवा निद्रनाशासारखे विकार जडणं, असे आजार होतात. खरंच आपण मोठ्या माणसांनी थोडं विचार केला तर असं लक्षात येईल की, आपणच आपल्या आयुष्यातले ताण वाढवून घेतो... उदाहरणार्थ, रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी झाल्याच पाहिजेत, त्या तशाच झाल्या पाहिजेत, इतरांनी असंच वागलं पाहिजे, मला इतका पैसा मिळालाच पाहिजे, चारचाकी असलीच पाहिजे, माझी मुलं हुशार असलीचं पाहिजेत, इंजिनिअर, डॉक्टर झालंच पाहिजे .... हं म्हणजे याचा अर्थ असा नक्कीच नाही की चांगल्या महत्त्वाकांक्षा बाळगायच्याच नाहीत. नक्कीच आपल्या जीवनात या भावनांचही तितकचं महत्त्व आहे. परंतु या अपेक्षांना पुरे पडताना आपण आपला आनंद, समाधान हरवून त्याचा ताण घेत असू तर तर या सगळ्याचा हेतू नक्की काय असेही तपासून बघायला हवे, असे वाटते. या सगळ्या ‘च’च्या गर्दीत आपण आपल्यातल्या सहजतेचं, उत्स्फुर्ततेच, दु:खातल्या काही सुखाचं गणितच मांडायचं विसरून जातोय का? एकदा आपणच बसून शांतपणे ‘माझ्या आयुष्यात माझे नक्की कुठल्या गोष्टींना प्राधान्य आहे.’ ह्याबद्दल विचार करणे गरजेचे ठरते. त्यावर आपापल्या जगण्यातला स्वस्थपणा अवलंबून असतो. एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले आहे असे, आपण म्हणू शकतो जेव्हा त्या माणसाचे मन शांत असते. त्याला इतरांबोबर सहजतेने जुळवून घेता येते. त्याला त्याच्या प्रत्येक भावनेवर नियंत्रण ठेवता येते. म्हणजेच घडलेल्या घटनेवर प्रतिक्षिप्त क्रिया नाही तर प्रतिसाद देता येतो.

तो स्वतःच्या प्रश्नांचे, समस्यांचे उत्तर स्वतःच शोधू शकतो. स्वतःवर असलेले ताण समजून घेऊन त्यातही स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करतो. दुसर्‍याच्या वाईट बोलण्याने सहसा दुखावला जात नाही किंवा तरीही त्यातून सहजतेने स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करतो.

अशी स्वस्थता मिळण्यासाठी आपण काय काय करू शकतो! तर...

  • एक म्हणजे आपण आपली भूक भागवली पाहिजे आणि झोप योग्य प्रमाणात घेतली पाहिजे.
  • स्वतःच्या मनाचे रंजन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आपले छंद जोपासणे. वेळप्रसंगी आपली एखादी अडचण सोडविण्यासाठी कुणाची तरी मदत मनमोकळेपणाने मागणं.
  • मनाला शांत करणारं, उत्साह वाढवणारं संगीत ऐकणं. ‘वास्तवात’ कुणा आपल्या वाटणार्‍या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधणं. (पूर्वी व्यक्तींचा समोरासमोर मनमोकळा संवाद होता, त्यामुळे सुख-दु:ख सहज वाटली जायची, त्यामुळे त्यामानाने एकमेकातली चढाओढ कमी आणि मदतीचा हात जास्त मिळायचा. या सगळ्याचाच परिणाम मनस्वास्थ्यावर व्हायचा.)
  • वावरणार्‍या व्यक्तींकडे उत्सुकतेने, सकारात्मकतेने पाहणं, त्यांना समजून घेणं आणि अनुभवणं हेही अत्यंत आनंददायी असतं.
  • कधीतरी आपणच जेव्हा आपल्या समस्येवरचं उत्तर शोधतो त्यामुळे आपल्याला कळत  की, माझ्या मनापाशी तेवढी ताकद आहे की मी आयुष्यात येणार्‍या कुठल्याही नकारात्मक प्रसंगातूनसुद्धा मार्ग काढू शकतो. त्यामुळे आपल्या मनाची स्वस्थता आपणच वाढवत नेतो. म्हणजेच आपण  आपले मानसिक आरोग्य सुदृढ ठेवायला मदत करतो.

- भाग्यश्री हलदुले