परवाच मी माझ्या आत्याकडे गेले होते. माझ्या धाकट्या आत्तेबहिणीचा वाढदिवस अगदी आनंदाने साजरा झाला. ‘काय संकल्प केलास या वर्षी?’, असं सगळ्यांनी विचारलं, तेव्हा ‘मी या वर्षी मनाचे श्‍लोक आणि रामरक्षा संपूर्ण पाठ करून, असतानाच पाठांतराची इतकी आवड? सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं, पण या संकल्पामागचं कारण मला नंतर समजलं. मी तिला विचारल्यावर मला समजलं की, तिची बेस्ट फे्रंड दररोज संध्याकाळी हे श्‍लोक म्हणते. ‘मग मीपण पाठ करीन आणि मग आम्ही दोघी म्हणू वर्गात.’, असं तिने मला सांगितलं.

तेव्हा माझ्या मनात विचार आला की, खरोखरच ‘संगत’ हीच माणसाला घडवत असते. ज्याप्रमाणे आपले आई-वडील, शिक्षक, निसर्ग, ग्रंथ आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यातले गुण विकसित करून; आपल्याला शिकवण देतात, त्याचप्रमाणे ‘संगत’ हीदेखील अप्रत्यक्षपणे माणसाला शिकवणच देत असते.

लहानपणी वर्गातल्या इतर मुलामुलींची भांडणं मी घरी येऊन आईला सांगायचे, तेव्हा ‘तू नको बरं का तिच्याशी बोलायला जाऊ’, असं ती नेहमी म्हणायची. त्या सगळ्याचं तेव्हा काही वाटलं नाही, कारण त्या वेळी काही समजतच नव्हतं ना! पण आता जेव्हा संगतीचं मूल्य मला समजायला लागलं आहे, तेव्हा आईच्या त्या म्हणण्याचं महत्त्व पटतंय.

 आज ह्या सुसंगतीमुळेच तर जगात कित्येक गोष्टींना महत्त्व प्राप्त झालंय. उदाहरण द्यायचं झालं, तर ह्या चार अक्षरांमुळेच आज आपण शिक्षण घेऊ शकत आहोत.

लोकमान्य टिळकांना कायद्याचं शिक्षण घेत असताना सहचारी म्हणून लाभलेली सुविचारी व्यक्तिमत्त्वे; म्हणजेच गोपाळ आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव नामजोशी आणि वामन आपटे. त्या काळी शिक्षणासाठी झटण्याचा विचार अनेकांच्या फक्त मनातच येऊन गेला असेल, पण जेव्हा एकाच उद्दिष्टाने पेटलेल्या मशाली एकत्र येतात, तेव्हा क्रांतीचा तेज:पुंज प्रकाशमय होतोच होतो. त्यांच्या कष्टांचं फळ म्हणजे आपलं आजचं शिक्षण आहे आणि हे केवळ सुसंगतीमुळेच घडू शकलं.

संत तुकाराम म्हणतात,

सागराच्या संगे नदी बी घडली।

नदी बी घडली, सागरमय झाली॥

 

शिवाजीच्या संगे ताना बी घडला।

ताना बी घडला, शिवरूप झाला॥

 

विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला।

तुका बी घडला, विठ्ठलमय झाला॥

तेव्हा आपणही योग्य संगतीची पारख करून, समाजात एक उत्तम नागरिक म्हणून पुढे येऊ या. चला तर मग, आज ईश्‍वराकडे आपण एकच वर मागू या, तो म्हणजे सुसंगतीचा!

मज हवे ते दे रे देवा, सुसंगतीचा निर्मळ ठेवा।

ह्या जन्मी वर एकच लाभो,

सुसंगती सदा घडो!

सुसंगती सदा घडो!

- अनुजा ब्रम्हे

इयत्ता 10वी, अ

अहिल्यादेवी प्रशाला